मिलिंद रेगे हे मुंबई क्रिकेटमधील अस्सल रोमँटिक व्यक्तिमत्त्व. मुंबई क्रिकेटचा माहितीकोश ही त्यांची आणखी एक ओळख. १९६०, ७० आणि ८० च्या दशकात मुंबई क्रिकेटचा दबदबा, दरारा कसा निर्माण झाला नि टिकून राहिला हे जाणून घेण्यासाठी रेगे यांच्या संगतीतला अर्धा तासही पुरेसा ठरे आणि तो अनुभव खरोखर समृद्ध करणाराच असे. मुंबई क्रिकेटमधील रथी, अतिरथी आणि महारथींच्या वर्तुळात मिलिंद रेगे केवळ वावरले असे नव्हे, तर स्वत:ची स्वतंत्र ओळखही त्यांनी निर्माण केली. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यापेक्षाही मुंबई क्रिकेट संघात स्थान मिळवणे नि ते टिकवणे अधिक खडतर होते. ती कामगिरी करून दाखवल्याचे, आणि पुढे तर मुंबई संघाचे नेतृत्व केल्याचे रास्त समाधान आणि अभिमान रेगे यांच्या वर्तनातून आणि वक्तव्यातून नेहमी प्रकट होई. रूढार्थाने ते रणजी क्रिकेट स्तराच्या वर गेले नाहीत. ५२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २९.२३ च्या सरासरीने १२६ बळी आणि २३.५६ च्या सरासरीने १५३२ धावा ही कामगिरी तशी माफकच. पण ते १९६६-६७ ते १९७७-७८ या काळात खेळले, त्या अनुभवाच्या शिदोरीचे आणि शहाणिवेचे मोल धावा, बळी नि सरासरी अशा ठोकळेबाज आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक होते. यासाठी प्रथम त्या काळाचा धांडोळा घ्यावाच लागेल.
मिलिंद रेगे विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचे समकालीन पण वयाने थोडे ज्येष्ठ. दोघे एकाच शाळेत शिकले, एकाच महाविद्यालयात गेले नि लहानपणी एकाच गल्लीमध्ये क्रिकेट खेळले. त्यामुळे दोघांत जिव्हाळा होता. पुढे सुनील गावस्कर यांचे घनिष्ठ मित्र ही रेगे यांची (एक) ओळख सांगितली जाऊ लागली, तरी खुद्द गावस्कर यांच्यासाठी ते सदैव मोठा भाऊ आणि मार्गदर्शकासारखे होते. विशीच्या ऐन मध्यावर मिलिंद रेगे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तरीदेखील नंतर अनेक काळ ते खेळत राहिले, याचे सुनील यांच्याप्रमाणेच मुंबईकरांना भारी कौतुक होते. क्रिकेट आणि मुंबईवरील निस्सीम प्रेमातूनच रेगे यांना हे साध्य झाले असावे. आपले रणजी पदार्पण कसे झाले, याविषयीचा किस्सा ते खुलून कथन करत. आपली निवड विजय मर्चंट, माधव मंत्री, पॉली उम्रीगर, मनोहर हर्डीकर यांच्या निवड समितीने केली हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील अभिमान स्पष्टपणे प्रकट होई. रणजी पदार्पणात त्यांचे पहिले कक्षसोबती होते दिलीप सरदेसाई. रेगेंच्या महाविद्यालयीन संघाचे कर्णधार होते अशोक मांकड. १८ व्या वर्षी रेगे यांनी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्या वेळी ड्रेसिंग रूममध्ये असायचे बापू नाडकर्णी, शरद दिवाडकर, रमाकांत देसाई, बाळू गुप्ते, अजित वाडेकर, अशोक मांकड आणि दिलीप सरदेसाई. त्या काळात मुंबईतील क्लब क्रिकेट आणि कंपनी क्रिकेटमध्येही तीव्र स्पर्धा दिसून येई. दादर युनियन आणि टाटा कंपनी या तगड्या संघांकडून खेळल्यामुळे स्पर्धात्मकता रेगे यांच्यात मुरली होती.
या शिदोरीतून जी ‘दृष्टी’ मिळाली, त्यामुळे रेगे यांची ओळख मुंबई क्रिकेटमधील रत्नपारखी अशी झाली. दक्षिण आणि मध्य मुंबईत नेट लावून खेळणाऱ्या शेकडो युवा क्रिकेटमधून उच्च दर्जाची गुणवत्ता नेमकी हेरणे ही मिलिंद रेगे यांची खासियत होती. अशाच नजरेतून त्यांनी मिसरुडही न फुटलेल्या एका मुलाची निवड मुंबईच्या रणजी संघात केली. त्या मुलाचे नाव सचिन तेंडुलकर! मुंबई क्रिकेट निवड समिती सदस्य, निवड समिती अध्यक्ष अशा भूमिकांमधून त्यांनी भरीव योगदान दिले. मुंबईचा क्रिकेटपटू वरकरणी ‘खडूस’ वाटतो, पण नवीन पिढीला मदत आणि मार्गदर्शन करण्याची त्याची दानत कशालाही हार जाणार नाही. मिलिंद रेगे हे या मुंबई क्रिकेट संस्कृतीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या आयुष्याची इनिंग्ज अकालीच संपली, ही हुरहुर तरीही सतावतेच.