‘हो, आहे मी टकलू हैवान. चित्रपटातला नाही तर वास्तवातला,’ असे जरा जोरात पुटपुटत सोलापूरचे राहुल गडगडाटी हास्य करत घरात शिरले. आजूबाजूचे कुणी बघतील याची काळजी त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतीच. विद्या संस्थेचा राजीनामा ही ‘तात्पुरती डागडुजी’ याची जाणीव असल्याने त्याचा ताण घेण्याची गरज नाही, असे त्यांनी स्वत:ला बजावले. मग वजनाने मोडणार नाही अशा अवाढव्य खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर त्यांचा मेंदू विचार (?) करू लागला. पडद्यावर रंगवलेले खलनायक वेगळे. वास्तवात सत्य समोर आणायचे असेल तर कधी कधी खलनायक व्हावे लागते हे ऊठसूट माफीची मागणी करणाऱ्यांना कसे समजणार, असे म्हणत त्यांनी या साऱ्यांना एक जोरदार शिवी हासडली.
प्रचंड प्रतिभा अंगी असूनही विस्मृतीत टाकता काय मला. आता घ्या. आलो ना पुन्हा स्मृतीत. तेही जनतेच्या मनात कायम घर करून असलेल्या दोन महान व्यक्तींचा आधार घेऊन. आता बघा, मला कशी भाषणाची निमंत्रणे मिळतात ते. पोलिसांच्या गराड्यात फिरेन त्यासाठी. सिनेमाच्या क्षेत्रातल्या लोकांना स्वत:ची बुद्धी नसतेच. ते कायम दुसऱ्याची पटकथा वाचून मोठे होतात हा समज खोटा ठरवला. सिनेक्षेत्रातला माणूसही बौद्धिक क्षेत्रात खळबळ उडवून देऊ शकतो हेच या दोन्ही वक्तव्यांतून सिद्ध झाले. आता दिग्दर्शक व निर्मातेसुद्धा रांग लावतील दारात. या देशाला लुटणारे मुघल किती लाचखोर होते हे मिथक आता हळूहळू प्रभावी ठरेल. त्यासाठी प्रयत्न करणारा परिवार आहेच की आपल्या पाठीशी. अरे, अत्र्यांनीसुद्धा महामानवाला ब्रह्मर्षी संबोधले होते. तेव्हा त्यांना डोक्यावर घेतले व आता माझ्यावर तुटून पडता. हा अन्याय नाही तर काय? अभ्यासातून इतिहासाला नवे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात काय वाईट? जगभर दिलेल्या भाषणामुळेच माझ्या अभ्यासाला समृद्धी आली हे लक्षात न घेता नुसते टीकेचे कोरडे ओढायचे? ठीक आहे. आता शांत झालो तरी भविष्यात गप्प बसणार नाही. नेमून दिलेले काम तडीस नेणार म्हणजे नेणार. आधीही दिलेली स्क्रीप्ट वाचायचा व आताही तेच करतोय असला घाणेरडा आरोप सहन करणार नाही आता. तेव्हाही बुद्धिमान होतो व आताही आहे. म्हणूनच मला परिवाराने जवळ करून संशोधन संस्थेवर नेमले. इतिहासाचे नवे दालन समृद्ध करा अशी सूचना देऊन. या आतल्या गोष्टी बाहेर कशा सांगणार? म्हणून मग दोन्ही प्रकरणात माफी मागावी लागली. तशीही माफी आमच्या परंपरेसाठी नवी गोष्ट नाहीच. मागितली तेव्हा थोडेफार वाईट वाटले, पण आता यातून बाहेर यायला हवे असे स्वत:ला बजावत राहुल खुर्चीतून उठले.
सवयीने डोक्यावरून दोनदा हात फिरवल्यावर त्यांना ताजेतवाने वाटले. मग खिडकीजवळ जात ते पुन्हा विचारात गढले. इतिहासाची नवी बीजे रोवण्याची पहिल्या टप्प्यातील कामगिरी तुम्ही उत्तमपणे पार पाडली. आता लोकक्षोभ शमेपर्यंत थोडे बाजूला व्हा. नंतर तुम्हाला योग्य ती संधी उपलब्ध करून दिली जाईल, असा निरोप मिळाल्याबरोबर पदत्याग केला. म्हणजे सध्या आपली अवस्था ‘नूपुर’सारखी झालेली. नवीन जबाबदारी मिळेपर्यंत आणखी काही महनियांच्या चरित्रांचा अभ्यास करू, त्यातून नवी बीजे शोधू. तोवर व्याख्याने देत वेळ घालवायचा. ती आयोजित करणाऱ्या ढीगभर संस्था आहेतच की परिवारात. तेवढ्यात फोन वाजला तसे ते भानावर आले. तो घेताच पलीकडून एक वरिष्ठ म्हणाले. ‘पुढचे सहा महिने तुमच्या इतिहासविचार करण्यावर बंदी लादण्यात आली आहे तेव्हा एखादा चित्रपट या काळात पूर्ण करून घ्या.’