कार्ल मार्क्सनंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर कुणाचा प्रभाव असेल, तर तो मानवेंद्रनाथ रॉय यांचा; रॉय यांच्याशी त्यांची पहिली भेट १९३६ च्या सुमारास झाली. रॉय मूळ भारतातले; पण भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी ते या चळवळीत सामील झाले. ही चळवळ त्यांना सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने यशस्वी करायची होती; पण भारतात शस्त्रसंग्रह करणे न जमल्याने त्यांनी देशांतर केले. मलेशिया, इंडोनेशिया, इंडो-चीन, फिलिपाइन्स, जपान, कोरिया, परत चीन आणि नंतर अमेरिका असा प्रवास करत १९१६ मध्ये ते अमेरिकेत पोहोचले. नंतर मेक्सिको, रशिया, चीन, जर्मनी असा प्रवास करत १९३० ला भारतात परतले. या १५ वर्षांत त्यांचा विविध देशांतील सशस्त्र क्रांतीत सक्रिय सहभाग होता; इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पक्ष संस्थापकांपैकी ते एक होते. लेनिन, स्टॅलिनचे ते सहकारी होते. कम्युनिस्ट पक्ष तत्त्वज्ञान आणि व्यवहार त्यांनी जवळून अनुभवला होता; पण स्वतंत्र विचार करणारे बुद्धिजीवी अशी घडण असलेले रॉय सत्ताधारी कधीच बनू शकले नाहीत. भारतात परतल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे तर्कतीर्थ नुसते सहकारीच नव्हते, तर पदाधिकारीही होते. कम्युनिस्ट पक्ष विचार म्हणजे मूलत: मार्क्सवादच होय.

मार्क्सवादाच्या प्रचार, प्रसार, सत्तापरिवर्तन प्रक्रियेतील वरील देशांचा अनुभव जमेस धरून आणि भारतातील १९३० ते १९४८ चे प्रयत्न लक्षात घेऊन त्यांनी नवमानवतावाद मांडला. मार्क्सवाद ते नवमानवतावाद या वैचारिक प्रवास आणि स्थित्यंतरांची मीमांसा करणारा हा तर्कतीर्थांचा लेख साप्ताहिक ‘माणूस’च्या १४ ऑगस्ट, १९७६ च्या अंकातील आहे. या लेखात तर्कतीर्थांनी, रॉय यांना मार्क्सवादाच्या ज्या मर्यादा व अनुभव लक्षात आले होते त्याआधारे नवमानवतावादाची मांडणी केली होती. रॉय यांची वैचारिक घडण भारतीय राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय मार्क्सवाद, रॉयवाद या तीन विचारधारांतून झाली होती. त्याची अंतिम परिणती म्हणजे नवमानवतावाद होय. तो मार्क्सवादाच्या मर्यादा दूर करीत सांगितलेला नवा मार्क्सवादच म्हणायला हवा. वि. स. खांडेकरांनी ‘मार्क्सवादावर गांधीवादाचे केलेले कलम म्हणजे समाजवाद होय,’ असे म्हटले होते. तसाच हा प्रकार.

मानवेंद्रनाथ रॉय यांनी मार्क्सवादाचा जो अनुभव घेतला होता त्यानुसार, ‘साम्यवादी क्रांती ही मानवी स्वातंत्र्याचे व समतेचे जग होय, असे त्यांचे दर्शन होते. परंतु नुसत्या नैतिक व सांस्कृतिक उच्च आदर्शाच्या प्रेरणेने, असे हे नवे क्रांतिकारक ध्येय कृतीत आणता येणार नाही, हे लक्षात घेऊन तो समाजाच्या आर्थिक जीवनाच्या मीमांसेकडे वळला आणि ध्येयवादी वैचारिक प्रेरणांकडे दुर्लक्ष झाले.’ मार्क्सवादाचा अनुभव रॉय यांनी अनेक देशांत सशस्त्र व वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून घेतला होता. त्यातून त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट ही की, ‘मार्क्सवादी प्रेरणेने घडलेल्या ऐतिहासिक तथाकथित समाजवादी क्रांती या मार्क्सच्या आदर्शांनी भारलेल्या माणसांनी केलेल्या आहेत. जेथे जेथे मार्क्सवादी क्रांती झाल्या, तेथे मार्क्सच्या आर्थिक उपपत्तीच्या अनुसाराने त्या घडल्याच नाहीत. क्रांतीनंतर नव्या राजसत्ता स्थापन झाल्या. मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादामध्ये नैतिक आदर्शाची प्रेरणा बाजूला ठेवल्यामुळे परिणाम असा झाला की, या नव्या राजसत्तांमध्ये मानवी स्वातंत्र्याची, विचार स्वातंत्र्याची गळचेपी झाली – बराकीकरण (रेजिमेंटेशन) झाले.’ या अनुभव आणि निरीक्षणांच्या आधारे मानवेंद्रनाथ रॉय यांनी नवमानवतावाद स्थापला, तो तर्कतीर्थांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी विसर्जन अधिवेशनात आणि तोही तर्कतीर्थांच्या मुखातून (अध्यक्षीय भाषणातून).

मानवेंद्रनाथ रॉय यांना अभिप्रेत नवमानवतावाद म्हणजे ‘बुद्धीवरील बंधने तोडून टाकून ज्यांचा आत्मा स्वतंत्र झाला आहे, अशी माणसे स्वातंत्र्याचे जग निर्माण करण्याच्या दृढनिश्चयाने जेव्हा एकत्रित होतील, तेव्हाच सामुदायिक प्रयत्नांनी विश्वव्यापी मानवी मूल्यांवर आधारलेली मूलगामी लोकसत्ता स्थापित होऊ शकेल.’ या स्वप्नासाठी उभारलेले नवमानवतावाद हे राजकीय तत्त्वज्ञान होते. मानवेंद्रनाथ रॉय काय आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी काय, उभयता नित्य नव्या स्वप्नांनी विचारांचा पाठलाग करणारे, अपयशाचा शाप घेऊन धावणारे सामाजिक, राजकीय कार्यकर्ते होते. drsklawate@gmail.com

Story img Loader