यशस्वी पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत. पण यशस्वी पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहतानाच स्वत:चेही अस्तित्व आणि वेगळेपण सिद्ध करणाऱ्या स्त्रिया मोजक्याच असतील. त्यात डॉ. मंगला नारळीकर हे नाव ठळकपणे घ्यावे लागते. विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची पत्नी ही जशी त्यांची ओळख आहे, त्याहून अधिक गणितज्ञ म्हणून डॉ. मंगला नारळीकर यांचा ठसा मोठा आहे. ही ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने कमावलेली आहे. दुसऱ्यांदा झालेल्या कर्करोगाशी दोन हात करत असतानाच त्यांचे सोमवारी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून १९६२ मध्ये बीए ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९६४ मध्ये त्यांनी गणितात एमए केले. त्यांनी त्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवतानाच सुवर्णपदकही पटकावले. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यावर त्या त्यांच्यासोबत केंब्रिजला गेल्या. तिथेच त्यांनी गणिताचे अध्यापन सुरू केले. पुढे भारतात आल्यावर त्यांनी गणित विषयातच पीएच.डी. केली आणि अध्यापनही सुरू केले. शालेय विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागण्यासाठी त्यांनी ‘दोस्ती गणिताशी’, ‘गणित गप्पा’ अशी पुस्तके लिहिली. मुलांना गणित कसे शिकवावे यासाठीही त्या मार्गदर्शन करत होत्या. त्याच भूमिकेतून त्यांनी बालभारतीच्या गणित समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. गणितात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच प्राथमिक स्तरावर गणित शिकवण्यासाठीच्या प्रेमातून त्यांनी पहिली-दुसरीपासूनची क्रमिक पुस्तके तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. गणितातील मराठी संख्यावाचनाची नवी पद्धत त्यांनी मांडली.

ही पद्धत मराठीतील रूढ संख्यावाचनास वळण देणारी होती. यावरून त्या वेळी वाद निर्माण झाला होता. बरीच टीकाही करण्यात आली. मात्र या बदलामागे असलेला मूलभूत विचार त्यांनी अत्यंत शांत, पण ठामपणे समाजापुढे मांडला. मराठी संख्यावाचनाच्या रूढ पद्धतीत क्लिष्टता असल्याने मुलांचा गोंधळ उडतो. त्यामुळे मुलांना संख्यावाचन अधिक सुलभ होण्यासाठी आणखी एक पर्याय देण्यात आल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी त्या वेळी मांडली. गणितावरील संशोधन कार्यासह त्यांनी ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’, डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह ‘फन अ‍ॅण्ड फंडामेण्टल ऑफ मॅथेमॅटिक्स’, ‘अ कॉस्मिक अ‍ॅडव्हेंचर’ अशा अन्य पुस्तकांचेही लेखन केले. मंगला नारळीकर यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासू, विचारी आणि विवेकवादी होते. अभ्यासातून येणारी वैचारिक स्पष्टता त्यांच्याकडे कायमच होती. त्यामुळेच काही वेळा त्यांचा स्वभाव परखड, तर बोलणे धारदार वाटत असे. संशोधनात सदैव व्यग्र असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांना खंबीर साथ देतानाच त्यांनी गणितासारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या विषयात स्वतंत्रपणे आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. या गणिती विदुषीचे हे योगदान कायमच स्मरणात राहील!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangala narlikar wife of jayant narlikar died at the age of 80 ysh
Show comments