बारावीत शिकणारे दोन मित्र. रोज भेटणारे. त्यांच्यात एके दिवशी वाहन लावण्यावरून वाद होतो. वादाची बोच मनात इतकी राहते की दुखावलेला मुलगा या वादानंतर काही दिवसांनी आपल्या मित्राचे कोयत्याने अक्षरश: तुकडे करतो. एका क्षुल्लक कारणावरून, अद्याप कायद्याने प्रौढही न झालेल्या किशोराकडून त्याच्याच वयाच्या दुसऱ्या किशोराची हत्या! बारामतीत नुकतीच घडलेली ही घटना वाचल्यानंतर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला प्रचंड धक्का तर बसेलच, पण त्यानंतर मनात एक प्रश्न हमखास उमटेल, ‘आपण नक्की कुठे चाललो आहोत?’ समाज म्हणून या प्रश्नाचे उत्तर देणे सध्या फार फार महत्त्वाचे आहे. बारामतीत घडलेली हत्येची घटना त्यातील अल्पवयीनांच्या सहभागामुळे अधिक गंभीर आहे, यात वाद नाही. अल्पवयीनांकडून आणि त्यातही प्रामुख्याने १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांत होत चाललेली वाढ चिंताजनक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची २०२२ची उपलब्ध आकडेवारी सांगते, की त्या वर्षभरात देशभरातील एकूण नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी ३१ हजार ९१० गुन्हे अल्पवयीनांकडून घडले आहेत. त्यातही १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा यात ७५ टक्के इतका मोठा आहे. चोरी, इजा होईल असे हल्ले, दरोडा अशा गुन्ह्यांचा वाटा यात अधिक. हत्येच्या गुन्ह्यांची नोंद त्या मानाने कमी असली, तरी तीही नगण्य नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी असेही सांगते की, राज्यांचा विचार करता, अल्पवयीनांकडून सर्वाधिक म्हणजे ४४०६ गुन्हे महाराष्ट्रात घडलेले आहेत. थोडे गणित मांडले, की या आकडेवारीचे गांभीर्य आणखी अधोरेखित होईल. महाराष्ट्रात अल्पवयीनांकडून वर्षाला ४४०६ गुन्हे घडत असतील, तर महिन्याला सुमारे ३६७ व दिवसाला १२ गुन्हे अल्पवयीनांकडून घडतात, असे या आकडेवारीचे पृथक्करण आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : घराणेशाही कालबाह्य!

अल्पवयीनांकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात आणि ते गंभीर स्वरूपाचेच आहेत, हे वास्तव एकदा मान्य केले, की ‘आपण समाज म्हणून नक्की कुठे चाललो आहोत’ आणि ‘हिंसा बालपणापासूनच रुजते आहे का’ हे प्रश्न केवळ कालसुसंगत नाही, तर कमालीच्या तातडीचेही आहेत, हे मान्य करणे जरा सोपे जाईल. एखाद्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा १७ वर्षांच्या मुलाला इतका राग येऊ शकतो, की त्याला त्याच्या मित्राचा खून करावासा वाटावा, यामागच्या मानसिकतेचे पैलू तपासणे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. गुन्हा करणाऱ्या अल्पवयीनाला त्याच्या बालपणात आलेला अत्याचाराचा अनुभव ते वेगवेगळ्या माध्यमांतून, स्वत:च्या वा जवळपासच्या घरांतून त्याच्यापर्यंत पोहोचणारी हिंसात्मक दृश्ये आणि पालकांच्या दुर्लक्षापासून वाईट संगतीच्या पर्यवसनापर्यंतचे कित्येक आयाम या हिंसक वृत्तीला आहेत. शहरांमधील स्थिती अशी आहे की चाळी-झोपड्यांपासून उच्चभ्रू घरांपर्यंत अपवाद वगळता समंजस पालकत्व हा अभावानेच आढळणारा गुण आहे. पालकांची जगण्याची, करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्याची, कुटुंबाला ‘सुख’ देण्याची धावपळ इतकी कमालीची स्पर्धात्मक आहे, की त्यात काही काळ थांबून पाल्याशी हितगूज करण्याची फुरसतच नाही. त्यासाठी वेळ काढावा लागतो हे मान्य केले, तरी एकूणच कुटुंबाच्या मागण्या पुरविण्यासाठी वेळ थांबत नाही, त्याचे काय करायचे, हा अनेक पालकांपुढचा प्रश्न आहे. अशात मुलांचे ‘वाढणे’ हे त्यांना मिळणाऱ्या वा न मिळणाऱ्या संगतीवर, शिक्षणावर, विविध माध्यमांच्या उपलब्धतेवर सोडून दिले गेले, की मग अशा या सगळ्यांत जे जे टिपले जाते, ते ते व्यक्तिमत्त्वात रुजणे आलेच. मग अगदी लहान वयात अत्यंत घाणेरड्या शिव्या देण्यापासून थेट खुनापर्यंतचे प्रसंग आसपास घडत राहतात. कोणताही आर्थिक स्तर याला अपवाद नाही, हेही आवर्जून नमूद करायला हवे. कारण, दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणापासून पुण्यातील पोर्श अपघातापर्यंतच्या गुन्ह्यांत समान धागा आहे, तो हिंसेत गैर काही नाही, या मानसिकतेचा. या मानसिकतेला भिडण्याची आपली तयारी किती आहे, यावर अल्पवयीनांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचे नियंत्रण अवलंबून आहे. सभोवतालात भरून राहिलेली हिंसेची वेगवेगळी रूपे कुमारवयीन, किशोरवयीन मनांत, शरीरांत कशी रूपांतरित होतील आणि त्याचा निचरा होईल, की रौद्रभीषण आविष्कार, यात पौगंडावस्थेचे गुंते अधिकाधिक जटिल होतील की सोडवले जातील, याचे उत्तर दडलेले आहे. मुलांचे ‘घडणे’ आणि नुसतेच ‘वाढणे’, यातील भेदाची सीमारेषा ठरविणे हे अत्यंत कळीचे आहे, ते यामुळेच.