डॉ. श्रीरंजन आवटे

भारताची संविधान सभा जुन्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भरत होती. हे सभागृह ज्या इमारतीत आहे, ती बांधली गेली होती ब्रिटिश काळात. १९११ साली ब्रिटिश भारताची राजधानी दिल्ली असेल असे ठरवले तेव्हा ब्रिटिशांसमोर दिल्लीची प्रशासकीय दृष्टीने रचना करण्याचे आव्हान होते. त्यामुळे नवी दिल्ली वसवण्याचे काम सुरू झाले. त्यानुसार एडवर्ड ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी नवी दिल्लीमधला सुमारे २६ चौ.किमी. एवढा मोठा दिल्लीचा भाग वसवला. आज हा भाग ‘ल्युटेन्स दिल्ली’ म्हणून ओळखला जातो, तो याच एडवर्ड ल्युटेन्स यांच्यामुळे. आता हा शब्दप्रयोग राजकीय अभिजन समूहाला उद्देशून वापरला जातो.

कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Sevagram Rahul Gandhi BJP and RSS Nagpur Election
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Republic Day 2025 Democracy Constitution Republican System
गणराज्यवादाचा अर्थ शोधताना…
Chandrashekhar Bawankule statement on Criteria for opposition leaders to join ruling party
सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ‘हे’ निकष… चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

ब्रिटिशांचा दिल्ली वसवण्याचा प्रकल्प हा राजकीय महत्त्वाकांक्षेतून आलेला होता. १८५७ पासून मुघल साम्राज्याची राजधानी असलेल्या दिल्लीला जुनी, मागास संबोधत कथित ‘नवी दिल्ली’ आम्ही वसवत आहेत, असे चित्र निर्माण करण्याची ब्रिटिशांची साम्राज्यवादी रणनीती होती. जेम्स मिलसारख्या इतिहासकारांनी इतिहासाची हिंदू, मुस्लीम, ब्रिटिश अशी विभागणी करून मुघल राजे हे कसे क्रूर होते हे अधोरेखित करण्याचा खोडसाळपणा केला. मुघलांचे नामोनिशाण संपवून आपल्या वर्चस्वाच्या खुणा प्रस्थापित करण्याचा हा डाव लक्षात घेऊन इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी मात्र ब्रिटिशांना ‘व्हाइट मुघल्स’ असे संबोधले होते. अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या न्यूनगंडातून सत्तेची भव्यता दर्शवणारी प्रतीके मोठी केली जातात. त्यानुसार भव्यदिव्य इमारती, प्रतीके यांचे अवडंबर माजवले जाते.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : संविधानाचे आस्थाविषय

ब्रिटिशांनी सत्ता गाजवण्याच्या प्रयत्नातूनच दिल्लीची नवी रचना केलेली होती. इ.स.१९१९ मध्ये विधिमंडळाची रचना दोन सदनांची केल्यामुळे नवी इमारत बांधणे गरजेचे होते. १९२१ ते १९२७ या काळात ही इमारत बांधली गेली. १९२७ मध्ये या विधिमंडळात कामकाज सुरू झाले. ब्रिटिश सत्तेचे हे केंद्र झाले.

पुढे संविधान सभा याच सभागृहात भरली. याच सभागृहामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट केला होता. कोणालाही इजा न करता बहिऱ्या झालेल्या संसदेला जागे करण्याचा तो लक्षवेधक प्रयत्न होता. जुलमी सरकारांना जागृत करण्यासाठी असे मार्ग वापरावे लागतात. भगतसिंगने १९२९ साली ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. पं. जवाहरलाल नेहरू यांनी नियतीसोबतच्या काव्यात्म कराराची ललकारी येथूनच दिली होती आणि संविधानाचा मसुदा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला तो इथेच.

त्यामुळेच या सभागृहात संविधानाच्या निर्मात्यांच्या आणि स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय असलेल्या महात्मा गांधी, पं. नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी अशा अनेकांच्या तसबिरी आहेत. लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. मावळणकर यांच्या कार्यकाळात भारतीय संस्कृती, सभ्यता आणि स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित चित्रे या सभागृहाच्या भिंतींवर टांगलेली आहेत.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताची वाटचाल या सभागृहाच्या साक्षीने झाली आहे. सत्ताधारी-विरोधी यांच्यातील वाद-संवाद जुन्या संसदेतील या मध्यवर्ती सभागृहात घडले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अनेक संयुक्त सभा येथेच घडल्या आहेत. हे सभागृह म्हणजे केवळ दगडमातीची एक भौतिक वास्तू नाही तर ती भारतीय संसदेच्या ऐक्याचे प्रतीक आहे. थोडक्यात, जुन्या संसदेतील मध्यवर्ती सभागृह हे केवळ इमारतीच्या मध्यभागी नव्हते तर ते स्वातंत्र्य आंदोलन, संविधान निर्मिती आणि स्वतंत्र देशाची वाटचाल या साऱ्याच घटनाक्रमात मध्यवर्ती होते. विद्यामान पंतप्रधानांनी आता जुन्या संसदेला ‘संविधान सदन’ असे संबोधले जाईल, हे अलीकडेच जाहीर केले आहे. या वास्तूचा ऐतिहासिक वारसा आहे. वास्तू बदलल्याने वारसा बदलत नाही. तो ऐतिहासिक वारसा इतिहासजमा होऊ न देणे चाणाक्ष मतदारांच्या हातात आहे. कारण नेहरूंच्या भाषेत हे ‘लोकशाहीचे मंदिर’ आहे.

poetshriranjan@gmail.com

Story img Loader