पुस्तके वर्तमान मांडतात, वर्तमानाची इतिहासात रुजलेली पाळेमुळे शोधून दाखवतात, भविष्यात डोकावण्यासाठी कवाडे खुली करून देतात. २०२२मधील लेखनव्यवहाराकडे दृष्टिक्षेप टाकताना असे काल-आज-उद्याचे अनेक संदर्भ समोर येतात. महासाथीच्या धक्क्यातून बाहेर पडणारे जग, भारत-चीन संबंधांतील वाढत गेलेला तणाव, रशिया-युक्रेन युद्ध, जगभरातील वाढता धार्मिक कट्टरतावाद, बळावत चाललेल्या हुकूमशाही वृत्ती या साऱ्याचे प्रतिबिंब वर्षभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांत उमटले. या घडामोडींची नोंद ‘बुकमार्क’ नेहमीच ताज्या पुस्तकांतून घेत आले आहे. या पानावर दखल घेण्यात आलेल्या काही पुस्तकांचे पुनरावलोकन..
द डार्क अवर- इंडिया अंडर लॉकडाउन्स
हे पुस्तक कोविडकाळात ज्या व्यक्ती रुग्णालयांत, रस्त्यांवर, समाजात कार्यरत होत्या त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे. विविध क्षेत्रांशी संबंधित नऊ लेखकांनी कोविडकाळातील त्यांचे अनुभव रिपोर्ताज स्वरूपात लिहिले आहेत. काहींनी परिस्थितीचे विश्लेषण केले आहे, काहींनी थेट व्यवस्थेवर टोकदार टीका केली आहे.
‘माय लाइफ इन फुल – वर्क, फॅमिली अॅण्ड अवर फ्यूचर’
इंद्रा नूयी यांचे हे आत्मकथन रंजक शैलीत लिहिले आहेच, पण त्यांचे कर्तृत्व लेखनात नव्हे, तर व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडण्यात दडल्याचे दिसून येते. त्यांचे बालपण, आव्हाने, ‘पेप्सी को’मधील त्यांची दमदार वाटचाल याविषयी जाणून घेण्याची संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळते.
‘इंडिया व्हर्सेस चायना : व्हाय दे आर नॉट फ्रेण्ड्स’
भारत आणि चीन यांनी एकमेकांकडे खुलेपणाने पाहिल्याखेरीज संबंध सुधारणार नाहीत, याची जाणीव देणारं हे पुस्तक आहे. कांती बाजपाई यांनी भारत आणि चीन यांच्यातील संबंध ६० वर्षांहून अधिक काळ विस्कळीत का आहेत, हा प्रश्न या पुस्तकात हाताळला आहे. या दोन देशांची एकमेकांबद्दलची धारणा, त्यांची परिमिती, मोठय़ा शक्तींबरोबर त्यांची धोरणात्मक भागीदारी आणि त्यांच्यातील सामर्थ्य-विषमता यावरून उद्भवलेले मतभेद या मुद्दय़ांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
‘हाऊ सिव्हिल वॉर्स स्टार्ट अॅण्ड हाऊ टु स्टॉप देम’
कोणत्या देशांमध्ये यादवी युद्धे घडली, कोणते देशच त्यामुळे दुभंगले आणि कोणत्या देशांतील राजकीय व्यवस्थांनी स्वत:ला यापासून दूर राखले याचे विवेचन बार्बरा वॉल्टर यांनी या पुस्तकात केले आहे. हा सारा अभ्यास केल्यानंतर त्यांना अमेरिकेसंदर्भात कोणत्या चिंता का वाटतात, याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे.
माय इयर्स इन ‘बीसीसीआय’ : ऑन बोर्ड टेस्ट, ट्रायल अॅण्ड ट्रायम्फ
बीसीसीआय, एमसीए यासारख्या क्रिकेटविषयक आस्थापनांमध्ये महत्त्वाच्या पदांवर वावरलेल्या व्यवस्थापकाच्या नजरेतून दिसणारे क्रिकेट कसे असू शकते, याची झलक दाखवणारे रत्नाकर शेट्टी यांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकात भारतात रुजलेल्या क्रिकेट संस्कृतीची ओळख करून देण्यात आली आहे. या संस्कृतीचे विश्लेषणही करण्यात आले आहे. कोणत्याही संस्थात्मक व्यवस्थेत असते तसे संघटक आणि त्यांचे राजकारण इथेही दिसते.
रुमर्स ऑफ स्प्रिंग
काश्मीरमधील सततची संचारबंदी, गोळीबार आणि लष्करी ताफ्यांचे आवाज अशा वातावरणात मृत्यूच्या छायेत वाढलेल्या एका किशोरवयीन मुलीच्या जीवनाचे हृदयद्रावक वर्णन या पुस्तकात आहे. फराह बशीर यांनी स्वानुभवातून मांडलेले हे वास्तव मानवतेच्या दृष्टिकोनातून काश्मीरचा विचार करण्यास भाग पाडते.
ट्रान्सलेटिंग मायसेल्फ अॅण्ड अदर्स
झुम्पा लाहिरी या अमेरिकेतच वाढलेल्या भारतीय पिढीच्या प्रतिनिधी. वयाच्या चाळिशीनंतर इटालियन भाषा आत्मसात करण्यास सुरुवात करणाऱ्या लाहिरींकडे गेल्या सुमारे दीड दशकात इटालियन साहित्याच्या वाचन, चिंतन, लेखन आणि अनुवादातून अनुभवाची शिदोरी जमा झाली आहे. हे अनुवादाविषयीचे पुस्तक ती शिदोरी उघडून दाखविते.
‘सुमित्रा अॅण्ड अनीस’
भारतातच, पण एका वेगळय़ा काळात घडलेली ही आंतरधर्मीय प्रेमकथा आहे. ती वाचकाला आजच्या काळात एक धडा देते तो म्हणजे, लग्न करण्यासाठी प्रेम पुरेसे आहे. प्रेमकथेइतकेच पाककृतींना महत्त्व देणाऱ्या या पुस्तकात प्रतिबिंबित झालेली भारताची प्रतिमा, आज लादल्या गेलेल्या प्रतिमेपेक्षा सर्वसमावेशक आहे.
‘द बिट्रेअल ऑफ अॅन फ्रँक’
‘डायरी’तून गेल्या ७५ वर्षांत अनेक भाषांत पोहोचलेली अॅन फ्रँक ४ ऑगस्ट १९४४ रोजी पकडली गेली आणि नाहीशीच झाली. कुणी केले हे? याचा शोध घेतल्यावर नेमका माणूस सापडला; पण त्याहीपेक्षा समाजही दिसला! अॅन फ्रँकची स्मृती तिच्या डायरीने गेली ७५ वर्षे जिवंत ठेवली आहे. हे पुस्तक ‘ज्यूंच्या नरसंहारावरचे टिपिकल पुस्तक’ नाही; तर टोकाचा दबाव असताना समाज कसा वागतो त्याचे हे चित्रण आहे.
‘द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर – माय बा’
महात्म्याच्या पत्नीचे आयुष्य कसे असेल, आव्हाने काय असतील, याचे उत्तर देणारे पुस्तक. गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी यात कस्तुरची कस्तुरबा होण्यापर्यंतच्या प्रवास रेखाटला आहे. त्यांच्या रोजनिशी लेखनापासून, सत्याग्रहापर्यंतच्या अनेक घटना आणि सवयींविषयीची माहिती यातून मिळते.
स्टालिन्स लायब्ररी- अ डिक्टेटर अॅण्ड हिज बुक्स
क्रूरकर्मा हुकूमशहा ही जोसेफ स्टालिनची एकतर्फी ओळख. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अभ्यासक, संपादक, द्रष्टा नेता असे विभिन्न पैलू होते. मात्र ब्रिटिशांचे धोरण टोकाचे स्टालिनविरोधी होते. परिणामी भारत सरकारची (ब्रिटिश इंडिया) प्रसारमाध्यमे स्टालिनबद्दल चांगले काही लिहीत नसत. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सकारात्मक पैलूंचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
‘द फॅण्टम प्लेग : हाउ टय़ुबरक्युलॉसिस शेप्ड हिस्ट्री’
क्षयरोगाचे अरिष्ट एवढे पुरातन असूनही मानवाला अद्याप त्याच्याशी दोन हात करण्यात यश आलेले नाही. विद्या कृष्णन आपल्या ‘फॅण्टम प्लेग- हाउ टय़ुबरक्युलॉसिस शेप्ड हिस्ट्री’ या पुस्तकातून या अपयशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतात. पूर्वग्रहांमुळे या क्षेत्रातील संशोधनाला बसलेले हादरे, आजही आरोग्य क्षेत्रात या संदर्भात असलेले अज्ञान, बडय़ा औषध कंपन्यांच्या हातात एकवटलेली सत्ता, भारतासह बहुतेक देशांमध्ये क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळणे अशा अनेक प्रश्नांचा आढावा यात घेण्यात आला आहे.
‘फाइंडिंग मी’
मी कुणी आहे, याची जाणीवच नसणारी एक ‘कुरूप’ मुलगी, वयात आल्यावर, नाटकात काम मिळाले तेव्हा आत्महत्येचा विचार विसरली. ‘ऑस्कर’ मिळवणारी अभिनेत्री ठरली! अभिनेत्री व्हायोला डेव्हिस यांचे हे आत्मचरित्र आहे. दारुडे वडील, आईला होणारी मारहाण, शाळेत होणारा अपमान या साऱ्यात आत्मविश्वास गमावून बसलेल्या व्हायोलाचा ऑस्कर विजेतेपदापर्यंतचा प्रवास या पुस्तकातून वाचता येतो.
लिसन टू माय केस: व्हेन विमेन अप्रोच द कोर्ट्स ऑफ तमिळनाडू
तमिळनाडूतील २० महिलांच्या प्रेरणादायी कायदेशीर लढय़ांचे निवृत्त न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी केलेले हे विश्लेषण आहे. पोलिसांच्या दडपशाहीपासून ते धर्माचे पालन करण्याच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारापर्यंत विविध प्रश्नांना या कथा स्पर्श करतात. हा लढा जरी प्रेरणादायी असला, तरी परिस्थितीत आजही काहीच बदल झालेला नाही, याची खंत ‘जयभीम’मुळे प्रख्यात झालेल्या न्या. चंद्रू यांचे पुस्तक वाचताना वाटत राहाते.
‘अंडरमायिनग द आयडिया ऑफ इंडिया’
न्या. गौतम पटेल यांचे हे पुस्तक आहे. भारत ही संकल्पना अतुल्य, अभेद्य अशीच असल्याचा विश्वास असल्यानेच ती क्षीण तर होत नाही ना अशी काळजी वाटू शकते. न्या. पटेल हे वाचन आणि विचारशक्ती या आयुधांनिशी या विषयांवर चर्चा करतात. त्यामुळे, ती वाचनीय ठरते. न्यायतत्त्वांचा ऊहापोह या पुस्तकात आहेच, पण वाचलेल्या अनेक पुस्तकांचा संदर्भही न्या. पटेल देतात. त्यांचे हे वाचन दैनंदिन बातम्यांपाशी येते, पण त्यावर त्यांनी केलेले भाष्य मात्र कालातीत ठरते.
अनमास्किंग इंडियन सेक्युलॅरिझम
देशातील हिंदू-मुस्लीम समीकरण या विषयावर वस्तुनिष्ठ चर्चा किंवा विचारविनिमय कधी झालाच नाही. आता हा विषय देशाच्या घटनात्मक चौकटीसमोर प्रश्नचिन्ह म्हणून मांडला जात आहे. खरोखरच तशी स्थिती येऊन ठेपली आहे का, याचा आढावा घेण्याचा उत्तम प्रयत्न पत्रकार हसन सरूर यांचे पुस्तक करते.
द एस्केप आर्टिस्ट
‘गार्डियन’चे वार्ताहर जोनाथन फ्रीडलंड यांनी लिहिलेल्या ‘द एस्केप आर्टिस्ट’ या नवीन पुस्तकात रुडॉल्फ व्हरबा यांच्या अभूतपूर्व सुटकेच्या थरारक प्रवासाची कथा आहे. त्याचबरोबर हंगेरीतील दोन लाख ज्यूंचे हत्याकांड थांबवण्यासाठी त्यांच्या साक्षीचा किती उपयोग झाला याचे विश्लेषणही यात आहे.
‘द लास्ट वॉर : हाऊ ‘एआय’ विल शेप इंडियाज फायनल शोडाऊन विथ चायना’
दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या ‘फोर्स’ या संरक्षणविषयक इंग्रजी मासिकाचे सहसंस्थापक व संपादक असलेल्या प्रवीण सॉनी यांचे हे पुस्तक ‘एआय’ वापरून चीन कोणते युद्ध लादेल याच्या कल्पना मांडते. या कल्पना खऱ्या ठरल्या तर काय, यावर विचार करण्यास भाग पाडते.
‘बिफोर द बिग बँग’
अनेक विश्वं पसरत असतात, हा केवळ सिद्धांत न उरता गणितांआधारे ‘शोध’ ठरवणाऱ्या संशोधिकेची- लॉरा मेर्सिनी-हॉटन यांची ही आत्मकथा आहे. पुस्तक रंजक आहे पण ‘सायन्स फिक्शन’ नाही. एका क्रांतिकारक संशोधनाच्या वाटचालीची, सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितलेली ती सुरस आणि चमत्कारिक कहाणी आहे.
बीइंग द चेंज – इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी
गांधीजींपासून प्रेरणा घेत देशविदेशातील अनेकांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. काही प्रसिद्ध झाले, काही उपेक्षित राहिले. तरीही त्यांच्यातील बदल घडवून आणण्याची जिद्द तसूभरही कमी झाली नाही. आशुतोष सलील व बरखा माथुर लिखित या पुस्तकात अशांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यात आली आहे. या सात व्यक्तींनी उभारलेल्या संस्था गांधीवादी प्रेरणेच्या सात दिव्यांसारख्याच आहेत.
इक्वल यट डिफरंट : करिअर कॅटॅलिस्ट्स फॉर द प्रोफेशनल वुमन
अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिता भोगले यांचे हे पुस्तक या क्षेत्रातील महिलांच्या समस्या मांडते, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात, हे देखील सुचवते. त्यातील निरीक्षणे केवळ कॉर्पोरेट क्षेत्रालाच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांसाठी लागू आहेत.
‘क्लाऊड मनी – कॅश, कार्ड्स, क्रिप्टो अॅण्ड वॉर फॉर अवर वॉलेट्स’
पाकीट विसरून घराबाहेर पडलो आणि खिशात एखादी नोटच काय, सुटे पैसेही नाहीत, असे कुणाबाबत घडले तरी सध्या काही बिघडत नाही. प्रवास, बाजारहाट वगैरे सारे व्यवहार मोबाइल फोनद्वारे विनासायास पार पडतात. पण हे परिवर्तन खरेच नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे काय? ब्रेट स्कॉट यांचे हे पुस्तक या परिवर्तनाचे- आणि त्यामागील अंत:स्थ हेतूंचेही- मूल्यमापन करते.
‘द एज्युकेशन ऑफ युरी’
जेरी पिंटो यांची ही कादंबरी जितकी एका बुजऱ्या पण वयपरत्वे बंडखोर तरुणाच्या ‘प्रौढ होण्या’विषयी, तितकीच ती मुंबईबद्दल आणि १९८०च्या दशकातल्या मानवी ऊर्जेविषयीही भरपूर सांगत राहाते. तिच्यातले ‘संदेश’ आपापल्या पातळीवरून घेता येतात. ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असल्याचा संशय काही अंशी योग्य असला तरी ती आत्मशोधाची गोष्ट आहे हे अधिक खरं.
आंबेडकर : अ लाइफ
शशी थरूर यांच्या या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात चरित्र/ विचार-ओळख आहे, तर दुसऱ्या भागात गांधी-आंबेडकर तुलना, डॉ. आंबेडकरांचे हिंदू धर्माबद्दलचे परखड विचार, इझाबेल विल्किन्सन ते याशिका दत्ता यांची डॉ. आंबेडकरांबद्दलची निरीक्षणे यांचा समावेश आहे. दुसऱ्या भागात संदर्भाची मात्रा अंमळ अधिकच आहे.
अ डिसमॅन्टल्ड स्टेट
‘काश्मीर टाइम्स’ या दैनिकाच्या कार्यकारी संपादक असलेल्या अनुराधा भसीन यांचे हे पुस्तक. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात त्यांचे कार्यालय बंद करण्याची कारवाई झाली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत तिथे काय बदल झाले, याचा लेखाजोखा घेणारे हे पुस्तक आहे. ‘रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्ही काश्मिरात लोकशाही आणतो आहोत’ हा सरकारी दावा कितपत खरा, याचा शोध यात घेण्यात आला आहे.
‘नॉव्हेलिस्ट अॅज अ व्होकेशन’
मुराकामी यांच्या ‘नॉव्हेलिस्ट अॅज ए व्होकेशन’ या पुस्तकाची काहीशी ‘लेखक होऊ पाहणाऱ्यांना कादंबरी लिहिण्याचा सल्ला’ अशा प्रकारची जाहिरात होत असली, तरी ते तसे अजिबातच नाही. ‘व्हॉट वी टॉक अबाऊट व्हेन वी टॉक अबाऊट रिनग’ या लेखनविषयक आत्मचरित्राचा हा पुढला भाग म्हणता येईल.
इन हार्ड टाइम्स
मनोज जोशी, प्रवीण स्वामी, निष्ठा गौतम यांनी संपादित केलेला लेखसंग्रह आहे.भारताच्या संरक्षण क्षेत्रासमोर कोणती आव्हाने आहेत? करोनापश्चात आर्थिक स्थितीत संरक्षणावरील खर्चाची गणिते कशी सोडवावी लागतील, याचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
बुकरायण
ग्रंथविश्वातील मानाच्या बुकर पुरस्कारासंदर्भातील घडामोडी ‘बुकमार्क’ने मराठी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. पंकज भोसले यांनी सलग सातव्या वर्षी ‘बुकरायण’ या सदरातून विजेत्या पुस्तकासह बुकरच्या यादीतील पुस्तकांचेही रसग्रहण केले. यंदा ‘सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ या शेहान करुणातिलक लिखित पुस्तकाला हा बहुमान मिळाला. या पुस्तकाबरोबरच ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’, ‘ट्रिकल वॉकर’, ‘ओह विल्यम’ या पुस्तकांचाही लेखाजोखा यंदा घेण्यात आला.