नरो वा कुंजरो वा… महाभारतातला एक कलाटणी देणारा प्रसंग. संदेशाचे मार्ग खेळ पालटणारे ठरू शकतात याचे हे उत्तम उदाहरण. राज्य करणे म्हणजे केवळ युद्धे करून सीमांचे संरक्षण करणे नसून जनमत बनविणे, त्याला बळकट करणे, प्रसंगी त्याच्याशी छेडछाड करणे, जनतेशी संवाद साधणे, कठीण प्रसंगी संदेशाची देवाणघेवाण रोखणे, इतर देशांत आपल्या फायद्यानुसार कथानके पेरणे आणि त्यांना खतपाणी देणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. कौटिल्याच्या काळापासून या सर्व युक्त्यांचा वापर राज्यकारभारात झाल्याचे आढळते. मात्र २० व्या शतकात संदेशप्रसाराला साथ मिळाली ती तंत्रज्ञानाची. माध्यमतंत्रज्ञानाच्या प्रभावाने युद्धांचे स्वरूपच बदलून टाकले, विचारप्रवाहांना बळकटी दिली. सत्य आणि प्रचार यांच्यातील रेषाही पुसट केल्या. या तंत्रज्ञानाने ठरविले की समाजात कोणाचा स्वर प्रबळ होईल आणि कोणाला इतिहासाच्या पानांतून हद्दपार केले जाईल. माध्यमतंत्राची जागतिक उड्डाणे महायुद्धे ही मोठ्या बदलांचे आरंभबिंदू! अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा सृजनाची आणि विध्वंसाची गती कैकपटीने वाढते. संपर्क माध्यमांनी पहिल्या महायुद्धात एकाच वेळी अनेकांच्या दारात पोहोचण्याचे प्रभावी तंत्र अवगत केले. वृत्तपत्रे, भित्तिपत्रके आणि चित्रपटांच्या माध्यमातून मित्र आणि अक्ष राष्ट्रांनी युद्धासाठी नागरिकांचे जनमत बळकट करण्यास सुरुवात केली. १९१५ मध्ये ब्रिटनने प्रकाशित केलेला ब्राईस अहवाल जागतिक पातळीवर लोकप्रिय झाला आणि जर्मनीविरुद्ध लोकमत एकत्रित झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर्मन अत्याचारांचे वर्णन करण्यात आले होते. ते बनावट असल्याचे नंतर सिद्ध झाले. झिमरमन तार या घटनेत जर्मनीचा मेक्सिकोशी युद्धात लष्करी युती करण्याचा प्रस्ताव उघडकीस आला. त्याच्या व्यापक प्रसिद्धीमुळे अमेरिकेच्या युद्धातील सहभागाच्या निर्धारास गती मिळाली.
माध्यमतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हिटलर एवढा अपवादानेच कुणी केला असेल. जोसेफ गोबेल्सने अस्तित्वात असणाऱ्या सामग्रीचा वापर करून नाझी राजवट अभेद्या आणि दैवी असल्याचा समाज प्रसारित केला व हिटलरला राजमान्यता दिली. ‘द ट्रायम्फ ऑफ द विल’ या चित्रपटात अत्यंत कौशल्याने एकात्मतेचे आणि अजयतेचे प्रतिमान साकारून त्या शासनाच्या आक्रमक विस्तारवादाला वैधता प्राप्त करण्यात मदत केली गेली. याच प्रचारपटाने जर्मनी आर्यांची असून यहुदी नागरिक दुय्यम असल्याचे कथानक पसरविले. अमेरिकन शासनाच्या सहकार्याने निर्मिलेल्या फ्रँक काप्राच्या ‘व्हाय वुई फाइट’ या माहितीपट मालिकेने दुसरे महायुद्ध हे स्वातंत्र्ययुद्ध असल्याचे समीकरण रुजवण्यास सुरुवात केली. त्याचा विस्तार शीतयुद्धादरम्यान होऊन विचारसरणीच्या युद्धात तंत्रज्ञात गुरफटले गेले. सोव्हिएतच्या लोहपडद्यामागे लोकशाहीचे संदेश पोहोचविण्यासाठी ‘रेडिओ फ्री युरोप’ आणि ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ या अमेरिका पुरस्कृत रेडिओ केंद्रांचा शस्त्रासारखा वापर झाला, तर सोव्हिएत पुरस्कृत ‘प्रावदा’ या माध्यमसंस्थेने पाश्चिमात्य जगाला साम्राज्यवादी म्हणून हिणविण्यास सुरुवात केली. १९५६मध्ये हंगेरीवरील सोव्हिएत आक्रमणानंतर बंडखोरांनी गुप्त रेडिओ केंद्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय मदतीसाठी प्रयत्न केला, मात्र सोव्हिएत अवरोधकांनी (जॅमर) तो हणून पडला. याहूनही विचित्र म्हणजे, सोव्हिएत वास्तववादाविरुद्ध ‘सांस्कृतिक स्वातंत्र्या’चा प्रचार करण्यासाठी ‘सीआयए’ने गुप्तपणे अमूर्त अभिव्यक्तीवादी कलाप्रदर्शनांना पाठबळ दिले. यातून माध्यमांचा प्रभाव ‘सॉफ्ट पॉवर’च्या अखत्यारीतही पोहोचतो, हे स्पष्ट झाले. १९६२च्या क्यूबन मिसाइल संकटकाळात, दूरचित्रवाणीवरील बातम्या व सैनिकी हालचालींची थेट दृश्ये यांचा मानसिक परिणाम जागतिक राजकारणात अधोरेखित झाला.
१९७० आणि १९८०च्या दशकात उपग्रह तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे थेट प्रक्षेपण शक्य झाले, १९८९मध्ये बर्लिन भिंत पतनासारख्या घटना लाखो लोकांच्या साक्षीने घडल्या आणि लोकमताच्या रेट्याखाली लोकशाही स्थित्यंतर जलद गतीने घडले. ७० च्या दशकातील व्हिएतनाम युद्ध हा माध्यम प्रभावाचा मैलाचा दगड होता. प्रत्यक्ष युद्धांचे फोटो आणि वार्तांकन, स्थानिकांची निदर्शने, नापामसारख्या रासायनिक अस्त्रांचा अमेरिकेकडून वापर आणि त्यात तडफडणारी कोवळी मुले यांच्या छायाचित्रांना अमेरिकेत मिळालेली प्रसिद्धी यामुळे या युद्धाबद्दल अमेरिकेमध्ये घृणा निर्माण झाली आणि अध्यक्षीय निवडणुकीत तो कळीचा मुद्दा ठरला. तद्वतच पेंटागॉनला आपल्या युद्धनीतीत बदल करावे लागले. ९/११ नंतर अमेरिकापुरस्कृत दहशतवादी युद्धात शीतयुद्धकालीन कथानकांना पुनरुज्जीवित करण्यात आले आणि कम्युनिस्ट या शब्दाऐवजी दहशतवादी हा शब्द त्या बदनामीकरणाच्या साच्यात चपखल बसवला गेला. मध्यपूर्वेच्या गुंतागुंतीच्या राजकारणाला पाश्चिमात्य माध्यमांनी ‘संस्कृतींचा संघर्ष’ अशा सर्वसाधारण चौकटीत बंदिस्त केले, ज्यामुळे पूर्वेकडील समाजांबद्दलच्या पुराणमतवादी पूर्वग्रहांना बळ मिळाले. विकसनशील देशांना ‘पाश्चात्त्य मूल्य’विरोधी ‘इस्लामिक मूल्य’ अशा कृत्रिम विभाजनात अडकवण्याचा प्रयत्न या निमित्ताने पाश्चात्त्य घटकांकडून केला गेला. जेसिका लिंच प्रकरणात, जेसिका नावाच्या महिला सैनिकाला इराक युद्धातील शौर्याचे प्रतीक म्हणून दाखवले गेले. नंतरच्या काळात ती लढताना नव्हे, तर एका अपघातात जखमी झाली होती, हे सिद्ध झाले. सद्दाम हुसेन या इराकी लष्करशहाला दिलेल्या फाशीचे थेट प्रक्षेपण करून अमेरिकेने या लढ्याविरोधातील भावनेला धार दिली आणि इराकी जनतेप्रति सहानुभूतीची लाट निर्माण झाली. अल कायदा आणि आयसिससारख्या संघटनांनी इंटरनेटचा शस्त्र म्हणून वापर करताना प्रचारफिती बनवून त्या माध्यमातून तरुणांना आकर्षित केले आणि भयफितींद्वारे दहशतीची लाटदेखील पसरविली.
देशांतर्गत राजकारण
शासनाच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे हे माध्यमांचे सर्वांत महत्त्वाचे काम! माध्यमांची लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढली त्यामुळे विकासाबरोबरच शासनाला लोकमान्यता मिळण्यास मदत झाली, जेणेकरून वारंवार होणारे देशांतर्गत संघर्ष कमी झाले. एके ठिकाणी तंत्रकुशल पाश्चिमात्य समाजाचे शांततापूर्ण सहजीवन हे वैशिष्ट्य बनले तर दुबळे सरकार, राजकीय आणि सामाजिक अनागोंदी, अंतर्गत यादवी हे आफ्रिकेतील कित्येक देशांचे रोजचे चित्र झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शासन निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याची तंत्रसुविधा नसलेली ही राष्ट्रे आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत मात्र पुढारलेली असतात. लोकशाहीबद्दल विचार करताना माध्यमक्रांतीने जागल्याची भूमिका बजावून लोकमत एकत्रित करण्यास हातभार लावला आहे. १९६० च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांतील वादविवाद पहिल्यांदाच दूरचित्रवाणीवर प्रसारित झाले. थकलेल्या रिचर्ड निक्सन यांच्या तुलनेत लोकांना तरुण केनेडी आकर्षक वाटले. उमेदवाराच्या देहबोलीच्या निवडणुकीवर पडलेल्या प्रभावाचे हे पहिलेच उदाहरण! रोनाल्ड रेगन यांनी कॅमेऱ्याचा कल्पक वापर करून कधी लाकूड तोडताना तर कधी कारखान्यांना भेट देऊन कामगारांच्या पोशाखात छायाचित्रे प्रसिद्ध करून १९८० मध्ये निवडणुकीतील छायाचित्रण वेगळ्या पातळीवर नेले. अमेरिकेतील प्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणात माध्यमांनी दिवसरात्र बातमी चालविल्यामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना जनमताच्या दबावाखाली राजीनामा देण्यास भाग पडले. विरोधकांना ताकद देण्यात माध्यम तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहिली. सध्याच्या काळात # Me_too, # black_lives_matter अशा दुर्बलांचे आवाज मांडणाऱ्या चळवळींना समाजमाध्यमांमुळे गती आली. इतक्यावरच न थांबता या तंत्रज्ञानाने एक पाऊल पुढे जात निवडणुकांच्या निकालात ढवळाढवळ केल्याचे आरोपही २०१६ च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजमाध्यमांवर केले गेले.
रसदपुरवठा हा युद्धे जिंकण्यासाठी कळीचा मुद्दा आहे आणि भविष्य जिंकण्यासाठी समाजात चालणारी कथानके! निरागस चेहऱ्याच्या व्रात्य मुलाप्रमाणे असलेल्या माध्यम तंत्रज्ञानाने आपले दात दाखवण्यास सुरुवात केली आहे. कधी काळी वास्तवदर्शी माहिती पोहोचविण्यासाठी नावाजलेले हे तंत्रज्ञान आता क्षणार्धात सत्याशी छेडछाड करून मयसभा उभी करू लागले आहे. डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाच्या बळावर आजच्या द्रोणाचार्याला हे तंत्रज्ञान अश्वत्थाम्याचा आभासी वधही दाखवू शकते आणि शापित अश्वत्थाम्याला आनंदाने शस्त्र हाती घेतानादेखील! ‘खोट्या वास्तवा’ने अनावृत झालेल्या द्रोणाचार्यांचा क्रुद्ध विध्वंस आणि अगतिक विलाप अशा परिस्थितीत अटळ आहे. मात्र हजारो आभासी अश्वत्थामे उभे करणाऱ्या या माध्यमतंत्राच्या युगात कर्तव्याचा पथ दाखविणारा विवेकी श्रीकृष्ण आणि सत्यनिष्ठ युधिष्ठिर गवसणे ही काळाची गरज आहे!