‘…घडे ‘लोकसेवा’!’ हे संपादकीय (२१ मार्च) वाचले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुनर्रचना आणि सर्व पदे आयोगामार्फत भरली जाण्याची घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे. पण केवळ घोषणा पुरेशी आहे का? इथली संथ व्यवस्था, कालबाह्य मानसिकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारी उदासीनता यावर ठोस उपाय केले जातील का? विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात, पण केवळ मूठभर पदांसाठी जाहिराती काढल्या जातात. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना सहा-सहा महिने किंवा कधी कधी दोन-दोन वर्षे नियुक्ती दिली जात नाही. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणायची असेल, तर एमपीएससीची पुनर्रचना करण्याबरोबरच पदभरतीची प्रक्रिया अधिक गतिमान, विश्वासार्ह आणि विद्यार्थी हिताची झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकायचा असेल, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवावी लागेल. ही खरेतर राज्य सरकारसाठी संधी आहे.

● माधुरी कळकेकर, विद्यार्थी (कोल्हापूर)

पारदर्शक, वेगवान कारभार हवा

‘…घडे ‘लोकसेवा’!’ हा अग्रलेख वाचला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फेररचनेमुळे यापुढे आयोगाच्या कारभारात सुधारणा होऊन पदभरती सुयोग्य पद्धतीने आणि जलद गतीने होईल, अशी आशा वाटते. आयोगाच्या पदभरती प्रक्रियेत पारदर्शकता असते त्यामुळे सर्वच विभागांतील पदभरतीची जबाबदारी एमपीएससीकडे द्यावी ही परीक्षार्थींची जुनी मागणी आहे. त्यामुळे वर्ग एक, दोन, तीनची भरती प्रक्रिया एमपीएससी करेल ही सरकारची घोषणा महत्त्वाची आहे.

● हर्षल भरणे, आकापूर (यवतमाळ)

एका भरतीसाठी पदवीएवढा वेळ

‘…घडे ‘लोकसेवा’!’ हे संपादकीय वाचले. सध्या परीक्षार्थींची अवस्था दयनीय आहे. २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल २०२५ मध्ये लागतो. कोर्ट-कचेऱ्यांत खेटे घालत विद्यार्थ्यांना दुहेरी अभ्यास करावा लागतो. एक भरती पूर्ण करण्यासाठी आयोग तारीख पे तारीख करत एक पदवी पूर्ण करण्याएवढा कालावधी लावतो. त्यामुळे आयोगाने आपल्या स्वायत्ततेचा वापर करून हस्तक्षेपविरहित भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. मागील काही वर्षांतील जवळपास सर्व भरती प्रकियांची प्रकरणे कुठल्या ना कुठल्या कारणाने न्यायालयात गेली. या प्रश्नांवर तोडगा काढला जावा यासाठी विद्यार्थ्यांनी शक्य ते प्रयत्न केले, पण आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे काही तरी बदल घडेल.

● अमोल पाटील, नांदेड

सामंजस्याची अपेक्षा

‘युक्रेनच्या फाळणीची नांदी?’ (२१ मार्च) हा ‘अन्वयार्थ’ वाचला. अमेरिकेने अनेकदा आपल्या फायद्यासाठी विविध देशांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत आपण जगाचे पोलीस आहोत, असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. समृद्ध खनिजे, नैसर्गिक साधन-संपत्ती, दुर्मीळ संयुगांवर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिका सातत्याने प्रयत्नशील असते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड, पनामा आणि सुवेझ कालव्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासंदर्भात, कॅनडाला अमेरिकेत विलीन करण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. आता युक्रेनमधील खनिजे व दुर्मीळ संयुगांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न दिसतो. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध थांबविण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. मात्र अशा युद्धजन्य परिस्थितीत बलशाली राष्ट्रांनी जागतिक राजकारणात सामंजस्याची आणि सर्वसमावेशक भूमिका पार पाडणे आणि युक्रेनच्या समस्येवर वाटाघाटीतून तोडगा काढणे गरजेचे आहे.

● राजेश नंदनवरे, छत्रपती संभाजीनगर

आधारस्तंभ निखळला

बहुजन चळवळीचे अग्रणी, ‘राष्ट्रजागृती लेखमाला’कार प्रा. मा. म. देशमुख यांच्यासंदर्भातील ‘व्यक्तिवेध’ (२१ मार्च) वाचला. बहुजनांना शिक्षणाचा अधिकारच नाकारल्यामुळे त्यांचा इतिहास कोणी लिहून ठेवला नाही. मा. म. यांनी संशोधन करून पुराव्यांनिशी तो सर्वांसमोर आणला. ही त्यांची कामगिरी कायम स्मरणात राहील. त्यांनी बहुजनांना समजेल अशा सोप्या भाषेत पुस्तके लिहून ती कमीत कमी किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली. त्यांच्या ‘शिवशाही’ या पुस्तकात एक तळटीप दिली आहे. ‘लोकमहर्षी भाऊसाहेब हा ग्रंथ आमचेकडे उपलब्ध आहे,’ असे त्यात म्हटले आहे. मी देशमुख यांना तो ग्रंथ पाठविण्याची फोनवरून विनंती केली. त्यांनी तो ग्रंथ पाठविला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीचा आधारस्तंभ निखळला आहे.

● प्रा. एम. ए. पवार, कल्याण

Story img Loader