मेमरी चिपऐवजी इंटेलनं फक्त लॉजिक चिप बनवाव्यात; त्याही कार्यक्षमतेनं आणि सुसूत्रपणे तयार व्हाव्यात यासाठी अँडी ग्रोव्हनं कोणते कठोर निर्णय घेतले?

अमृतांशु नेरुरकर,‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
Loksatta chip charitra China high tech sector US Chip supply Technology blockade Semiconductor
चिप चरित्र: तैवानचा तिढा!
Lumax Auto Technology Limited
माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा

‘‘इंटेलला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर कंपनीतील प्रत्येकाला ‘ग्रोव्हियन कल्चर’ पुनश्च आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही’’ इंटेलचा सध्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पॅट गेलसिंगरनं गेल्याच वर्षी कंपनीतील प्रत्येकाला संबोधित करताना मांडलेले हे विचार अँडी ग्रोव्ह या इंटेलच्या सर्वात यशस्वी सीईओचा यथोचित गौरव तर करतातच; पण त्याच्या नेतृत्वशैलीचा प्रभाव त्याच्या निधनानंतरही दीर्घकाळपर्यंत टिकून राहणार आहे याची खात्री पटवतात. हे ‘ग्रोव्हियन कल्चर’ म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंटेलचं नेतृत्व करताना अँडी ग्रोव्हनं कंपनीच्या केवळ परिचालन प्रक्रियेतच नव्हे तर कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात रुजवलेली आणि दैनंदिन कामकाजात शिस्तप्रियतेचा तसेच अत्युच्च कार्यक्षमतेचा आग्रह धरणारी संस्कृती! २०२२ पासून संपूर्ण सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रच मंदीचा सामना करत होतं. अशावेळी कृत्रिम प्रज्ञा क्षमतेच्या (एआय) चिप बनविणाऱ्या एनव्हीडिया किंवा घाऊक चिप उत्पादनात सर्वाधिक कार्यक्षमतेच्या चिप बनविणाऱ्या टीएसएमसी तसेच सॅमसंगच्या कडव्या स्पर्धेसमोर टिकून राहण्यासाठी इंटेलला पुन्हा ग्रोव्हनं आखून दिलेल्या मार्गावर चालण्यावाचून कोणताही पर्याय दिसत नाही; असं काय कर्तृत्व होतं ग्रोव्हचं?

ऐंशीच्या दशकात जपानी कंपन्यांच्या रेटय़ासमोर डीरॅम मेमरी चिप-उद्योगातील आपला जवळपास सर्व बाजारहिस्सा गमावून बसलेल्या कंपनीला यशस्वितेच्या उत्तुंग शिखरावर पुन:प्रस्थापित करण्यामागे अँडी ग्रोव्हनं आखलेल्या धोरणांचा आणि घेतलेल्या धाडसी निर्णयांचा सिंहाचा वाटा होता. १९८५ मध्ये इंटेलनं डीरॅम मेमरी चिपनिर्मितीतून कायमस्वरूपी बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा ग्रोव्ह सोडला तर कंपनीशी जोडलेल्या कोणाच्याच पचनी पडला नव्हता. ग्रोव्हला मात्र गेल्या पाच- सात वर्षांतली आकडेवारी आणि पुढल्या पाच ते दहा वर्षांत मेमरी चिपच्या मागणीमध्ये होऊ शकणाऱ्या वाढीचा अंदाज, याचं विश्लेषण केल्यानंतर एक गोष्ट साफ दिसत होती. मेमरी चिपच्या किमती जरी भविष्यात वाढू शकत असल्या तरीही जपानशी जीवघेण्या स्पर्धेमुळे या उद्योगात इंटेलचा बाजारहिस्सा वाढण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे मेमरी चिपनिर्मिती हा इंटेलच्या अस्मितेचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या भावनिक गुंत्यात न पडता या आतबट्टय़ाच्या व्यवहाराला तात्काळ बंद करणं हे समस्येकडे वस्तुनिष्ठ नजरेनं पाहणाऱ्या व्यवहारवादी ग्रोव्हला केव्हाही योग्य वाटलं.

पण मेमरी चिपनिर्मितीतून बाहेर पडण्यानं इंटेलसमोर उभ्या असलेल्या अस्तित्वाच्या प्रश्नाचं संपूर्ण निरसन नक्कीच होणार नव्हतं. विविध देशांत उभारलेले चिपनिर्मितीचे कारखाने, त्यातील साधनसामग्री, उपकरणं आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हा यक्षप्रश्न अजून सुटायचा होता. इंटेलची सामथ्र्यस्थळं आणि कमजोरींचं विश्लेषण करत असताना ग्रोव्हच्या हे ध्यानात आलं की जरी मेमरी चिपनिर्मितीमध्ये आजघडीला इंटेलने आपली आघाडी गमावलेली असली तरीही संगणकासाठी लागणाऱ्या मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपनिर्मितीमध्ये तांत्रिक श्रेष्ठतेचा विचार केल्यास इंटेल आजही पहिल्या क्रमांकावरच आहे. सत्तरच्या दशकात संगणक त्यांच्या अवाढव्य किमतीमुळे फारच कमी संख्येनं विकले जात त्यामुळे या प्रकारच्या चिपची मागणी मेमरी चिपच्या तुलनेत नगण्य होती. त्यामुळेच जपानी कंपन्याही या क्षेत्राला फारसं गांभीर्यानं घेत नव्हत्या व आपलं लक्ष त्यांनी घाऊक प्रमाणात उत्पादन होऊ शकणाऱ्या मेमरी चिपनिर्मितीवरच केंद्रित केलं होतं.

१९८०-८१ नंतर मात्र ग्रोव्हला मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपनिर्मितीक्षेत्र काही वर्षांतच मोठी भरारी घेईल असा अदमास येऊ लागला. संगणकनिर्मिती क्षेत्रातील त्याकाळची दादा कंपनी, आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर’ अर्थात ‘पीसी’ ऑगस्ट १९८१ मध्ये बाजारात दाखल झाला होता. हाताळायला अत्यंत सुटसुटीत व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी किंमत या कारणांमुळे लहानमोठय़ा कंपन्या, विद्यापीठं व संशोधन संस्था आणि घरगुती वापरासाठी सर्वसामान्यांच्या देखील आयबीएम पीसीवर अक्षरश: उडय़ा पडत होत्या. या पीसीच्या परिचालनासाठी ऑपरेटिंग प्रणालीचं सॉफ्टवेअर त्या वेळेला नवउद्यमी असलेल्या मायक्रोसॉफ्टनं पुरवलं होतं; तर पीसीच्या लॉजिक चिपचं कंत्राट आयबीएमनं इंटेलला दिलं होतं.

इतक्या कमी कालावधीत आपलं हे उत्पादन इतकं लोकप्रिय होईल याचा आयबीएमलाही अंदाज आला नव्हता. त्यामुळे सुरुवातीला इंटेलबरोबरच्या कंत्राटाचा आकार हा डीरॅम मेमरी चिपमधून मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत फारच कमी होता. पण पीसीची वाढती लोकप्रियता पाहून मात्र मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपनिर्मिती हेच भविष्य असणार आहे याची ग्रोव्हला दिवसागणिक खात्री पटू लागली. १९८५ नंतर त्यानं इंटेलची सगळी ऊर्जा या एकाच प्रकारच्या चिपनिर्मितीवर खर्च करायला सुरुवात केली. हा फार जोखमीचा निर्णय होता, जो कंपनीच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभं करू शकला असता.

पण डीरॅम चिपनिर्मितीतून कायमस्वरूपी बाहेर पडण्यासारखाच ग्रोव्हचा हा निर्णयही अचूक ठरला. किंबहुना इंटेलनं आजवर घेतलेल्या निर्णयांमधला सर्वोत्तम निर्णय म्हणून तो आजही गणला जातो. १९८५ नंतर आयबीएम पीसीची मागणी तर भूमितीश्रेणीनं वाढत गेलीच, पण आयबीएमनं पीसीचं आरेखन खुलं ठेवल्यामुळे एचपी, कॉम्पॅक आणि पुढे डेल यांसारख्या अनेक कंपन्या संगणक निर्मिती क्षेत्रात उतरल्या. अशा विविध कंपन्यांच्या प्रवेशामुळे संगणकाच्या किमती उत्तरोत्तर घटत गेल्या व त्याच अनुषंगानं मागणीही प्रचंड वाढत गेली.

या सर्व कंपन्यांच्या संगणकांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. एक म्हणजे ऑपरेटिंग प्रणालीचं सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट पुरवत होतं, तर संगणकाच्या आत वापरल्या गेलेल्या मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपची निर्मिती इंटेल करत होतं. पुढल्या काळात संगणक किंवा सव्‍‌र्हरसाठी पुष्कळ प्रमाणात वापर झाल्यामुळे अत्यंत लोकप्रिय झालेल्या ‘विन्टेल’ (विन्डोज इंटेल) या मायक्रोसॉफ्ट व इंटेल यांच्या संयुक्त भागीदारीची ही नांदी होती. १९९० नंतर एक अ‍ॅपल वगळता जगातल्या जवळपास प्रत्येक संगणक इंटेल चिप व मायक्रोसॉफ्ट विन्डोजच वापरत होता. ग्रोव्हच्या दूरदृष्टीमुळे इंटेलनं संगणकासाठी लागणाऱ्या मायक्रोप्रोसेसर लॉजिक चिपनिर्मिती उद्योगात आपली मक्तेदारी तयार केली होती.

पण ग्रोव्ह एवढंच करून थांबला नाही. चिप उत्पादन प्रक्रियेत जपानी कंपन्यांसारखी कार्यक्षमता इंटेलनं कशी काय आत्मसात करावी, हा प्रश्न अजून सुटायचा होता. नॉईस आणि मूरच्या आधिपत्याखाली इंटेल नावीन्यपूर्ण उत्पादनाची निर्मिती करण्यात जरी नेहमीच अग्रेसर राहिली असली तरी घाऊक चिप-उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अजूनही पुष्कळ वाव होता. ग्रोव्ह हे जाणून होता की केवळ नित्य नवीन तंत्रज्ञान आणणं हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पुरेसं असणार नाही. त्याला उच्च कार्यक्षमतेच्या व शिस्तबद्ध पद्धतीने चालणाऱ्या उत्पादन प्रक्रियेची जोड द्यावीच लागेल, नाहीतर डीरॅम चिपनिर्मिती प्रक्रियेप्रमाणे स्पर्धेतून बाहेर फेकलं जायला फारसा वेळ लागणार नाही.                    

म्हणूनच मग इंटेलमधून अकार्यक्षमतेची हकालपट्टी करण्यासाठी ग्रोव्हनं इंटेलची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यानं अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना इंटेलमधून कमी केलं. त्याच्याच जोडीला तोटय़ात चालणाऱ्या कारखान्यांना कायमचं टाळं ठोकलं. चिपनिर्मिती प्रक्रियेत कार्यक्षमता आणण्यासाठी व जपानी कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धती आत्मसात करण्यासाठी त्यानं इंटेलच्या अनेक फॅक्टरी व्यवस्थापकांना जपानला धाडलं. तिथे शिकून आलेली तंत्र व उत्पादन पद्धतींचा यथायोग्य वापर त्यांनी त्यांच्या विभागात करणं बंधनकारक होतं. त्याचबरोबर कर्मचारी किती वाजता आला, किती वेळ काम केलं, जेवणासाठी किंवा इतर वैयक्तिक कामांसाठी किती वेळ दिला अशा सर्व गोष्टींची खातरजमा केली जात असे. सिलिकॉन व्हॅलीमधल्या खुल्या, तंत्रज्ञानाधिष्ठित- संशोधनस्नेही वातावरणाच्या हे अगदी उलट असलं तरीही चिप-उत्पादनाच्या रुळावरून काहीशा घसरलेल्या गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी ग्रोव्ह राबवत असलेल्या पराकोटीच्या शिस्तबद्ध परिचालनाची आत्यंतिक गरज होती.

चिपनिर्मिती प्रक्रियेत निरंतर सुधारणा करण्यासाठी अत्यंत कल्पक उपायांचा वापर करून ग्रोव्हनं इंटेलच्या उत्पादन प्रक्रियेचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरणही घडवून आणलं. त्याआधी इंटेलच्या विविध कारखान्यांत किंवा विभागांत एकाच कामासाठी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळय़ा पद्धती वापरल्या जात, याला पूर्णत: अटकाव बसला. त्यामुळे १९९०च्या सुमारास जेव्हा संगणकाची व पर्यायानं त्यात वापरल्या जाणाऱ्या लॉजिक चिपची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली तेव्हा इंटेलची उत्पादन यंत्रणा ही वाढती मागणी कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी सक्षम होती. ‘ओन्ली द पॅरानॉईड सव्‍‌र्हाइव्ह’ – पराभवाच्या भयाने विलक्षण झपाटले जाऊन काम करणारी व्यक्ती किंवा संस्थाच फक्त अनिश्चिततेच्या काळातही तग धरून राहू शकते. अँडी ग्रोव्हनं त्याच्या कृतीतून हे इंटेलपुरतं सत्यात आणून दाखवलं.

Story img Loader