– अजित जोशी

भारतामध्ये जाती, उपजाती, पोटजाती यांचं एक अशक्यप्राय जाळं आहे. सोपान जोशी यांनी लिहिलेलं ‘मँजिफेरा इंडिका’ वाचताना असं वाटतं की, एवढंच गुंतागुंतीचं आणि स्थळानुसार बदलणाऱ्या पोटजाती असलेलं जाळं हे बहुधा आंब्याच्या प्रजातींचं असावं! ‘जिथे जिथे आंबा आहे तिथे तिथे भारत आहे’ असं कुणीतरी म्हटलंय, ते किती यथार्थ आहे हे कदाचित, हे पुस्तक वाचण्याआधीच आपल्याला उमगलेलं असतं. आंबा देशातल्या प्रत्येक शहरात आहे. बाजारातलं फळ म्हणून आहेच पण झाड म्हणूनही शहरोशहरी आहे. आता चकचकीत इमारती उभ्या राहिलेल्या जुन्या वस्त्यांमध्ये आहे. आपणा सर्वांच्या जिभेवरही आहेच. खरं सांगायचं तर आंबा हे एक साधं फळ! भले ते मोसमी असेल, हल्ली महाग असेल, भले ते सर्वात आधी खाणं प्रतिष्ठेचं असेल, पण त्याची चर्चा ती किती करणार? या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की बाबराच्या डायरीपासून गोव्यातल्या इन्क्विझशनपर्यंत आणि सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीपासून बालपणीच्या आठवणींपर्यंत आपल्या एकूण आयुष्याच्या आणि इतिहासाच्या अनेक टप्प्यांशी आंब्याचा संबंध ते जोडत जातं.

टेबलावर आकर्षकपणे रचून सुरीने कापायचा श्रीमंती आंबा आणि डेख फेकून दिल्यानंतर चुपून हौसेने खायचा ‘आम’ जनतेचा आंबा असा आंब्यांमधलाही वर्गसंघर्ष या पुस्तकात अधोरेखित होतो. आंब्याचं आपल्या दैनंदिन जीवनाशी असलेलं नातं कधी जाणवलं नाही तरी फार घट्ट आहे. ज्यांनी समजूनउमजून हे नातं कधी कृतीत, तर कधी मनात जपलं आहे, अशांचे असंख्य किस्से या पुस्तकातून ओसंडून वाहात राहतात. मग यात कधी रत्नागिरीचे देसाई असतील, तर कधी दिल्लीचे सोहेल हाश्मी, किंवा कधी कलकत्त्याचे बजोरिया नाहीतर मध्य प्रदेशातल्या ‘हिजड्यांच्या आमराई’मधलं कब्रस्तानसुद्धा.

पण हा विषय फक्त आजचा नाही. भारतीय, ग्रीक किंवा बायबलमध्ये असलेल्या मिथककथांमध्येही आंब्याला सूचक उल्लेख त्या फळाची प्रतिष्ठा वाढवणाराच आहे. कलमी आंबा ठिकठिकाणी पोहोचवण्यात पोर्तुगीजांचा महत्त्वाचा वाटा होता. उत्तरेतल्या अनेक शहरांमध्ये आणि खासकरून शहराच्या आजूबाजूला घनदाट आमरायांची संस्कृती होती. सिमेंट काँक्रीटच्या जंगलांचं जाळ होण्यापूर्वी मुंबईतल्या जुन्या विभागांत सगळीकडे आंब्याची झाडं होती. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या कलाविष्कारांमध्ये ठिकठिकाणी आंबा झळकत राहतो. कालिदासाच्या शाकुंतलापासून गालिबच्या मसनवीपर्यंत आंब्याला काव्यात महत्त्वाचं स्थान आहे. केरळातल्या नायरांमध्ये अंत्यविधीसाठी आंब्याच्या लाकडाचं महत्त्व आहे, महाराष्ट्रातच नाही तर तमिळनाडू किंवा कर्नाटकातही आंब्याचं टाळं पूजेअर्चेला कामी येत असतं. बुद्धाच्या जातक कथांमध्ये ठिकठिकाणी आम्रवृक्षाचे संदर्भ आहेत आणि नेमिनाथांचं संरक्षण करणारी जैन यक्षी आम्रवृक्षाखाली हातात आंब्याचं फळ घेऊन बसते, असाही उल्लेख जैन कथांत आहे.

उझबेकिस्तानातून भारतात आलेला बाबर जरी तिथली फळं आठवून हळहळत राहिला तरी त्याच्या वारसांना मात्र इथून तिथे आक्रमणाला गेल्यावर आंबे पाठवावे लागत असत. उत्तर भारतात मोगलाईच्या उतरत्या काळात बहरलेली समृद्ध गंगाजमनी तहजीब जी संपायला लागली त्याचे अवशेष तुम्हाला मलिहाबादच्या हवेल्या, मुर्शिदाबादच्या बागा, हरवलेला बनारसी लंगडा किंवा ओस पडलेल्या दरभंग्यातल्या विद्यापीठातल्या आमराया यांच्यात सापडत राहतात. वेगवेगळ्या कला-सौंदर्याचे आसक्त असलेले अवधेश नबाब असोत किंवा सातत्याने विरक्तीचा शोध घेणारे गांधी, आंबे दोघांनाही प्रिय होते. चाउ एन लायपासून केनेडींपर्यंत अनेकांना पंडितजींनी आंब्याची पेटी भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणून भेट दिलेली होती. भारत-पाकिस्तान यांच्यात संवाद सुरू झाला की त्यातला पहिला टप्पा आंब्याच्या पेटीच्या देवाणघेवाणीचा असतो. किंबहुना एकूणच आंब्याचा लक्षावधी वर्षांचा वेगवेगळ्या खंडातून फिरणारा चित्तथरारक प्रवास या पुस्तकातून सापडत राहतो.

वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास

हे पुस्तक म्हणजे आंब्याचं ‘चरित्र’ आहे. त्याच रंजक आणि काहीशा भक्तिपूर्ण पद्धतीनं ते लिहिलेलं आहे. पण एखाद्या महानायकाच्या चरित्रासाठी जसा सखोल अभ्यास करावा तसा सोपानरावांनी आंब्यासाठी केलेला आहे. त्यामुळे आंबा लागवड करणारे शेतकरी, व्यापारी, त्याच्या प्रजातींवर काम करणारे संशोधक, विद्यापीठांतले प्राध्यापक यांच्याशी केलेल्या चर्चेपासून ते ऐतिहासिक, पौराणिक पुस्तकं आणि साम्राज्यवादी सत्तांच्या नोंदींपर्यंत अनेक संदर्भ देत हे पुस्तक आपली विश्वासार्हता सिद्ध करतं. म्हणूनच पुस्तकात हापूस, केसर, लंगडा, दशेरी, बदामी, तोतापुरी या आंब्याच्या सुपरिचित प्रजातींपासून अगदी नष्ट होऊ घातलेल्या प्रजातींचीही चर्चा आहे. त्यांची चव, पोत, गोडसरपणा आणि त्यांच्या उत्पादनाच्या वेगवेगळ्या घटकांचा सखोल अभ्यास आहे. आंब्याच्या उत्पादनात माती, हवामान, पाणी व्यवस्थापन, आणि खतांचा उपयोग कसा महत्त्वाचा असतो, हेही स्पष्ट केलं आहे. दशलक्ष वर्षांपूर्वी झालेली आंब्याची उत्क्रांती, मोहोराचा बहर आणि लगडणारी फळं याची गणितं, वेगवेगळ्या प्रजातींमध्ये असणारी गुणसूत्रं हे सगळं विज्ञान या पुस्तकात एखाद्या शास्त्रज्ञाच्या तोडीचे संदर्भ देत पण सोप्या शब्दांत येतं. आणि त्याचबरोबर पुस्तकाच्या ‘हिरो’च्या कच्च्याबच्च्यांच्या म्हणजे आमरस, लोणची, पन्हं, मुरांबा, कुल्फी यांच्याही रसभरीत गप्पा आपल्याला वाचायला मिळतात!

आंब्याच्या निमित्तानं आपल्याला एकूणच शेतीत आणि खास करून फळबागात असणाऱ्या अनेक समस्या प्रातिनिधिक स्वरूपात दिसत राहतात. बागेविषयी उदासीनता असलेले मालक, त्यांनी सांभाळायला दिलेले ठेकेदार, त्यातून होणारा रसायनांचा बेसुमार वापर, मग होणारे बागेवरचे दीर्घकालीन दुष्परिणाम हे चक्र अन्यथा नवं नाही. आपल्या लाडक्या आंब्याबद्दल- उत्तर प्रदेश ते रत्नागिरी- हेच चित्र आहे, ही दु:खाची बाब वाटते. अशा वेळेला अकबरापासून प्रेरणा घेऊन कुणा बड्या उद्याोगसमूहानं जामनगरला फुलवलेली आमराई वाचून दिलासा मिळतो. त्यानिमित्तानं शेतीतल्या आणखी एका लोकप्रिय विषयाची चर्चा होते, तो म्हणजे मध्यस्थ किंवा व्यापारी. शेतीतले आजार या मध्यस्थांमुळे आहेत, अशी शहरी चर्चा आपण नेहमी ऐकतो. या पुस्तकाचा फायदा असा की आंब्याच्या संदर्भात तरी या आकलनात किती तथ्य आहे, हे आपल्याला लेखक अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी बोलून दाखवून देतात. हवामान, कीड ते वाहतुकीतल्या नुकसानापर्यंत या व्यापारातल्या अनेक जोखमी आणि शेतकरी- व्यापारी जोडगोळी त्या कशा हाताळतात, याची कहाणी सरधोपट समजांपेक्षा अधिक सविस्तर लक्षात येते.

पण या पुस्तकातली एक रंजक गोष्ट निर्यातीची आहे. नुकत्याच ट्रम्प प्रशासनाच्या काळात हार्ले डेव्हिडसन बाइकवरचा कर भारतानं कमी केल्याच्या बातम्या वाचल्या. २००७ मध्येही भारतानं याच मोटरसायकलीवरचे आणि त्या बदल्यात अमेरिकेनं आंब्यावरचे निर्बंध सैलावले होते. अर्थात तरीही आंब्याला अमेरिकेत जाण्याआधी बऱ्याच प्रक्रिया पार पाडाव्या लागतातच. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात सर्वाधिक आंबा उत्पादित होतो, इथला दर्जा इतर देशांपेक्षा कितीतरी सरस आहे, पण तरीही भारतीय आंब्याची निर्यात मेक्सिको, ब्राझील, (प्रक्रियेनंतर) हॉलंड वगैरे देशांहून होणाऱ्या निर्यातीपेक्षा कमी आहे. अमेरिकेत विकला जाणारा जवळपास ८० टक्के आंबा भारतातून नाही तर मेक्सिको, पेरू आणि इक्वेडोर या दक्षिण अमेरिकी देशांतून येतो. आपल्या शेतकऱ्याला किती संधी आहे आणि भारतीय यंत्रणा त्याचा फायदा घेण्यात किती कमी पडतात, हेही या निमित्तानं पुन्हा अधोरेखित होतं.

तुम्हाला आंब्याची कोणती जात सर्वाधिक आवडते, हा अखिल भारतीय प्रश्न आहे. ज्या सहजपणे मराठी माणूस हापूस म्हणतो, तेवढ्याच आग्रहाने उत्तर भारतीय दशहरा म्हणू शकेल. आणि अगदी आपल्याकडेही पायरी किंवा तोतापुरीचे चाहते आहेतच. पण तुम्ही भारतभराची भ्रमंती फक्त आंब्याच्या आधारानं करायची ठरवली, तर हे पुस्तक तुम्हाला सहज गुंतवून ठेवेल.

समाजाच्या आणि व्यक्तीच्याही आयुष्याशी निगडित एवढ्या जवळून संबंधित असलेल्या या फळावर यापूर्वी कोणी एवढा विचार करून का लिहिलं नाही, असा प्रश्न हे पुस्तक वाचताना सारखा पडत राहतो. पण एक लक्षात ठेवायला हवं. एक विशिष्ट उद्देश घेऊन सरळ रेषेत प्रवास करणारं हे नॅरेशन नाही. आंबा भले इतिहास, धर्म, व्यापार, संस्कृती, राजकारण, पाकशास्त्र, विज्ञान, व्यापार अशा विभिन्न क्षेत्रांत सापडत राहिला, तरी या सगळ्या गोष्टींना तार्किकदृष्ट्या जोडणारा तो दुवा नव्हे! लेखकाचा तसा दावा किंवा उद्देशही दिसत नाही. आंब्याच्या आमराईतून रमतगमत फिरत जावं, तसा हा प्रवास आहे. त्यामुळे त्यात थोडं भरकटलेपण आहे, थोडा तोचतोपणा किंवा काहीशी पुनरुक्तीही! थोड्याशा गमतीनं सांगायचं तर काही वेळा लेखक ‘आंबा ठेवतो बाजूला आणि झाडंच मोजण्यात रमतो’, असं म्हणता येईल. पण एका अर्थानं हे पुस्तक फक्त आंब्याबद्दल नाहीच. आंब्याच्या निमित्तानं ते आपल्या देशातल्या जैववैविध्याबद्दल आहे, हरवत चाललेल्या हिरवाईबद्दल आहे, आपल्या वारशातले किती आनंद आपण गमावले आणि तरीही आपल्या नकळतसुद्धा किती तगून राहिलेले आहेत, याबद्दल आहे. तुम्हाला आवडत असलेल्या जातीच्या मिठास आंब्याप्रमाणे याही आनंदाची चव हे पुस्तक संपल्यावर तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते, हीच या पुस्तकाची गंमत आहे.

मँजिफेरा इंडिका

लेखक : सोपान जोशी

प्रकाशक : अलेफ बुक कंपनी

पृष्ठे : ४३२ ; किंमत : ७९९ रु.

meeajit@gmail. com

Story img Loader