मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनप्रवासाचा प्रारंभ क्रांतिकारी उठावाच्या ऊर्मीतून झाला. अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती करून ते १९३० ला भारतात परतले. इतक्या देशांतील क्रांतीच्या अनुभवांनी ते संतुष्ट नव्हते. मुळात भारतात तरुणपणी (१९१५) जी क्रांती करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा होता. इथे येताच त्यांना तुरुंगवास घडला. १९३६ ला तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली लोकसमित्यांद्वारे स्वराज्य मिळविण्याची योजना ठेवली. ती स्वीकृत न झाल्याने त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडून ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन करावी लागली. या पक्षाचीही भारतात डाळ न शिजल्याने त्यांना पक्ष बरखास्त करून वैचारिक चळवळीची कास धरावी लागली. पक्ष बरखास्तीचे जे अधिवेशन २६ ते ३० डिसेंबर, १९४८ या काळात कलकत्त्यात संपन्न झाले, त्याचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. २६ डिसेंबरच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नवमानवतावाद मांडून त्याची अनिवार्यता स्पष्ट केली. ३० डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या समारोपाला केलेले भाषण ‘पक्ष ते वैचारिक चळवळ’ अशा प्रवासाचे सिंहावलोकन होते. त्यात तर्कतीर्थ हे मान्य करतात की, ‘‘ The diffusion of power is not possible through its capture but through rousing the will to power in innumerable individuals. The will to know and to live a more cultured life must also be toused. It is a mark of egoism to refuse to recognise that the growth knowledge and culture takes place a good deal outside the rank of political party.’’

खरंतर १९४६ पासूनच ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’ने त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीतील विशाल महाराष्ट्रात सर्व जाती व वर्गांना प्रतिनिधित्व देत निवडणूक लढवूनही आलेल्या अपयशानंतर आत्मपरीक्षण सुरू केले होते. त्याची वैचारिक फलश्रुती म्हणून ‘नवमानवतावादा’कडे पाहावे लागते. या नवमानवतावादाची २२ सूत्रे तर्कतीर्थांनी मराठीत भाषांतरित करून बहुप्रसारित केली होती. या विषयावरील सर्व मराठी ग्रंथ, लेख, मुलाखती इ.मध्ये त्यांचाच अधिकृत वापर होत आला आहे. हा नवमानवतावाद मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनाचे अंतिम तत्त्वज्ञान होय.

नवमानवतावाद व्यक्तिस्वातंत्र्य आणि सत्यान्वेषी तत्त्वज्ञान होय. यात मानवास विवेकवादी गृहीत धरण्यात आले आहे. मनुष्य स्वयंप्रेरणेने नैतिक असण्यावर यात भर दिला आहे. अगोदर व्यक्ती असते. व्यक्तींचा समाज बनतो म्हणून समाजापेक्षा व्यक्तीचे महत्त्व अधिक आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच कोणत्याही कारणाने होणे नवमानवतावादास मान्य नाही. मनुष्य जन्मत:च विवेकशील असल्याने तो उपजत नैतिक, सदाचारी असतो. समाज सामंजस्य ही व्यक्तीच्या विवेकवादी जीवनाची फलश्रुती होय. मानवाची प्रगती स्वातंत्र्य आणि सत्याच्या पायावर झाली पाहिजे, तरच ती मानवहितवर्धक ठरते. मानवी स्वातंत्र्याची जाणीव शिक्षण, वाचन व व्यवहारातून येते. ती देण्याची गोष्ट नसून, आत्मसात करण्याची बाब आहे. मुक्त मानवनिर्मिती केवळ आणि केवळ सामाजिक पुनर्रचनेतून शक्य आहे. या विचाराला पुढे आंतरराष्ट्रीय मानवतावाद, नैतिक संघटन इत्यादींचे बळ लाभले. यातच नवमानवतावादाचे यश आहे. नवमानवतावाद धर्मनिरपेक्ष समाजरचनेचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञान आहे. ते लोकशाहीवर विश्वास ठेवते. परंतु, त्याचे केंद्र प्रतिनिधी नसून, नागरिक (जनता) असल्याची या तत्त्वज्ञानाची धारणा आहे. सामाजिक, आर्थिक समतेचे समर्थन करणारी ही विचारधारा विश्वबंधुत्व हे अंतिम लक्ष्य मानते. सामाजिक न्याय हा संपत्तीच्या पुनर्वितरणातून शक्य असल्याचे या विचारधारेचे मत आहे. वंचितांची अधिसत्ता या तत्त्वज्ञानाचे स्वप्न आहे. शांती व सामंजस्य यांवर नवमानवतावादाचा विश्वास आहे. जगाच्या बौद्धिक संपदेवर उभे हे तत्त्वज्ञान बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद, विज्ञानवाद, अस्तित्ववाद यांसह भारतीय दर्शनांवर उभे आहे.

आयुष्याचा सूर्य अस्ताला जात असताना १९९१-९२ च्या एका मुलाखतीत (‘उगवाई’, दिवाळी, १९९४) तर्कतीर्थ म्हणतात, ‘‘मानवतावाद याचा अर्थ सगळा मानव एक आहे. त्याचं जितकं सहकार्य वाढेल, तेवढा त्यांच्यातील संघर्ष कमी होत जाईल. त्यामानाने माणूस पुढे जाईल…’’
drsklawate@gmail.com

Story img Loader