पुस्तकांच्या हुंदळकीची खोड एखाद्याला लागली की ती त्याला आयुष्यभर स्वस्थ बसू देत नाही. ही हुंदळकी एखाद्या विशिष्ट विषयाला धरून वाचनाची असली तर ठीक. पण डोळे सतत सर्व प्रकारच्या वाचनावर ठेवले, तर वेळजुळवणी ही अवघड बाब बनून जाते. १९७८ सालापासून ही हुंदळकी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रामध्ये आठवडी पुस्तक परीक्षणांसाठी मायकल डर्डा करीत. गेल्या महिन्याच्या मध्यात त्यांनी या कामातून जाहीर निवृत्ती घेतली. ९ फेब्रुवारीच्या अंकातील पुस्तक पुरवणीत जॉन विल्यम्स या संपादकाने त्यांची पाऊण पानभर मुलाखत छापली. डर्डांची गणना ही अमेरिकेतील महत्त्वाच्या पुस्तक संग्राहक आणि वाचकांत केली जाते. न्यू यॉर्क टाइम्सच्या मिचिको काकूटानी आणि मार्गो जेफरसन, एन प्लस वनच्या आंद्रेआ लाँग चाऊ या थोडक्याच नावांसह डर्डांनी फक्त पुस्तक परीक्षण लिहून पुलित्झर हे पत्रकारितेतील परमोच्च पारितोषिक मिळविले.
‘अॅन ओपन बुक : कमिंग ऑफ एज इन हार्टलॅण्ड’ हे वाचनाचे आत्मचरित्र, ‘रीडिंग्ज : एसेज अॅण्ड लिटररी एंटरटेेनमेण्ट्स’ हे अभिजात कलाकृतींमध्ये नवे शोधू पाहणारी पत्रकारिता, ‘बुक बाय बुक : नोट्स ऑन रीडिंग अॅण्ड लाइफ’ हे जगणे आणि वाचणे पडताळून पाहणारे पुस्तक, ‘ऑन कॉनन डॉयल ऑर द व्होल आर्ट ऑफ स्टोरीटेलिंग’ ही त्यांची गाजलेली पुस्तके. जुन्या पुस्तक बाजारांपासून नव्या देखण्या, सुगंधी आणि सांगीतिक वातावरणात पुस्तक विकणाऱ्या उच्चभ्रू ग्रंथालयांपर्यंत यांची पुस्तक देवघेव. एक वर्ष एकाच विषयावरील पुस्तके वाचून त्यावरच्या नोंदी करण्याची हौस कित्येकदा सदरांतून उतरलेली. २०२४ च्या गेल्या संपूर्ण वर्षात त्यांच्या सदरातील सलगता ढासळली असली, तरी त्यांच्या प्रत्येक लेखातून इतर पुस्तकांचे, लेखकांचे दुवे सहज अवगत होतील असे होते. त्यात रहस्यकथा, भूतकथा, एच.पी. लव्हक्राफ्ट यांच्या साहित्यसंपदेसारख्या लोकप्रिय आणि मुख्य प्रवाहातून त्याज्य मानलेल्या विषयांवरदेखील भर होता. ‘बुक बाय बुक’ पुस्तकाच्या आरंभीच त्यांनी म्हटले आहे की,
‘पुस्तकांच्या सहवासात मी माझ्या आयुष्याचा सर्वाधिक काळ व्यतीत केला आहे. ‘ग्रीन लॅण्टर्न्स’च्या कॉमिक बुक्सपासून ते जागतिक साहित्यात श्रेष्ठ किंवा अभिजात मानल्या जाणाऱ्या ज्या पुस्तकांनी मला पछाडले, त्यांच्या अधिकाधिक जवळ मी गेलो. विद्यापीठात तौलनिक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्यातील बाळबोधपणा संपून व्यावसायिक वाचकात माझे रूपांतर झाले. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने मला माझी वाचनचूष जपत वाटेल त्या पुस्तकावर मला लिहिते केले. यात एका आठवड्यात अभिजात पुस्तक असे तर दुसऱ्या आठवड्यात विज्ञानिका, तिसऱ्या आठवड्यात अद्भुत काल्पनिका. हे सारे करूनही मी स्वत:ला पुस्तकी किडा बनवू दिले नाही. आयुष्याचा आनंद घेता घेता वाचन आत्मसात केले.’ त्यांचे वृत्तपत्रीय आकाराचे किंवा त्याहून मोठे लेख वाचले की या जगण्याचे तपशील लक्षात येतील. ९ फेब्रुवारीच्या अंकात त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुस्तक आस्वादाबद्दल, त्यांच्या परीक्षण-समीक्षण लिहिण्याच्या आठवडी प्रक्रियेबद्दल सांगितले आहे. पुस्तक ओळख किंवा पुस्तक परीक्षण ही आत्यंतिक मनोरंजक असावे, ही त्यांची धारणा. त्याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या पुस्तकावर आपण लिहिणार आहोत, त्यांच्याशी परिचय नसेल, तर सर्वोत्तम. ओळखपाळख असली की येणाऱ्या अडचणी आणि विशेषणांचा होणारा खर्च याबाबत सतत दक्ष राहावे लागते. यामुळेच विशेषणे वजा करून पुस्तकाबद्दल कसे लिहावे, याचे धडे डर्डा यांच्या प्रत्येक लेखातून मिळू शकतील. त्यांच्या ताज्या मुलाखतीमधले एक वाक्य गाजत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पुन्हा देश गेल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण भविष्याबद्दल त्या वक्तव्यात चिंता आहे.
‘पुन्हा एकदा शिक्षण, विज्ञान आणि कला यांची कायम खिल्ली उडविणाऱ्या, दुसऱ्यांच्या प्रति सतत अनादर, असहिष्णुता बाळगणाऱ्या आणि सत्ता-संपत्ती तसेच समाजमाध्यमाला महत्त्व देणाऱ्या व्यक्तीच्या हाती देश गेला आहे’ – डर्डा यांचे हे वक्तव्य पुस्तक-मासिके वाचणारी माणसे उदंड असणाऱ्या, प्रांताप्रांतात दुथडी भरून ग्रंथालये वापरली जात असणाऱ्या, सजग विचार करणाऱ्या विचारवंतांची मुबलकता असणाऱ्या अमेरिका या देशाबद्दल आहे. या सगळ्याचे दुर्भिक्ष असलेल्या आपल्या भवतालात सुमारांची सद्दी बेसुमार वाढत असल्याचे पाहताना डर्डांच्या विधानाकडे नुसता ‘अनुवाद’ म्हणून पाहणे योग्य होईल काय?
वातावरणबदलाच्या कादंबऱ्यांचा मान!
जागतिक हवामान दिवसानिमित्त रविवारी, २३ मार्च रोजी वातावरण-बदलाची चिंता पुन्हा व्यक्त होईल; त्यात कदाचित तोचतोपणा असेल… पण या विषयावर कथा किंवा कादंबरीच लिहिणाऱ्यांपुढलं मुख्य आव्हान ‘तेच ते’ टाळण्याचं असतं. हे आव्हान यशस्वीपणे पेलणाऱ्या साहित्याचा गौरव करण्यासाठी यंदापासून १० हजार ब्रिटिश पौंडांचं ‘क्लायमेट फिक्शन प्राइझ’ सुरू झालं आहे. ते कुणाला मिळालं हे कळण्यासाठी येत्या जूनपर्यंत थांबावं लागणार असलं तरी, या पारितोषिकासाठी पाच कादंबऱ्यांची लघुयादी जाहीर झाली आहे. या सर्व कादंबऱ्या स्त्रियांनी लिहिलेल्या आहेत.
नायजेरियन लेखिका अॅबी डारे हिची ‘अॅण्ड सो आय रोअर’ ही एका किशोरीचा प्रवास सांगणारी कादंबरी. शाळेत, लागोसला जायला मिळालं की आपल्या साऱ्या कटकटी संपणार असं तिला वाटत असतं; पण तिला असे काही अनुभव येतात की आव्हानं असणारच आणि त्यांना तोंड द्यावंच लागणार, असं ती ठरवते. कॅलिएन ब्रॅडली यांच्या ‘द मिनिस्ट्री ऑफ टाइम’ या कादंबरीत, हवामान-बदलांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ एका प्रेमकथेच्या अंगानं येतो. थेट वर्णनं टाळूनसुद्धा ही कादंबरी भविष्याचा भलताच विचार करते आहे, हे वाचकांना अस्वस्थ करतं.
नाहीतरी ‘हवामान बदल’ असं काही थेट दिसत नाहीच, दिसते ती आग… याबद्दलची ‘ब्रीफली, व्हेरी ब्यूटिफुल’ ही कादंबरी रोझ डिनीन यांची. त्या वणव्यांमध्ये तगून राहिलेली नाजूक मानवी नाती या कादंबरीत असली तरी, आग मात्र वाचकापर्यंत पोहोचते. तिआ ओब्रेट यांची ‘द मॉर्निंगसाइड’ ही कादंबरी शहराच्या वाढीची आणि पुराची कथा सांगणारी असली, तरी तीसुद्धा आई-मुलीच्या नात्याचा वेध घेते. नकोशा पर्यावरणीय संकटांतून मार्ग काढणाऱ्या मायलेकींची कथा ‘विकासा’च्या कल्पनेपुढे सार्वकालिक प्रश्न उभे करते.
‘बुकर प्राइझ’ मिळवणारी, ‘ऑर्बिटल’ ही समंथा हार्वे यांची कादंबरी याही लघुयादीत आहे… अंतराळात नऊ महिने राहावं लागलेल्या माणसांची ही कथा! पृथ्वीवरील जग आणि अवकाश यांना जोडण्याचा प्रयत्न या कादंबरीत आहे. ब्रिटनमध्ये १० हजार पौंडांची साहित्यिक पारितोषिके किमान तीन आहेत, त्यात ही आणखी एक भर असली तरी ‘क्लायमेट फिक्शन’चा अमिताव घोष यांच्यासारख्यांनी रुंद केलेला प्रवाह आता जोमानं वाढायला हवा यासाठीच हे पारितोषिक खास ठरतं.