‘बॅऽऽबॅऽऽबॅऽऽ’ असा सुरुवातीला हळू असलेला आवाज मोठ्याने येऊ लागला तशी नितेश राणेंना जाग आली. कणकवलीच्या घरात पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. हा वेगळा आवाज कसा काय म्हणत, ते डोळे चोळत बाहेर आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून हबकलेच. घराच्या सभोवताली हजारो शेळ्यामेंढ्यांचा कळप जमलेला. साक्षात मंत्रीच समोर आल्याचे बघून त्यांच्या आवाजाला अधिक धार चढली. इतका मोठा आवाज ऐकण्याची सवय सुटलेल्या राणेंनी त्यांना ‘गप रे’ म्हणून दरडावले, पण कळप ऐकेचना! भाषा कळणार नाही हे लक्षात आल्यावर मग तेच नरमले. मदतीसाठी मेंढपाळाला बोलावणे धाडले. धर्मजागरणासाठी सध्या आपण हाती घेतलेला मल्हार झटका प्रमाणपत्र मोहिमेचा व या कळपाचा काही संबंध असेल का, या विचाराने ते अस्वस्थ झाले. कुणा विरोधकांनी हा कळप इथे जाणीवपूर्वक आणून सोडला असेल का, असाही प्रश्न त्यांना सतावू लागला.
तेवढ्यात एक सहायक मेंढपाळाला घेऊन आला. तो दिसताच कळपात तोवर मागे असलेला व भरपूर दाढी वाढलेला एक बोकड समोर आला. मग संवादकाच्या माध्यमातून तो बोलू लागला. ‘आम्ही इथे आलोय ते तुम्हाला घेराव घालण्यासाठी. ‘मल्हार’ घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्याने आमचे जगणे असह्य झाले आहे. मुळात आम्ही शाकाहारी. आमचे दैवत मल्हारसुद्धा शाकाहारी. त्यालाही मटणाचा नैवेद्या चालत नाही. आम्हाला मरण कसे व कुणाच्या हातून यावे याची प्रथा, परंपरा आजवर ठरलेली. बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या मुलाणीच्या हातून मरणे हे आमच्यात श्रेष्ठ समजले जाते. तुमच्या साऱ्या देवांना याच पद्धतीतून तयार झालेला नैवेद्य चालतो. तीच पद्धत तुम्ही मोडीत काढण्यास निघालात. तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ, पण यात आता आमची फरफट सुरू झाली त्याचे काय? आमचे पालक आता दबाव वाढल्याने आम्हाला मल्हारवाल्याकडे नेऊन विकायला लागले. हलाल करणारा भीतिपोटी आमची खरेदी करण्यास तयार नाही. आम्ही कुणाच्या हातून मरायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? तेही आम्हाला विश्वासात न घेता? प्राणी असलो म्हणून काय झाले? आमच्यातही जीव आहेच की!’ हे ऐकून राणेंचा पारा चढला.
आजकाल भलेभले आपल्याला वचकून असतात. त्यात या प्राण्यांचे कशाला ऐकून घ्यायचे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावरून ते काही बोलणार तेवढ्यात मेंढपाळाने त्यांना शांत राहण्यास सांगितले. मग बोकड पुन्हा सुरू झाला. ‘आम्हाला मारून तुम्ही तुमच्या जिभेचे चोचले जरूर पूर्ण करा, पण आमच्या मृतदेहावर ‘मल्हार’ असा शिक्का नको. तुमच्या धर्मजागरणाला माणसे भलेही घाबरत असतील पण आम्ही घाबरणार नाही म्हणजे नाही. या प्रमाणपत्राचे नाव तात्काळ बदला अन्यथा तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही. तुमच्या वाटेत अडथळे कसे निर्माण करायचे ते आम्हाला चांगले ठाऊक आहे.’ हे ऐकून वैतागलेले राणे ‘ठीक आहे ठीक आहे, हाकला रे यांना’ असे म्हणत आत गेले, तसा जमलेल्या कळपाने पुन्हा ‘बॅ बॅ’चा गजर सुरू केला. यानंतर काही क्षणांत शेळ्यामेंढ्या जंगलाच्या दिशेने निघाल्या. त्या इच्छित स्थळी पोहचताच तिथे जमलेल्या मेंढपाळांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा प्रमुख म्हणाला. ‘कधी कधी माणसांना वठणीवर आणण्यासाठी प्राण्यांची मदत घ्यावी लागते. आताही ऐकले नाही तर आणखी एक ‘मल्हारी झटका’ द्यायचाच.’