बारावीत शिकणारे दोन मित्र. रोज भेटणारे. त्यांच्यात एके दिवशी वाहन लावण्यावरून वाद होतो. वादाची बोच मनात इतकी राहते की दुखावलेला मुलगा या वादानंतर काही दिवसांनी आपल्या मित्राचे कोयत्याने अक्षरश: तुकडे करतो. एका क्षुल्लक कारणावरून, अद्याप कायद्याने प्रौढही न झालेल्या किशोराकडून त्याच्याच वयाच्या दुसऱ्या किशोराची हत्या! बारामतीत नुकतीच घडलेली ही घटना वाचल्यानंतर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला प्रचंड धक्का तर बसेलच, पण त्यानंतर मनात एक प्रश्न हमखास उमटेल, ‘आपण नक्की कुठे चाललो आहोत?’ समाज म्हणून या प्रश्नाचे उत्तर देणे सध्या फार फार महत्त्वाचे आहे. बारामतीत घडलेली हत्येची घटना त्यातील अल्पवयीनांच्या सहभागामुळे अधिक गंभीर आहे, यात वाद नाही. अल्पवयीनांकडून आणि त्यातही प्रामुख्याने १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांत होत चाललेली वाढ चिंताजनक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची २०२२ची उपलब्ध आकडेवारी सांगते, की त्या वर्षभरात देशभरातील एकूण नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी ३१ हजार ९१० गुन्हे अल्पवयीनांकडून घडले आहेत. त्यातही १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा यात ७५ टक्के इतका मोठा आहे. चोरी, इजा होईल असे हल्ले, दरोडा अशा गुन्ह्यांचा वाटा यात अधिक. हत्येच्या गुन्ह्यांची नोंद त्या मानाने कमी असली, तरी तीही नगण्य नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी असेही सांगते की, राज्यांचा विचार करता, अल्पवयीनांकडून सर्वाधिक म्हणजे ४४०६ गुन्हे महाराष्ट्रात घडलेले आहेत. थोडे गणित मांडले, की या आकडेवारीचे गांभीर्य आणखी अधोरेखित होईल. महाराष्ट्रात अल्पवयीनांकडून वर्षाला ४४०६ गुन्हे घडत असतील, तर महिन्याला सुमारे ३६७ व दिवसाला १२ गुन्हे अल्पवयीनांकडून घडतात, असे या आकडेवारीचे पृथक्करण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा