It is not death that a man should fear, but he should fear never beginning to live. – Marcus Aurelius प्रख्यात रोमन विचारवंत सेनेका लिहितो की आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग निरर्थक गोष्टींमध्ये जातो, एक मोठा भाग काहीही न करण्यात जातो आणि संपूर्ण जीवन अशा गोष्टी करण्यात जातं जे आपण बहुधा नसतोच. त्यादृष्टीनं, आपण फार अल्पकाळ खऱ्या अर्थानं जगत असतो आणि उर्वरित आयुष्य जगत नसून फक्त वेळ घालवत असतो. तो पुढे जाऊन नमूद करतो की आपला शेवटचा श्वास मृत्यू नसून, मृत्यू नावाच्या दीर्घ प्रक्रियेला पूर्णत्वास नेणारा बिंदू असतो. त्या बिंदूपर्यंत पोहचण्याआधी आपण दीर्घ काळ मृत्यूच पावत असतो. सेनेकाच्या विचारांना दुजोरा देणारा मार्कस ऑरेलिअस हा रोमन विचारवंत लिहितो की, आपल्याला शेवटच्या बिंदूची भीती न वाटता आपण कधी खऱ्या अर्थाने जगायला सुरुवातच केली नाही या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे. शेवटचा बिंदू तर तुलनेने निरुपद्रवी असतो.

सेनेका आणि मार्कस ऑरेलिअस या स्टोइक विचारवंतांच्या उपरोक्त विधानांमध्ये उत्कट अस्तित्वभान आहे. एकूणच स्टोइक विचारवंतांची सूत्रे हादरा देणारी, अस्वस्थ करणारी आणि अंतर्मुख करणारी आहेत. स्टोइसिझम या प्राचीन तत्त्वज्ञानाने ‘स्व’ ला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत विचार मांडले आहेत. खरं तर, प्रखर अस्तित्वभान आणि ‘स्व’ची काळजी (care of the self) स्टोइसिझम, एपिक्युरीअनिझम, सिनिसिझम या तीन महत्त्वाच्या प्राचीन तत्त्वप्रवाहांचा गाभा आहे. लक्षणीय गोष्ट म्हणजे, हे तीन्ही विचारप्रवाह एकाच ऐतिहासिक परिस्थितीची अपत्यं आहेत. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर दिशाहीन झालेल्या ग्रीक विचारविश्वात उदयाला आलेली ही तत्त्वज्ञानं ( philosophies of crisis) आहेत. प्रस्तुत लेखांकात स्टोइसिझम या विचारप्रवाहाची चर्चा करू.

अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोन्ही वाटा अनंताकडे नेणाऱ्या असतात. माणूस या दोन्ही वाटांचा अनुभव घेत असतो. भोवतालच्या जगाविषयी सुरक्षितता, निश्चितता, आत्मीयता वाटते तेव्हा बहिर्मुखतेची शक्यता वाढते; मात्र जेव्हा परिचित संदर्भबिंदू नष्ट होतात, जगाला जोडणारा ज्ञानात्मक धागा खंडित होतो आणि इतरांशी नाळ तुटून परात्मता जाणवते तेव्हा माणूस संकटग्रस्त होतो. असा माणूस अंतर्मुख होऊन अस्तित्वाला मुळापासून प्रश्नांकित करतो. जर्मन विचारवंत हाना आरेंटच्या भाषेत सांगायचं तर, अशा संकटग्रस्त परिस्थितीत अंतर्मुख माणसाचा ( interior man) जन्म होत असतो. स्टोइसिझम या विचारप्रवाहाची प्रेरकशक्ती संकटग्रस्तावस्थेतील अंतर्मुखता ( life of interiority) आहे.

राजकीय महाशक्ती/ नागरिकतेचा शेवट

प्राचीन काळी ग्रीस हा एकसंध देश नव्हता. इसवीसनपूर्व चौथ्या शतकापर्यंत अथेन्स, स्पार्टा, ऑलंपिया, डेल्फी, कोरिन्थ सारखी अनेक स्वतंत्र ग्रीकभाषक शहरराज्यं (सिटी-स्टेटस्) होती. या शहरराज्यांचे आपापसांत कधी सहयोग तरी कधी संघर्ष चालत. अथेन्स हे अडीच-तीन लाख लोकसंख्येचं ‘लोकशाही मूल्यांना मानणारं’ शहरराज्य होतं, तिथल्या तीस हजार ‘नागरिकां’ना राजकारणात प्रत्यक्षपणे सहभाग घेता येत असे. पण इसवीसनपूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीसमध्ये ऐतिहासिक स्थित्यंतरं झाली. मॅसेडोनियाचा राजा दुसरा फिलिप आणि त्याचा वारसदार अलेक्झांडर यांनी ग्रीक शहरराज्यांचा शेवट करून ग्रीक साम्राज्याची मेढ रोवली. परिणामी जुन्या, परिचित लोकशाही मूल्यांवर चालणाऱ्या राज्यसंस्थेचं विघटन होऊन त्याजागी ईश्वरसदृश साम्राज्यवादी राज्यसंस्था जन्माला येऊ लागली.

हा बदल सगळ्यात दूरगामी परिणाम करणारा ठरतो. आधी शहरराज्यांत ‘नागरिकां’ना राज्यसंस्थेविषयी आत्मीयता वाटत असे. त्यामुळे नागरिकता या संकल्पनेला ठोस अर्थ होता. राज्यसंस्थेत सहभाग घेणं, हस्तक्षेप करणं आणि प्रसंगी राज्यसंस्थेचा चेहरामोहरा बदलणं नागरिकांच्या आवाक्यातील गोष्टी असत. त्याउलट विशाल ‘साम्राज्या’त, नागरिकता या संकल्पनेचं विघटन होतं. लोकशाही संपुष्टात येते. समाजातली एकमयता, समाजशीलता उतरणीला लागते. समाजातले घटक बहिर्मुखतेसाठी लागणारा आत्मविश्वास हरवून बसतात. साम्राज्यवादी महाशक्ती एखाद्या महामारीप्रमाणे एका बाजूला सत्तेचं केंद्रीकरण, तर दुसऱ्या बाजूला लोकांचं अणुवादी विलगीकरण करून त्यांना क्वारन्टाइन करते. क्वारन्टाइन माणूस राजकीयदृष्ट्या शक्तिहीन आणि दैववादी असतो. तो अंतर्मुख, आत्मकेंद्री, समाजविन्मुख, अ-राजकीय बनतो. अशा परिस्थितीत अंतर्मुखतेला मध्यवर्ती स्थान देणाऱ्या स्टोइक विचाराचा उदय स्वाभाविकपणे झाला.

सॉक्रेटिक वळणादरम्यान ग्रीक माणसाचा ‘स्वत:ला जाणून घे’ या डेल्फीच्या सुविचारापासून सुरू झालेला प्रवास साम्राज्यवादी वातावरणात ‘स्वत:ची काळजी घे’ या अस्तित्वावादी सूत्रापर्यंत येऊन पोहोचतो. डेल्फीच्या आदेशात सॉक्रेटिसला ज्ञानाची शक्यता दिसली होती. अथेन्सच्या सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक भरभराटीच्या काळात स्वत:ला आणि स्वत:च्या भोवतालला जाणून घेऊन वैश्विक ज्ञानाची मांडणी करण्याचे प्रयोग झालेले होते. पण इसवीसनपूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक विश्वातला ज्ञानात्मक आत्मविश्वास हवेत विरून जातो. अनिश्चित, असुरक्षित, निराशावादी भोवतालात अंतर्मुख माणसासाठी ‘स्व’ आणि ‘स्व’च्या आत दडलेली अदम्य इच्छाशक्ती हा शेवटचा आधार ठरतो.

स्टोइसिझम म्हणजे काय?

इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला झिनो ऑफ सिटिअम या ग्रीक तत्त्ववेत्त्याने ‘स्टोइसिझम’ची मांडणी केली. झिनोनं प्रतिपादित केलेला हा तत्त्वविचार ख्रिासिपस नावाचा अनुयायी पुढे नेतो. नंतर लॅटिन तत्त्वपरंपरेतले सेनेका, एपिक्टेटस आणि मार्कस ऑरेलिअस सारखे दिग्गज तत्त्ववेत्ते स्टोइसिझमला प्रतिष्ठा मिळवून देतात. जवळपास ५०० वर्षांची सलगता लाभलेल्या या तत्त्वप्रवाहात साम्राज्यवादी राजकीय व्यवस्थेतलं संवेदनशील आणि विचारशील मन प्रतिबिंबित होतं.

स्टोइसिझम हा शब्द ‘स्टोइआ’ (stoia) या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. स्टोइआ म्हणजे दुतर्फा दगडी खांब असलेला द्वारमंडप. अथेन्सच्या अशा द्वारमंडपात स्टोइसिझमचा संस्थापक झिनो त्याच्या अनुयायांशी तत्त्वचर्चा करत असे. स्टोइक तत्त्वज्ञ स्वत:ला सॉक्रटिसचे वारसदार समजतात.

स्टोइसिझम आणि एपिक्युरियनिझममध्ये काही साम्य असलं तरी भिन्नताही आहे. एकाच परिस्थितीत उदयाला आलेले हे विचारप्रवाह मृत्यूच्या भीतीला अनाठायी ठरवतात. ओघानंच दोन्ही तत्त्वपरंपरा मृत्यूच्या भयामुळे निर्माण झालेल्या धर्मश्रद्धांचे कर्दनकाळ आहेत. प्रखर अस्तित्वभान आणि ‘स्व’ ची काळजी हा यांच्यातला समान धागा. दोन्ही विचारप्रवाह निसर्गवादी आहेत. स्वत:च्या नैसर्गिक क्षमता ओळखून, त्यांना इच्छाशक्तीच्या बळावर जागृत करून भोवतालाशी सुसंगत जगण्यातच खरा आनंद आहे, हे तत्त्व दोन्ही विचारप्रवाह स्वीकारतात.

मानवी स्वातंत्र्याबाबत स्टोइसिझमची द्वैतवादी भूमिका आहे. स्टोइसिझम मनुष्याच्या अंतरंगाच्या बाबतीत स्वातंत्र्याचा, तर बाह्य जगाविषयी नियतीवादाचा पुरस्कार करतं. ऑरेलिअसच्या शब्दात सांगायचं तर, ‘फक्त मनाला आपण नियंत्रित करू शकतो- बाह्य घटनांना नाही! हे लक्षात ठेवून आपण आपल्यातल्या इच्छाशक्तीचा शोध घ्यावा’

स्टोइसिझमनुसार अंतर्मुख होऊन अंतरंगाचा ताबा घेतल्यास स्वातंत्र्याची अनुभूती होते. बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण आतल्या जीवनाच्या किल्ल्या आपल्या हातात असतात. सतत विचारशील राहून आतल्या गाभाऱ्याची रचना आणि विस्तार करणं माणसाचं नित्याचं कर्तव्य असतं. मार्कस ऑरेलिअस दैनंदिन विचारशीलतेला स्वातंत्र्याचं द्याोतक मानतो. तो म्हणतो, ‘very little is needed to make a happy life; it is all within yourself in your way of thinking.’ त्यामुळे स्टोइसिझमसाठी दैनंदिन चिंतन जणू प्रार्थनेसारखं आहे. स्टोइकांसाठी फिलॉसफी ईश्वराचं स्थान प्राप्त करते. स्टोइकांच्या प्रार्थनेचं विश्लेषण केल्यावर त्यांची जीवनदृष्टी अधिक स्पष्ट होते. ‘ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्यासाठी धैर्य मिळू दे! ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत, त्यांचा स्वीकार निर्विकारपणे करण्यासाठी शांतचित्त लाभूदे! आणि माझ्यासाठी शक्य काय आणि अशक्य काय यांतला भेद कळण्यासाठी शहाणपण मिळू दे!’ थोडक्यात, बाह्य घटनांच्या बाबतीत स्टोइसिझम नियतीवादी आहे. स्टोइकांच्या नियतीवादात आगंतुकतेला स्थान नाही. नियतीला टाळता येत नाही म्हणून फरफटत जाण्याऐवजी स्वेच्छेनं नियतीसोबत जाण्यात खरं माणूसपण आहे.

स्टोइसिझममध्ये ‘प्लेजर’ आणि ‘हॅपीनेस’ यांत भेद स्पष्ट आहे. स्टोइकांचा आनंद सुखदु:खातीत निर्विकार अवस्था आहे. स्वत:च्या भावना आणि वासनांवर स्वामित्व मिळवणं स्टोइसिझमचा गाभा आहे. स्टोइक मनाकडे एखाद्या अभेद्या किल्ल्यासारखं पाहतात. मनाच्या तटबंदीवर सतत काम करत राहणं जेणेकरून बाहेरच्या वादळांचा निर्विकारपणे सामना करता यावा. त्यामुळे स्टोइकांचा दावा आहे की, स्टोइसिझम हे निष्क्रियतेचं प्रतीक नसून ‘निर्विकार कृतीशीलते’चं प्रतीक आहे. स्टोइसिझम अंतर्मुखतेला बहिर्मुखतेची पूर्वअट मानतो. मनोबल, स्पष्टता आणि निर्विकार मनस्थिती हे सर्वोच्च गुण समजले जातात.

थोडक्यात, स्टोइसिझमध्ये तत्कालीन साम्राज्यवादी राज्यसंस्था लोकांच्या आवाक्याबाहेरची महाशक्ती वाटते. अशा ईश्वरसदृश राज्यसंस्थेअंतर्गत सत्तेच्या अतिकेंद्रीकरणामुळे सामाजघटकांतली आत्मीयता लोप पावते आणि परात्मता वाढते. परिणामी बहुतेक मूक होतात आणि मोजकेच अंतर्मुख होऊन स्वत:च्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवू शकतात. त्यामुळे स्टोइसिझम हा एपिक्युरियन तत्त्वज्ञानाप्रमाणे मोजक्यांनाच झेपेल असा प्रखर बुद्धिवादी भौतिकवाद आहे. मात्र त्यातल्या स्वातंत्र्याविषयीचं द्वैत एकाप्रकारे ख्रिास्ती धर्मातील अध्यात्मिक समता आणि सामाजिक विषमता या द्वैताची नांदी ठरतं. त्यामुळे एपिक्युरिअनिझमला झाला, तसा विरोध ख्रिास्ती धर्मसंस्थेकडून स्टोइसिझमला झाल्याचं दिसत नाही.