आता थोडं, अगदी गरजेपुरतं, पूर्वसूत्र. शुक्ल पक्षात चंद्रास्त रोज दिसतो. पण चंद्रोदय कधीच दिसत नाही. हेच कृष्ण पक्षात चंद्रोदय रोज दिसतो. पण चंद्रास्त कधीच दिसत नाही. त्यामुळे फक्त चंद्रावर आधारलेली ‘दिवस’ या संकल्पनेची व्याख्याच करता येत नाही!
पण फक्त चंद्रावर आधारलेली ‘महिना’ या संकल्पनेची व्याख्या करणं अगदी सोपं. कारण महिन्यातला एक दिवस हे साहेब शब्दश: तोंड काळं करतात! दिसतच नाहीत. ती ‘अमावास्या’. त्यानंतरच्या दिवशी सूर्यास्ताच्या सुमारास चंद्राची नाजूकशी कोर पश्चिम आकाशात दिसते. त्यामुळे ‘नवा चंद्र दिसला की नवा महिना सुरू’ अशी व्याख्या करणं सोपं, सोयीचं, सुटसुटीत.
बरं, फक्त चंद्रावर आधारित ‘वर्ष’ या संकल्पनेची व्याख्यादेखील करता येत नाही. कारण क्रांतिवृत्ताची एक फेरी तो महिन्याभरातच पूर्ण करतो. त्यामुळे वर्ष पूर्ण झालं असं म्हणायला आधार काय?
आता सूर्याचं याच्या बरोब्बर उलट. फक्त सूर्याच्या भ्रमणावर आधारित ‘दिन’ (दिवस) या संकल्पनेची व्याख्या करणं अगदी सोपं. उगवला सूर्य, झाला नवा दिवस सुरू. फक्त सूर्याच्या भ्रमणावर आधारित ‘वर्ष’ या संकल्पनेची व्याख्या करणंदेखील अगदी स्वाभाविक. सूर्याने क्रांतिवृत्ताची एक फेरी पूर्ण केली (सायडेरियल) किंवा पृथ्वीसापेक्ष सूर्य पुन्हा त्याच स्थानी आला (ट्रॉपिकल) की झालं वर्ष पूर्ण. पण फक्त सूर्याच्या भ्रमणावर आधारित ‘महिना’ या संकल्पनेची व्याख्या काही करता येत नाही.
किती सोयीचं आहे पाहा हे सगळं. चंद्राकडे पाहून दिवस आणि वर्ष ठरवता येत नाही. पण महिना ठरवता येतो. हेच, सूर्याकडे पाहून दिवस आणि वर्ष ठरवता येतं. पण महिना ठरवता येत नाही.
त्यामुळे जगातल्या कित्येक कालगणनांमध्ये दिवसाची आणि वर्षाची व्याख्या सूर्याच्या भ्रमणावर आधारित आणि महिन्याची व्याख्या चंद्राच्या भ्रमणावर आधारित असा प्रकार आढळतो. हा प्रकार भन्नाट आहे. एक तर हे अतिशय तर्कसुसंगत आहे. सगळ्या व्याख्या पुनरावर्ती खगोलीय घटनांवर आधारित आहेत. दुसरं असं की, ऋतू हे सर्वस्वी सूर्यावर अवलंबून असल्यामुळे वर्षाची व्याख्या सूर्याच्या भ्रमणावर आधारित असेल तर साहजिकच ऋतुमान आणि कालगणना यांची पक्की सांगड बसते. आणि व्यापारउदीम, शेती या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं.
पण महिन्याची व्याख्या चंद्रावर आधारित आणि वर्षाची व्याख्या सूर्यावर आधारित असावी हे सांगणं सोपं असलं तरी करणं मात्र भलतंच अवघड. एक चांद्र महिना हा सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. मग बारा चांद्र महिने म्हणजे ३५४-३५५ दिवस झाले. पण एक सौर वर्ष ३६५-३६६ दिवसांचं असतं. थोडक्यात, एक चांद्र वर्ष हे एका सौर वर्षापेक्षा सुमारे दहा-अकरा दिवसांनी लहान असतं. किंवा एक सौर वर्ष संपतं तेव्हा तेराव्या चांद्र मासातले दहा-अकरा दिवस होऊन गेलेले असतात. या दहा-अकरा दिवसांचं करायचं काय?
हा फरक विचारातच घेतला नाही, तर? हिजरी कालगणनेत असंच केलं आहे. त्या कालगणनेत दिवसाची व्याख्या सूर्याच्या भ्रमणावर आधारित आहे – सूर्यास्त झाला की नवा दिवस सुरू, महिन्याची व्याख्या चंद्राच्या भ्रमणावर आधारित आहे- अमावास्येनंतर नवा चंद्र दिसला की नवा महिना सुरू, आणि वर्षाची व्याख्यादेखील चंद्राच्या भ्रमणावरच अवलंबून आहे – बारा चांद्र मास संपले की संपलं वर्ष. त्यामुळे हिजरी वर्ष हे सौर वर्षापेक्षा दहा-अकरा दिवसांनी लहान असतं. मागच्या वर्षी ११ एप्रिलला आलेली ईद या वर्षी ३१ मार्चला आणि पुढच्या वर्षी २० मार्चला – दर वर्षी बरोब्बर अकरा दिवसांचा फरक – कशी याचं उत्तर लक्षात आलं असेल आता.
इतर अनेक कालगणनांमध्ये मात्र हा दहा-अकरा दिवसांचा फरक येनकेनप्रकारेण भरून काढतात. त्यामुळे होतं काय तर कालगणना आणि ऋतू हे अगदी हातात हात घालून चालले आहेत असं जरी झालं नाही तरी त्यांचा परस्परसंबंध बऱ्यापैकी टिकून राहतो. फारच उलथापालथ झाली आहे असं होत नाही.
अर्थात, हा फरक भरून काढण्यासाठी विविध कालगणना विविध उपाय अवलंबतात. ते कोणते वगैरे गोष्टी आपण पाहणार आहोतच. पण ते यथावकाश.
© The Indian Express (P) Ltd