मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीतून जो जीवनविषयक दृष्टिकोन निर्माण होतो, तो ‘रॉयवाद’ नावाने ओळखला जातो. प्रारंभी हे नाव हेटाळणीच्या उद्देशाने वापरले गेले; पण नंतरच्या काळात स्वतंत्र व स्वयंपूर्ण अशा विचारधारेचे रूप प्राप्त झाल्याने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यास आदराचे स्थान प्राप्त झाले. हे काही स्वतंत्र तत्त्वज्ञान नाही. ते मार्क्सवादाच्या पायावर उभे आहे. रॉयवाद हा मार्क्सवाद आणि लेनिनवाद यांच्या अनुरोधाने व्यक्त वसाहतींच्या वस्तुस्थितीचे केलेले प्रकटीकरण होय. रॉयवाद वसाहतवादमुक्तीचा क्रांतिवाद होय. याचे तीन घटक आहेत- तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र आणि राजकारण. विज्ञानातील शोधामुळे जड वा भौतिक (मॅटर) तत्त्वाचे सार्वभौमत्व सिद्ध झाले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’ या शीर्षकाचा प्रबंध लिहून यावर प्रकाश टाकला आहे. तर्कतीर्थांचे हे लेखन १९४१ चे आहे. ज्या काळात तर्कतीर्थ रॉयवादी होते, त्या काळातील हे लेखन होय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थशास्त्राच्या बाजूने पाहावयाचे झाल्यास, आधुनिक साम्राज्यशाहीचे युद्धोत्तर स्वरूप, वसाहतीतील तिच्या भांडवल गुंतवणुकीचे आर्थिक आणि राजकीय आघात व प्रत्याघात आणि त्यातून निर्माण होणारे साम्राज्यशाहीचे नवे धोरण यांची रॉयवाद चिकित्सा करतो. चीन आणि भारत या देशांच्या इतिहासाची आधिभौतिक मीमांसा मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली आहे. ‘मार्क्सच्या आर्थिक उपपत्तीची समीक्षा’सारखा तर्कतीर्थांचा लेख या पक्षावर आधारित आहे. वसाहतीसंबंधात राष्ट्रीय लोकसत्ताक क्रांतीचा सिद्धांत व कार्यक्रम रॉय यांनी मांडला आहे. यास जोडूनच त्यांनी कार्यतंत्र विकसित केले आहे. ‘लोकशाहीवर अंकुश ठेवणारे गट हवेत’ या लेखातून तर्कतीर्थ लोकसमित्यांचा पुरस्कार करतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे रॉयवादाचे समर्थन करत असतात.

मार्क्सवादाचा प्रकर्ष जसा लेनिनवादात होतो, तसा त्याचा अपकर्ष एडवर्ड बर्नस्टीन अगर सेकंड इंटरनॅशनलचे धुरीण यांच्या विचारसरणीतून होऊ शकतो. एडवर्ड बर्नस्टीनने (१८५० ते १९३२) मार्क्सवादात सुधारणा सुचवून जर्मनीमध्ये ‘सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी’स्थापन केली. इकडे रॉय यांनी ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन करून तो प्रयोग केला. तर्कतीर्थ त्या पार्टीचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते होते. सेकंड इंटरनॅशनल (१८८९) ‘सोशालिस्ट इंटरनॅशनल’ म्हणून ओळखली गेली. युरोपात जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जिअम, इंग्लंड, फ्रान्स, इ. अनेक देशांत या विचारांचे पक्ष व संघटना अस्तित्वात आल्या. रॉयवादाने वसाहतीतील अस्ताव्यस्त गोंधळाच्या स्थितीत होकायंत्राप्रमाणे योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. ते या विचारसरणीचे महत्त्वपूर्ण योगदान होय.

रॉयवादाने मार्क्सवादाचा विकास घडवून आणला. वसाहत विघटन सिद्धांत, दलितांच्या अधिराज्याची मांडणी, भौतिक सार्वभौमत्व आणि वैश्विक तत्त्वज्ञानाची सुसंगती, हे रॉयवादाचे खरे योगदान होय. तर्कतीर्थांनी दलित साहित्यनिर्मितीला ‘युगांतरसूचक घटना’ संबोधून आपल्या दलित संमेलनातील एका भाषणात याकडे लक्ष वेधले होते. वैश्विक तत्त्वज्ञान तर तर्कतीर्थांच्या व्यासंगाचा विषय होता. विरोधविकासवादाचे तर्कतीर्थकृत विस्तृत विवेचन म्हणजे रॉयवादाचे प्रतिपादनच होय. भारतीय परिप्रेक्षात रॉयवाद हे गांधीवादाला दिलेले आव्हानच होते. तर्कतीर्थांनी गांधीवाद समर्थनापेक्षा त्याच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडविणारे लेखनच रॉयवाद अंगीकारल्यावर विपुल केले आहे. ‘ईश्वरी प्रेरणेचे थोतांड’, ‘अपसिद्धांत’ , ‘गांधीवादाच्या चळवळीवर उभारलेला नेभळट सुधारणावाद’ यांसारख्या लेख शीर्षकांमधून तर्कतीर्थांचा गांधीवादविरोध स्फटिकवत स्पष्ट होतो.

मानवेंद्रनाथ रॉय यांच्याप्रति तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समर्पण त्यांच्याच शब्दांत समजून घ्यायचे झाले, तर रॉय यांच्या मृत्युलेखातील त्यांचे हे विचार पुढे येतात. ‘ध्येयवादाप्रमाणे आचरण करणे आणि त्याच वेळी त्याची सतत समीक्षा करीत राहणे, हे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनाचे रहस्य होय. अनंत श्रद्धा व सत्यनिष्ठा यांचा उत्तम समन्वय त्यांनी साधला होता. त्याकरिता लागणारी संपूर्ण अनासक्ती त्यांनी हृदयात बाणविली होती. पूर्वयुगापेक्षा विज्ञानयुगाला अनासक्तीची अधिक गरज आहे. तिचा भावार्थ व्यापक आहे. अनासक्तीशिवाय पूर्वसंस्कार व परंपरेच्या भावना यांची हृदयावरची बंधने तोडून टाकण्याचे मन:सामर्थ्य लाभू शकत नाही. सत्याचा व स्वातंत्र्याचा पंथ अनंत आहे,’ हेच खरे!
drsklawate@gmail.com