प्राचार्य गो. रा. परांजपे यांनी संपादिलेला ‘वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा कोश’ सन १९६९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. त्यास लिहिलेल्या प्रस्तावनेतून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वैज्ञानिक परिभाषा व संकल्पना मराठी भाषेत आणणे वा निर्माण करणे या प्रक्रियेमागील दृष्टी स्पष्ट केली आहे.
या कोशात गणित, वास्तव (भौतिकशास्त्र) व रसायन या तीन मौलिक विज्ञानांच्या संज्ञांच्या व्याख्या समाविष्ट केल्या गेल्याचे सांगून तर्कतीर्थ प्रस्तावनेत म्हणतात, ‘‘मराठीत विज्ञानाचे लेखन करणाऱ्यांची मुख्य अचडण असते ती पर्यायी वैज्ञानिक संज्ञांची उणीव. ती दूर करण्याचा प्रयत्न अनेक कोशकारांनी कोशिनिर्मिती करून केला आहे. शासन, विद्यापीठे इ. संस्था यासंदर्भात प्रयत्नशील आहेत. यात एकसूत्रता असण्याची गरज आहे. एकाच संज्ञा अथवा संकल्पनेसाठी अनेक पर्याय निर्माण होण्यातून मतभेद व दिशाभेद निर्माण होतात. मूलत: संज्ञा निर्मितीची प्रक्रिया ही त्या त्या भाषेच्या प्रकृतीशी मेळ खाणारी असायला हवी. विज्ञानातील बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय पश्चिमी संज्ञा या ग्रीक, लॅटिन भाषेच्या सावटाखाली तयार झाल्या आहेत. त्यांचे पश्चिमी भाषांशी असलेले संवादित्व अबाधित राहते. हे लक्षात घेता भारतीय भाषांच्या प्रकृतीशी मेळ बसेल, अशा संज्ञा व परिभाषा तयार करणे योग्य ठरेल. यासंदर्भात जे प्रयत्न भारतात झाले, त्यात अरबी, फारसी रूढ शब्द काढून टाकण्याचा उद्याोग शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्या पंथाने केला आहे. संस्कृत भाषेच्या आग्रहातून हे घडले आहे.’’
‘‘तंत्रज्ञान व विज्ञान यासंबंधी परिभाषा व संज्ञा तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्या भाषा व साहित्य हे अजून परावलंबी व अनुकरणात्मक अवस्थेत आहे. त्यामुळे आपणास दीर्घकाळ पश्चिमी भाषांवर यासंदर्भात अवलंबून राहावे लागणार आहे. त्याजागी संस्कृत शब्दांचा आग्रह धरल्यास विद्यार्थी व शिक्षकांचा मूलस्थानीच वैज्ञानिक ज्ञानभांडाराशी असलेला संबंध तुटेल. यामुळे त्यांना दुबार श्रम पडतील. रसायनशास्त्रातील मूळ १०३ मूलद्रव्यांच्या संज्ञा जशाच्या तशा (पश्चिमी भाषेतील) स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल. प्राणवायू (ऑक्सिजन), वायू (गॅस) यात पर्याय दिले तरी मूळ संकल्पना संबंधांचा विचार महत्त्वाचा ठरतो. हे लक्षात घेता या कोशातील परिभाषा व संज्ञा तयार करताना माध्यममार्ग स्वीकारला गेला आहे. शब्द, संज्ञा, परिभाषा निर्मिती, प्रत्यक्ष वापर, व्यवहार, संशोधनाधारित होतो, तेव्हा ती पद्धत अन्वर्थक ठरते. वाक्यरचनेतील गरजेनुसार शब्द निर्मिती जशी उपयुक्त ठरते, तसेच इथेही आहे. कृत्रिम संज्ञांना अर्थ नसतो.’’
‘‘अगोदर शब्द निर्मिती आणि नंतर त्यांचा भाषेत वापर हा उलटा क्रम आहे. त्यातही शुद्धीकरण व संस्कृतकरणाचा अट्टहास अशास्त्रीय होय. यासंदर्भात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, पश्चिमी भाषा समृद्ध झाल्या, त्या अन्य भाषांतील शब्द स्वीकारून. जे पदार्थ, ज्या कल्पना आपल्यापाशी नाहीत, त्यांचा स्वीकार म्हणजे भाषासमृद्धी! पदार्थ व कल्पनांचे शब्द नैसर्गिकपणे व्यवहारातून आले पाहिजेत, शब्दनिर्मितीतून नाही. पश्चिमी विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या संज्ञा व परिभाषा स्वभाषेत उचलून घेऊन आत्मसात करण्यात अनमान करू नये. त्याचबरोबर देशी भाषा व संस्कृतमधील पर्यायी अन्वर्थक रूपे घेता आल्यास घ्यावीत. विज्ञान व तंत्रविकास जगात अतिवेगशाली आहे. तो वेग आपल्यात येण्यास अवसर आहे. आपण अनुकरणशील स्थितीत आहोत. अशा स्थितीत शब्दांचा स्वीकार हितावह ठरतो.’’
‘‘हा कोश एका अर्थाने व्याख्याकोश होय. प्राचार्य गो. रा. परांजपे शिक्षक होत, ते वैज्ञानिक नाहीत. वैज्ञानिक व तंत्रज्ञ स्वभाषाभिज्ञ असतातच असे नाही. शब्दांना अर्थ प्राप्त करून देणारी पायरी म्हणून या व्याख्याकोशाकडे पाहायला हवे’’
ही प्रस्तावना म्हणजे संज्ञा व परिभाषा निर्मिती प्रक्रिया आणि उद्देश, भाषाशुद्धी आणि भाषासमृद्धी यांविषयी तर्कतीर्थांनी केलेले प्रकट चिंतन होय. त्यात कोशकाराच्या भूमिका, कार्यपद्धतीचा झालेला ऊहापोह म्हणजे अनुभवातून निर्माण झालेले ज्ञानसंचित म्हणून त्याकडे पाहावे लागेल. तर्कतीर्थांनी विविध कोशांना लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची भाषा निर्मिती प्रक्रियेतील प्रगल्भता दर्शवितात.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com