भारतीय तत्त्वज्ञानातील भौतिकवाद हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित इंग्रजी लेख ‘दि रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ या कलकत्त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी साप्ताहिकात २० एप्रिल, १९५२ रोजी प्रकाशित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अठराव्या शतकातील ज्ञानोदयाने पश्चिमी विचार जगतात जशी वैचारिक क्रांती घडवून आणली, तशी क्रांती भारतीय तत्त्वज्ञानात चार्वाकच्या लोकायत तत्त्वज्ञानाने घडविली. भारतीय तत्त्वज्ञान म्हणून परिचित असलेली जी षड्दर्शने आहेत, ती प्रामुख्याने आध्यात्मिक होत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदान्त ही ती दर्शने होत. या दर्शनांनी कार्य-कारणभावसदृश जिज्ञासा जागविली नाही. ती दर्शने द्वैत-अद्वैताच्या चक्रव्यूहात आत्मा-परमात्मा सृष्टी संबंध शोधत राहिल्यामुळे युरोपात इहवादी विचारसरणीतून भौतिकवाद जन्माला आला, तो वैज्ञानिकतेची कास धरल्यामुळे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या ‘मटेरिअॅलिझम’ ग्रंथात वैज्ञानिक विचारविकासाचा जो आराखडा प्रस्तुत केला आहे, तसा आराखडा षड्दर्शनांमधून प्रस्तुत करता येत नाही. कारण, ती आध्यात्मिक विचार करतात. ती मूल्याधारित आहेत; पण त्यांना शास्त्रीय बैठक नाही. त्यांचे सिद्धांतन करता येत नाही. चार्वाकने यासंदर्भात प्रथम मांडणी केली. युरोपात जसे सॉक्रेटिसला पाखंडी ठरविण्यात आले, तसे चार्वाकबाबतही आपल्याकडे दिसून येते.

त्यांच्या विचारांची उपेक्षा ही भारतीय समाजाची वैचारिक हानी होय. भौतिकतावाद हा मूलत: निसर्गवाद असल्याने त्यात निसर्गाचे सौंदर्य भरलेले आहे. कोणतेही दर्शन निर्दोष असत नाही. भौतिकवादाच्या मर्यादा गृहीत धरूनही ईश्वरवादी विचारधारेपेक्षा विवेकवादी, वैज्ञानिक विचारधारा बुद्धिवादी स्वीकारत आले आहेत.

लेखात तर्कतीर्थांनी म्हटले आहे, अठराव्या शतकातील ज्ञानोदयाने जगाला जाग आणत एकार्थाने जिज्ञासू केले. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानात अशा चिकित्सक विवेकी, जिज्ञासांचा अभाव दिसून येतो. वैज्ञानिक कार्यकारणभावाची प्रवृत्ती भारतीय तत्त्वज्ञानात क्षीण अशा कारणामुळे दिसते की, ते विज्ञानापेक्षा अध्यात्म ओढीत गुंतलेले आहे. त्यात अलौकिक जगाच्या विचारास अधिक महत्त्व आहे. मीमांसा वृत्तीला क्षीण अवकाश हा भारतीय तत्त्वज्ञानास स्थितिशील बनवितो. काव्यातील, वाङ्मयातील रहस्यवाद, मायावाद आणि भौतिक जगातील गूढ उकलण्याची वृत्ती यात लोक-परलोकांचे जे अंतर आहे, ते भौतिकवादास भारतीय तत्त्वज्ञानात फारसा वाव देत नाही. षड्दर्शनांचा विचार करता त्यातील बहुसंख्य अलौकिक व अपवाद भौतिक अनुनयी असणे, यातून ते स्पष्ट होते.

भारतीय धर्मदर्शन व तत्त्वज्ञानातून व्याकरण तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, गणित, ज्योतिष, खगोलशास्त्र यांच्या विकासास गती मिळाली, हे खरे; पण कार्यकारणसंबंध, प्रयोग, पुरावे, निष्कर्ष अशा विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ कसोट्यांवर ही विज्ञाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अणुविज्ञान इ.सारखी शुद्ध विज्ञाने न होता, छद्मा विज्ञानाकडे झुकतात. कारण, ती संभाव्यतेच्या पायावर उभी असल्याचे दिसते. ही गोष्ट खरी की, भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शनांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या विकासात पुनर्रचनेच्या दृष्टीने मोठे योगदान दिले आहे. वेदांच्या प्रारंभिक काळातील वाङ्मयात भौतिकाची जिज्ञासा ही तत्कालीन ऋषी-मुनींमध्ये अधिक होती. कारण, त्या काळी सृष्टीचे आकलन वर्तमानाइतके मानवास झाले नव्हते. पृथ्वीपलीकडच्या अज्ञात विश्वाची तत्कालीन जिज्ञासू वर्गाला अनिवार ओढ नि आकर्षण होते. विशेषत: अंतरिक्ष, ब्रह्मांडाची जिज्ञासा विशेषत्वाने ‘वेद वाङ्मयात दिसून येते. हाच भौतिक विश्वविचाराचा प्रारंभ म्हणून निर्देशित करता येतो. या वाङ्मयात लौकिक जग सुखी करण्यासाठी भौतिक तत्त्वांची आराधना (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) भारतीय तत्त्वज्ञानातील भौतिक तत्त्वांचे अध्ययनच होते. धर्मसाधनेतील अमरत्वाची ओढ व आराधना मानवी जीवन समृद्ध करण्याची धडपड होती. विश्व आणि वैश्विक तत्त्वांचा विचार हा प्रारंभिक भौतिकी विचार होय. नंतरच्या काळात ईश्वर व विश्वसंबंधाच्या चर्चेस उधाण आलेले दिसते. हा काळ विश्वात्मक देववाद मांडणारा काळ होय, असे तर्कतीर्थ या लेखात विशद करतात. बृहदारण्यक उपनिषद काळात पुनर्जन्माचा विचार सुरू झाला. हा इतिहास पाहता भारतीय तत्त्वदर्शने मूलत: भौतिकवादी होती, कालौघात ती अलौकिक तत्त्वांच्या आहारी गेली. प्राथमिक काळातील दर्शनविचार विकास झाला असता, तर भारतवर्ष युरोपासारखे जडवादाजवळ गेले असते, असा तर्कतीर्थांचा विचार माननीय अशासाठी ठरतो की, त्यात सत्य, न्याय तर्क, विवेकाचे महत्त्व दिसून येते.

drsklawate@gmail.com