अभिजीत ताम्हणे
भारतीयांसकट सर्वानीच, गेल्या शतकातल्या ‘मॉडर्न आर्ट’वाल्यांना भरपूर हिणवलंय. पण आता चित्र बदलतंय, असा दिलासा यंदाची व्हेनिस बिएनाले देते आहे का?
रफा अल-नसीरी हा १९४० साली इराकमध्ये जन्मलेला चित्रकार. कलामहाविद्यालयात असताना विशीच्या उंबरठय़ावर, १९५९ मध्ये त्यानं बगदादला आलेलं चिनी कलेचं प्रदर्शन पाहिलं. हस्तकलेखेरीज त्यात चिनी मुद्राचित्रंही होती. तांब्याच्या पत्र्यावर प्रतिमा कोरण्यासाठी चरे पाडून किंवा रसायनं वापरून, या पत्र्याला शाई फासून-पुसून खोलगट भागांमध्ये उरलेल्या शाईद्वारे त्या प्रतिमेचा छाप अनेक कागदांवर घेण्याचं हे तंत्र चिन्यांनी प्रगत केलंय, हे रफा अल-नसीरीला जाणवलं. याच प्रदर्शनाला जोडून झालेल्या कार्यशाळेत अल-नसीरीचा सहभाग इतका लक्षणीय ठरला की त्याला चीनमध्ये उच्चशिक्षणाची संधी मिळाली. तिथून बगदादला परतल्यावर श्रीमंत चुलत भावंडांनी मोटारीतून त्याला युरोप-प्रवासाला नेलं. तो २४ देशांचा रस्तेप्रवास करून आता कुठे इराकमध्ये नाव कमावतोय तोवर अल-नसीरीला स्पेनमधील शिष्यवृत्ती मिळाली. हे सगळं होऊन सन १९६९ उजाडेस्तोवर अल-नसीरी हा ‘अॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम’ या अमेरिकी कलाचळवळीशी मिळतीजुळती चित्रं करू लागला! अरबी आणि फारसी काव्याच्या वाचनाचा नाद कुमारवयापासूनच लागलेल्या अल-नसीरीची चित्रं पाहून जरी कुणी ‘हे तर अमेरिकेतल्या अॅडॉल्फ गॉटलिएब या चित्रकाराची कॉपी वाटतंय’ असं म्हणू शकत असलं, तरी अल-नसीरीच्या याच चित्रांना एखाद्या अरबी/फारसी शेराच्या, गझलेच्या भावार्थाचा आधार असायचा. त्या गॉटलिएबसारखा काळय़ा फटकाऱ्यांचा ठसठशीत वापर याही चित्रांत असला तरी, अल-नसीरीच्या चीनमधल्या शिक्षणकाळात त्यानं आत्मसात केलेले ते फटकारे चिनी सुलेखनातून आलेले होते. ‘माझ्या कामामध्ये या तीन विविध संस्कृतींचे ताणेबाणे आहेत’ असं म्हणणारा अल-नसीरी २०१३ मध्ये निवर्तला.
किंवा न्यूझीलंडमध्ये १९३९ सालात जन्मलेले सॅण्डी अॅडसेट हे माओरी वंशाचे. त्या जमातींमध्ये शिक्षणाची जाणीव रुजू लागली, तेव्हाच्या पिढीतले. शाळा शिकणाऱ्या माओरी पोरांनाही वावरात राबावंच लागे आणि असं राबताना सॅण्डी चित्रं काढत. मग, याला कलाशिक्षक करायचा, पगारदार होऊंदे याला, असा विचार करून वडीलधाऱ्यांनी याला त्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात घातलं तर तिथं हा म्हणू लागला की आमची माओरी कलासुद्धा का नाही शिकवायची. ‘कशी शिकवायची ती?’ हा प्रतिप्रश्न त्या वेळची ‘व्यवस्था’ विचारत होती, त्याचं उत्तर शोधण्यासाठी सॅण्डी माओरी वस्त्यांतून फिरले. ही लोककला म्हणून ती ‘वंशपरंपरागत’ असते कबूल, पण थोडेच जण त्यात पारंगत होतात आणि बाकीचे नाही, असं का, याच्या शोधातून त्यांना भविष्यातल्या ‘माओरी कला अभ्यासक्रमा’चं क्षितिज खुणावू लागलं. बरी गोष्ट अशी की, तोवर न्यूझीलंडच्या एका तरी शिक्षणसंस्थेत, माओरी पारंपरिक ज्ञान आणि नेहमीची पाठय़पुस्तकं असा ‘एकात्मिक’ का काय म्हणतात तो अभ्यासक्रम सुरू झाला होता. त्या अभ्यासक्रमाला माओरी चित्रकलेचा आत्मा मिळवून देण्याचं काम सॅण्डी यांनी केलंच, पण पुढं हे सॅण्डी अॅडसेट जगातल्या पहिल्या माओरी कला-महाविद्यालयाचे संस्थापक बनले. एका ‘लोककला’प्रकाराचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचं हे काम सॅण्डी यांनी, स्वत:ची चित्रकला सांभाळून केलं. या त्यांच्या चित्रांना माओरी ‘बॉडी आर्ट’सह अनेक प्रकारचे माओरी-कलेतले आकार दिसतात, याचं भान न बाळगता ‘डिझाइनसारखंच दिसतंय हे’ असा शेरा मारणारे स्वत:च्या अकलेचंच प्रदर्शन घडवतात आजही, अधूनमधून!
किंवा बाया मोहिद्दीन. ही अल्जेरियावर फ्रेंचांचा कब्जा असताना, १९३१ मध्ये जन्मली. तिच्या लहानपणीच तिचे आईवडील गेले, मग आजीनं सांभाळ केला, पण बायाच्या ११व्या वर्षी तिची आजीसुद्धा गेल्यामुळे मॅग्युरी नावाच्या एका फ्रेंच बाईंनी बायाचा सांभाळ केला. म्हणजे तिला कलासाहित्य वगैरे दिलं. पण घरकामही करायला लावलं. चित्रं फारच चांगली असल्यानं ही ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ मॅग्युरीनं फ्रान्समध्ये नेली. तिथं थेट पिकासोशी गाठभेट वगैरे. अवघ्या सोळा- अठराच्या वयातली बाया तेव्हाच्या फ्रान्समध्येच कलाशिक्षण घेऊ लागली. पण अल्जेरियात परतली, तिनं संसार मायदेशातच केला आणि मुलंबाळं झाल्यानंतर तिनं जी चित्रं रंगवली ती फ्रेंच कलाशैलींपेक्षा निराळीच घडली. स्त्री-चित्रकार अनेकदा स्त्रियांचं जगच चितारतात, हे बायाच्या चित्रांतूनही दिसलंच. पण तिची प्रतिमानिर्मिती इतकी सहज की, आपल्या मिथिला (मधुबनी) शैलीची आठवण व्हावी! आता ही मधुबनी शैली बायानं पाहिलीही नसणार, पण तरीही ती तिथवर पोहोचली.
हे तिघेही, किंवा भारतीय चित्रकार म्हणून अमृता शेरगिल आणि बी. प्रभा, सूझा, रझा आणि वस्त्रकला प्रकारात कलाकृती करणाऱ्या मोनिका कोरिया यांच्यासह आफ्रिकी किंवा आशियाई किंवा दक्षिण अमेरिकी देशांमध्ये विसाव्या शतकात कार्यरत असलेल्या ‘आधुनिक चित्रकारां’चा समावेश यंदाच्या व्हेनिस बिएनालेमध्ये आहे. दोन वर्षांतून एकदा भरणाऱ्या या व्हेनिस महाप्रदर्शनाला १०० हून अधिक वर्षांचा इतिहास, म्हणून हे महत्त्वाचंच. पण या बिएनालेचा गाभा असलेल्या ‘मध्यवर्ती प्रदर्शना’त समावेश होणं याला सन्मान समजण्याची रीत गेल्या तीसेक वर्षांत कमी न होता वाढते आहे. गोम अशी की, युरोपीय किंवा अमेरिकी नसणारे आणि गेल्या शतकामध्ये थोडय़ाफार प्रमाणातच युरोपात माहीत झालेले, असे सुमारे ८० चित्रकार- एवढय़ा संख्येनं यंदा प्रथमच- व्हेनिसच्या मध्यवर्ती प्रदर्शनात आहेत.
भारतीयांसकट सर्वानीच, गेल्या शतकातल्या ‘मॉडर्न आर्ट’वाल्यांना भरपूर हिणवलंय. यांना आपल्या देशातलं काही पाहायला नको, असा गैरसमज त्यांच्याबद्दल करून घेतलाय; हे सगळे मॉडर्नवाले लोक युरोपीय वा अमेरिकी चित्रकारांपैकी याची ना त्याची कॉपी करतात असाही आरोप वारंवार झालाय.. हा असला आरोप करताना, ‘मग कोणती कला कशासारखी तरी नसते?’ या प्रश्नाचा सोयीस्कर विसर पाडवून घेण्याची लबाडीसुद्धा आजवर छान खपून गेलीय.. पण आता चित्र बदलतंय, असा दिलासा यंदाची व्हेनिस बिएनाले देते आहे का?
होय, असं यंदा निवडलेल्या चित्रकारांची यादी तरी सांगते आहे. प्रदर्शन २० एप्रिलला खुलं होईल; तेव्हा अधिक स्पष्टपणे उत्तरं मिळतीलच. पण या निमित्तानं आणखी एका वादाला आकार येण्याची शक्यता आहे. तो वाद कलाक्षेत्रातल्या ‘आरक्षणा’चा! सामाजिक न्यायासाठी अनेक देशांमध्ये आरक्षणवजा प्रथा आहेत, तसं काहीही चित्रकलेत नाही. पण कलाक्षेत्र हे युरोप/अमेरिकेपुरतं मर्यादित नाही, याची जाण आता येऊ लागल्याचं गेल्या वीसेक वर्षांत तर वारंवार दिसू लागलं आणि यंदाच्या व्हेनिस बिएनालेनं त्यावर कडीच केली.. हिणवले गेलेल्या देशोदेशींच्या मॉडर्निस्टांना मुद्दाम एकाच वेळी स्थान दिलं. ही करामत झाली, कारण यंदाच्या व्हेनिस बिएनालेचे गुंफणकार (क्युरेटर) अॅड्रियानो प्रेडोसा हे स्वत: ब्राझीलमध्ये जन्मलेले आणि त्याच देशात राहणारे आहेत. ‘फॉरेनर्स एव्हरीव्हेअर’ हे नाव त्यांनी यंदा गुंफलेल्या मध्यवर्ती प्रदर्शनासाठी निवडलं आहे. दुसऱ्या देशांशी संपर्कात आलेले अनेक चित्रकार या गुंफणीत जसे आहेत, तसेच अत्र ना परत्र असलेले ‘एलजीबीटीक्यू’ तसंच मानवतावादी कारणांसाठी ‘राष्ट्रां’च्या मर्यादा ओलांडू पाहणारेही आहेत.
आपापल्या गुणांवरच कलाकृतींची निवड प्रदर्शनात होत असते. तरीसुद्धा अशा चित्रकारांचा समावेश असलेल्या प्रदर्शनांनाच आता हिणवण्याची प्रथाही सुरू झालेली आहे- ‘हे म्हणजे कलाक्षेत्रातलं आरक्षणच झालं जणू!’ असा हेटाळणीचा सूर हल्ली लावला जातो. तो लावणाऱ्यांना अपेक्षित असलेली प्रतिक्रांती कलाक्षेत्रात आता अशक्य आहे. इतिहासाबद्दल नवी समज जर ठेवली, तर गुणांची कदर अधिक न्याय्यपणे होणारच असते.. तसं आता कलाक्षेत्रात सुरू आहे.
abhijit.tamhane@expressindia.com