आज पन्नाशीत असणारे दूरदर्शनच्या ऐन भराच्या काळातल्या ज्या उत्तमोत्तम मालिका आजही विसरू शकत नाहीत, त्यातली एक म्हणजे मंगेश कुलकर्णीलिखित आणि अभिनित तसेच विजया मेहता दिग्दर्शित लाइफ लाइन ही मालिका. त्यातल्या ए. के हंगल, शफी इनामदार या दिग्गजांइतकाच ठसा उमटवून गेले ते डॉक्टरचा पांढरा एप्रन घालून गंभीर चेहऱ्याने रुग्णालयात वावरणारे मंगेश कुलकर्णी. त्यानंतर त्यांनी तो अधिक ठसठशीत केला तो पटकथा – संवाद लेखनात, मालिकांच्या शीर्षकगीतांमध्ये. अगदी शीर्षकगीतांचा जादूगार असं त्यांचं वर्णन केलं जावं इतकी त्यांनी ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘आम्ही सारे खवय्ये’ यांसह अनेक मालिकांची उत्तमोत्तम शीर्षकगीते लिहिली होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : न्या. संजीव खन्ना

‘आभाळमाया’चे ‘जडतो तो जीव, लागते ती आस…’ या शीर्षकगीताला अशोक पत्की यांनी दिलेली चाल, देवकी पंडित यांनी दिलेला आवाज हे सगळे समीकरण इतके जुळून आले की प्रेक्षक या मालिकेच्या कथानकाइतकेच त्याच्या शीर्षकगीताशी जोडले गेले होते. हे शीर्षकगीत आपल्याला एकदा बसच्या प्रवासात सुचले. त्यामुळे ते लगोलग बसच्या तिकिटावरच लिहून काढले असा किस्सा मंगेश कुलकर्णी सांगत. त्याइतकेच त्यांचे गाजलेले शीर्षकगीत होते, ‘वादळवाट’चे. ‘थोडा सागर निळा, थोडे शंख नि शिंपलेे…’ असे लिहिणारा गीतकार ‘आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही-आम्ही सारे, ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे चमचमीत खाण्याचे ते… आम्ही सारे खवय्ये’ हे शीर्षकगीत लिहू शकतो ही त्यांची हुकमत होती.

मंगेश कुलकर्णी मूळचे नाशिकचे. जेजे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. अभिनेते दिलीप कुलकर्णी यांचे बंधू ही त्यांची आणखी एक ओळख. सुरुवातीच्या काळात दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. विजयाबाईंचे आवडते शिष्य म्हणूनही ते ओळखले जायचे. ‘लपंडाव’ या मराठी सिनेमापासून त्यांची पटकथालेखनाला सुरुवात झाली. त्या अर्थाने पटकथालेखक म्हणून त्यांचा तो पहिला सिनेमा. जॅकी श्रॉफ, शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या अभिनयामुळे एकेकाळी बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या ‘येस बॉस’ या सिनेमाची पटकथाही त्यांचीच. मुळातल्या उत्तम पटकथेचे या कलाकारांनीही सोने केले ही गोष्ट वेगळी, पण हा सिनेमाही मंगेश कुलकर्णी यांची लेखनामधली हुकमत दाखवून देतो. ‘व्हॉट विमेन वॉन्ट’ या सिनेमावर आधारित ‘अगंबाई अरेच्च्या’ या सिनेमाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्याशिवाय ‘गुलाम ए मुस्तफा’, ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्याच होत्या. ‘फास्टर फेणे’ या मराठी सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ते होते. पटकथेतील संवाद, विनोदाची पखरण यात त्यांचा हातखंडा होता. प्रेक्षकांच्या अभिरुचीला उत्तम वळण देणारे कलंदर कलावंत म्हणून ते कायमच स्मरणात राहतील.