चित्रकार, क्वचित बालसाहित्याच्या पुस्तकांसाठीही चित्रे काढून देणारे बोधचित्रकार (इलस्ट्रेटर), जेजे स्कूल ऑफ आर्ट या महत्त्वाच्या कलाशाळेतले अध्यापक, गोवा कॉलेज ऑफ आर्टचे प्राध्यापक ही मृगांक जोशी यांची ओळख.. पण अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डलासजवळच्या आयव्हीर्ग गावातल्या मोठय़ा हिंदूू मंदिरासाठी चित्रे काढण्याचे काम त्यांनी घेतले आणि कालांतराने त्याच मंदिरात ते पुजारीदेखील झाले होते! अगदी कोविडकाळातले निर्बंध संपेपर्यंत ते आयव्हीर्गमधल्या ‘डीएफब्लू हिंदू टेम्पल कॉम्प्लेक्स’मधल्या कर्मचारी निवासात राहून, भारतात परतले होते.
जीवनाला आहे तसे स्वीकारण्याच्या त्यांच्या वृत्तीचा हा तपशील अनेकांना त्यांच्या मृत्यूनंतरच माहीत झाला. पण मृगांक जोशी सरांना संस्कृत उत्तमरीत्या अवगत होते, हे ‘जेजे’मधील त्यांच्या विद्यार्थ्यांच्या दोन पिढय़ांना माहीत होते. भाषांची गोडी, संस्कृतचे अधिष्ठान, त्यातून वाढलेला संतसाहित्याचा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास तसेच जिथे कुठे काम करत असू तिथे हाती घेतलेले काम आवडीने करण्याचे आध्यात्मिकच म्हणावे असे भान, यांमुळे मृगांक जोशी हे डलासजवळील त्या मंदिरात येणाऱ्यांनाही आठवत असतील, आवडत असतील..
जसे ते ‘जेजे’मधल्या विद्यार्थ्यांना आवडत आणि नंतरही आठवत. तेव्हा ते भरवर्गात फारच कमी बोलायचे. विद्यार्थी नसताना वर्गात येऊन काम कसे चालले आहे हे पाहून जायचे. कामातल्या प्रगतीवर लक्ष ठेवायचे आणि कोणी नेमके कसे पुढे जावे हे सांगायचे. अगदी मोजकेच बोलणारे मृगांक जोशी गप्पा वगैरे मारू लागले की एकतर ऐकत राहावेसे वाटे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, सरांनी जणू आपल्याला उत्तीर्ण केल्याचा आनंद त्या वेळच्या विद्यार्थ्यांना होई. सहकाऱ्यांनाही ते सहज साथ देत आणि ज्या प्रसंगात नव्या सहकाऱ्याला सहज फटकारता येईल अशाही वेळी ऋजुतेनेच वागत ते कसे, याची एक आठवण सुहास बहुळकरांनी ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विशेषांकातील लेखात सांगितली आहे. न्यूड स्टडीसाठी स्त्री प्रमाणेच पुरुष मॉडेलही बसवू, विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देऊ, हा प्रस्ताव मृगांक जोशींनी कसा नाकारला हे बहुळकरांच्याच शब्दांत वाचण्याजोगे! चित्रकार म्हणून त्या वेळच्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट शैलीशी त्यांचे नाते अधिक जवळचे होते.
( ‘रापण’कार प्र. अ. धोंड यांनी ‘गुजराती मुले जे. एम. अहिवासींच्या वर्गात जात आणि मराठी मुले व्यक्तिचित्रण शिकत’ अशा अर्थाची स्पष्टोक्ती ज्या काळाविषयी केली, तेव्हा जोशी शिकत होते) पण जेजेत कसोशीने शिकवली जाणारी अकॅडमिक शैली त्यांनी आत्मसात केली. पुढल्या काळात आयव्हीर्गच्या ‘एकता मंदिर’ सभागृहात केलेली २० हून अधिक चित्रे, नरेंद्र डेंगळे यांच्या आग्रहामुळे पुण्याच्या रामकृष्ण मठातील ‘युनिव्हर्सल टेम्पल’ आणि तळेगावजवळील पुष्पसंशोधन केंद्रासाठी मोठी चित्रे, यांतून मृगांक जोशी यांचे रचनाकौशल्य आणि रंगसंयोजन लक्षणीय ठरले. वयपरत्वे जडलेल्या व्याधीनंतर, ५ जुलै रोजी त्यांचा देहान्त झाला.