संगीत रंगभूमी आता जवळजवळ अस्ताला गेली आहे. तरीही अधूनमधून काही संगीत नाटकांचे प्रयोग होतातही, पण ते अपवाद म्हणून. नुकतेच ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक रंगभूमीवर आलेले आहे आणि ‘मानापमान’वर आधारित चित्रपटही. या योगायोगाच्या तिठ्यावर ‘सं. मानापमान’मध्ये धैर्यधर आणि लक्ष्मीधर या दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने पेलणारे गायक नट अरविंद पिळगावकर यांचे निधन व्हावे हा दुर्दैवी योग म्हणावा लागेल. त्यांचा बालपणी नाटकाशी फारसा संबंध आला नव्हता. पण विल्सन कॉलेजमध्ये मात्र ‘मदनदहनम्’ या संस्कृत सांगीतिकेत त्यांनी पहिल्यांदा काम केले आणि त्यांना रंगभूमीची चटक लागली. त्यांचे सहाध्यायी संगीतज्ञ अशोक रानडे यांनी ते सिनेमांतील गाणी तंतोतंत गातात म्हणून त्यांनी संगीत शिक्षण घ्यावे असा आग्रह धरला. तेव्हा त्यांनी पं. के. डी. जावकर यांचे शिष्यत्व पत्करले. गिरगावात राहत असल्याने त्यांची साहित्य संघात जा-ये होतीच. त्याच दरम्यान त्यांनी एका गुजराती नाटकातही काम केले होते. याच दरम्यान साहित्य संघाच्या ‘यशवंतराव होळकर’ या नाटकात काम करण्यासाठी त्यांना विचारणा झाली आणि त्यांनीही त्यास लगेेचच होकार दिला. त्यात दाजी भाटवडेकर आणि दामू केंकरे प्रमुख भूमिका करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इथून त्यांच्या व्यावसायिक नाट्य कारकीर्दीला सुरुवात झाली. दाजी भाटवडेकरांनी त्यांना नाटकाचे प्राथमिक धडे दिले. नंतर ‘सं. वासवदत्ता’तील भूमिका त्यांच्याकडे चालून आली. या नाटकाच्या योगाने त्यांची पं. जितेंद्र अभिषेकी बुवांशी गाठ पडली आणि पुढे त्यांचे संगीत शिक्षण त्यांच्याकडे सुरू राहिले. त्यानंतर बुवांनीच त्यांना पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडे संगीताच्या पुढील शिक्षणासाठी पाठवले. तिथे त्यांच्या पोतडीत अनवट रागांची भर पडली. एकीकडे त्यांची नाट्य कारकीर्द जोमाने सुरूच होती. ‘एकच प्याला’, ‘संत कान्होपात्रा’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘धाडिला राम तिने का मनी’, ‘नयन तुझे जादूगार’, ‘पुण्यप्रभाव’, ‘बावनखणी’, ‘मृच्छकटिक’, ‘प्रीतिसंगम’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विठो रखुमाय’, ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. सौभद्र’… अशी त्यांची एकापाठोपाठ एक नाटके येत गेली. भूमिकेचा सखोल अभ्यास, गाण्याची उत्तम जाण, भान, भावपरिपोष आणि व्यावसायिकता या गुणांमुळे ते अल्पावधीतच संगीत रंगभूमीचे एक आधारस्तंभ बनले.

हेही वाचा >>> पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार

उंचनीच बांधा, रुबाबदार, देखणे व्यक्तिमत्त्व, गाण्यातली समज आणि खोली यांनी ते अनेकविध भूमिकांना पुरेपूर न्याय देऊ शकले. पण आपण नायकाच्याच भूमिका करणार असा अट्टहास मात्र त्यांनी कधीही केला नाही. उपनायक, खलनायक आणि चरित्र भूमिकाही त्यांनी तितक्याच आवडीने साकारल्या. विनोदाची उत्तम जाण त्यांना होती. त्यामुळे चतुरस्रा अभिनेता म्हणून त्यांचा बोलबाला झाला. एकीकडे त्यांनी संगीत रंगभूमीचा अभ्यासही जारी ठेवला होता. त्यातून त्यांनी संगीत रंगभूमीचा इतिहास, भूगोल, त्यातली वळणेवाकणे, स्थित्यंतरे, अनेकानेकांचे योगदान, त्यासंबंधातले किस्से सांगणारा एक रंजक कार्यक्रमही सादर केला. त्यांनी गद्या नाटकांतून मात्र ठरवूनच काम केले नाही. नाटकातून निवृत्ती पत्करल्यानंतर त्यांनी विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे आयोजित नाट्यसंगीत प्रशिक्षण वर्गात तरुण पिढीला संगीत प्रशिक्षण देण्याचे कामही केले. साहित्य संघाच्या कार्यातही त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे. त्यांच्याकडे अनेक पुरस्कार चालून आले. त्यातला शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या कारकीर्दीचा यथोचित गौरव करणारा होता. त्यांच्या जाण्याने संगीत रंगभूमीचा आणखीन एक खांब ढासळला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi singer arvind pilgaonkar life journey zws