आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा कवीने अन्य एका भाषेत एखाद्या अढळ ताऱ्याप्रमाणे आपलं स्थान निर्माण करावं ही गोष्ट खरोखरीच थोर आहे. माधव मुक्तिबोधांना जाऊन ६० वर्षे झाली, पण त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्यांच्या कवितांमधून नवीन काहीतरी सापडत राहतं…

एका नीरव दुपारी विनोद कुमार शुक्ल यांच्याशी रायपुरात गप्पा चाललेल्या असताना मध्येच ते म्हणतात, ‘चाय बनवाउँ, आधा- आधा कप.’ चहा येतो आणि या चहावरून त्यांना थेट गजानन माधव मुक्तिबोध यांची आठवण होते. अर्ध्या कप चहाला मुक्तिबोध ‘सिंगल’ म्हणायचे. मोठ्या चकचकीत हॉटेलात चहा पिणं त्यांना आवडायचं नाही. रस्त्याकडेला चहाच्या टपरीवर गेल्यानंतर ते अगदी आरामात बसायचे. इथे बसल्यानंतर त्यांना प्रशस्त वाटायचं. तरीही ते जास्तीत जास्त स्वत:ला लपवत असत कारण एकांत मिळावा. मुक्तिबोधांच्या नागपुरातील दिवसातल्या सहवासाबद्दल लिहिताना भाऊ समर्थ यांनीही असंच त्यांच्या चहा पिण्याच्या पद्धतीविषयी लिहून ठेवलंय… पण इथं सांगायचंय ते त्यांच्या चहा पिण्याबद्दल नाही, विनोद कुमार शुक्ल मुक्तिबोधांविषयी काय म्हणाले त्याच्याबद्दल. एखादा लेखक- कवी किती मोठा, काळाच्या पटावर त्याचा प्रभाव किती हे सांगताना विनोदजी बोलून गेले ते त्यांच्याच शब्दात असं होतं, ‘मैं तो कहता हूँ, अपने बाएँ हाथ को जैसे बिते हुए समय में पचास साल तक कहीं ले जाऊँ और अपने दाएने हाथको आनेवाले पचास साल में बढाऊँ तो सौ साल मुझे मुक्तिबोध जैसा कोई दिखता नही.’ मुक्तिबोधांचं मोठेपण सांगण्यासाठी याहून दुसरा मापदंड कुठला असू शकेल.

मराठी मातृभाषा असलेला कवी एकूण हिंदी कवितेत इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी असावा ही गोष्ट तशी थोरच मानली पाहिजे. जळगाव जिल्ह्यातून मुक्तिबोधांचे पूर्वज कधीतरी मध्य प्रदेशात ग्वाल्हेरला गेले आणि हे कुटुंब तिकडचेच झाले. अवघं सत्तेचाळीस वर्षांचं आयुष्य मुक्तिबोधांना लाभलं. कुठल्याही परिवर्तनशील उपक्रमात, भाषणात, सभेत त्यांच्या एका कवितेचा हमखास उल्लेख होतो. ‘अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठानेही होंगे, तोडने होंगेही मठ और गढ सब’. याशिवाय ‘पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है?’ हा त्यांचा जुमला तर प्रसिद्धच आहे… तर अशा गजानन माधव मुक्तिबोधांचा त्यांच्या हयातीत एकही कवितासंग्रह प्रसिद्ध झाला नाही. ‘चाँद का मुह टेढा है’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर आला. पुढे पंधरा वर्षांनी ‘भुरी भुरी खाक धुल’ हा कवितासंग्रह आला. वेगवेगळ्या वाङ्मयप्रकारात ते लिहित राहिले. कविता लिहिल्या, डायरी लिहिली आणि कथाही लिहिल्या. ‘काठ का सपना’, ‘विपात्र’, ‘सतह से उठता आदमी’ हे त्यांचे कथात्म साहित्य आहे. सहा खंडांमध्ये ‘मुक्तिबोध रचनावली’ उपलब्ध आहे. हिंदी साहित्यात सर्वश्रेष्ठ अशी कविता लिहिणाऱ्या मुक्तिबोधांचे बंधू शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी मराठीतून लेखन केलं. क्षिप्रा, सरहद्द, जन हे वोळतू जेथे ही कादंबरी त्रयी आणि त्यांच्या कविता मराठी वाचकांना परिचित आहेत. एका भावाचं लेखन मराठीत आणि एका भावाचं हिंदीत असं हे अपवादभूत उदाहरण आहे. दोघांचंही साहित्यात मोठं योगदान राहिलं.

मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ आणि ‘ब्रह्मराक्षस’ या कवितांमध्ये एक प्रकारची फँटसी आहे, ती तत्त्व म्हणून येते. जीवनाची जंगलं जळत आहेत, वेदनेच्या नद्या वाहत आहेत, युगायुगातील पूर्वजांच्या चितांचा उद्विग्न रंग या नद्यांमध्ये मिसळलाय, विवेकाचा धारदार रंधा चालतो आहे आणि जणू काही माझ्या स्वत्वाचीच सालटी काढली जात आहेत. आकाश कंपित झालं आहे. अशा निसर्गातील किती तरी चमत्कारिक घटना, घटितं आणि अघटितंसुद्धा मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ या कवितेत येतात. ही केवळ सृष्टीतली उलथापालथ राहात नाही ती वाचणाऱ्यालाही अंतर्बाह्य हादरून टाकते. अनेकदा वाचकाला या दीर्घकवितांमध्ये एक अशी विलक्षण चित्रात्मकता जाणवते, पण सुनियोजित अशी अर्थसंगती लागली नाही की वाचकांना ती फँटसी वाटू लागते. या प्रकारची फँटसी मुक्तिबोधांआधीच्या कवितेत दिसत नाही. म्हणूनच त्यांची कविता अपूर्व मानली जाते. मुक्तिबोधांच्या याच वैशिष्ट्यामुळे त्यांना हिंदीत ‘गोत्रहीन’ कवी असं मानलं जातं. कवितेत त्यांचा कोणी पूर्वज नाही असंही म्हटलं जातं. ही कविता आवेगी आणि लखलखीत वाटावी अशी आहे. कवितेच्या एका ओळीनंतर दुसरी ओळही त्याच ताकदीने येते. तप्त असं लोखंड वितळवून तयार झाल्याप्रमाणे दणकट असे शब्द एकामागोमाग येतात. कवितेतला प्रत्येक शब्द योजताना आपण हा शब्द का आणतोय यामागे त्यांचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान असायचं. विनोदजी या गप्पांत म्हणाले होते, ‘ऐसी गहर सोच रचना में मैने कभी देखी नही.’

मुझे कदम कदम पर चौराहे मिलते है बाहे फैलाए,

एक पैर रखता हूँ कि सौ राहे फुटती

या मुक्तिबोधांच्याच ओळी आहेत. पावलापावलावर चौरस्ते आढळावेत बाहू पसरल्यासारखे आणि एक पाय ठेवला तर शंभर वाटा फुटाव्यात अशी स्थिती त्यांची कविता वाचताना वाचकाचीही होऊन जाते. त्यांची कविता वाचणं ही रमणीय किंवा सुखद गोष्ट नाही. ती कोणाही वाचकाला थकवते. एखाद्या ओबडधोबड रस्त्यावरचा प्रवास जसा आपल्याला शिणवतो, या प्रवासाचाही एक शीण येतो. प्रवासानंतरची थकावट सर्वांगाला घेरून टाकते असा काहीसा अनुभव ही कविता देते. याच दीर्घकवितेत सत्ता आणि बुद्धिजीवी वर्गाच्या हितसंबंधाचा त्यांनी दंभस्फोट केला आहे. शासनकर्त्यानी सामान्यांच्या आकांक्षा पायदळी तुडवणं आणि समाजातल्या तथाकथित विचारवंतांनी सत्ताधाऱ्यांशी संगनमत करून सामान्यांशी जणू द्रोह करणं याचे प्रतिध्वनी मुक्तिबोधांच्या ‘अंधेरे में’ या कवितेत उमटत राहतात. संगमरवरी असं तिचं शिल्प नाही. काळ्या कभिन्न आणि कातळासारख्या टणक दगडातून आकाराला यावी तशी ही कविता आहे. मात्र तिला तिची स्वत:ची आंतरिक लय आहे आणि वाचकाला आतून बाहेरून भोवंडून टाकण्याची उपजत गती आहे. ‘अंधेरे में’चा अनुवाद मराठीत सुरुवातीला वा. रा. कांत आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी केला.

नागपुरातील वास्तव्यात ‘नया खून’ या साप्ताहिकातली पत्रकारिता, वसुधा मासिकातून त्यांनी लिहिलेली ‘एक साहित्यिक की डायरी’, त्यानंतर शेवटच्या सात आठ वर्षात त्यांनी राजनांदगाव (आताच्या छत्तीसगडमध्ये असलेले) इथं अध्यापनाचं कार्य केलं. याच काळात एका असाध्य अशा आजारपणाने त्यांना घेरलं. ते कोमात गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. एवढ्या वर्षानंतरही मुक्तिबोधांची कविता चढणीसाठी अवघड वाटणाऱ्या एखाद्या डोंगराप्रमाणे वाचकाला आवाहन करते आणि आव्हान म्हणूनही ठाम राहते. १९६४ साली मुक्तिबोध गेले. २०१७ हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष होतं आणि त्यांना जाऊन आता साठ वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षात अनेक पिढ्या आल्या पण लिहिणाऱ्या प्रत्येक पिढीला या कवितांचं पुन्हा पुन्हा वाचन करावं वाटतं. प्रत्येक पुनर्वाचनात हा कवी नव्याने आकळू लागतो. हिंदी भाषेत असाधारण अशा दर्जाचं लिहिणाऱ्या या कवीचं आणखी एक विशेष असं निरीक्षण हरिशंकर परसाई यांनी नोंदवून ठेवलंय. शेवटच्या आजारपणाच्या काळात विव्हळताना मुक्तिबोधांच्या तोंडून ‘आई गं’ असा उद्गार निघायचा आणि बायकोला आवाज देऊन बोलावताना ते ‘अगं’ असं म्हणायचे.

आजारी असताना मुक्तिबोधांना राजनांदगावहून भोपाळला नेण्यात आलं आणि त्यानंतर भोपाळहून दिल्लीला. तिथल्या ‘एम्स’मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. अशोक वाजपेयी त्यावेळी तिथे होते. एखाद्या व्यक्तीने आपल्यासमोर शेवटचा श्वास घ्यावा असा हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग. त्यांनी त्यावेळची आठवण एका लेखात नमूद करून ठेवलीय. दिल्लीतल्या निगमबोध घाटच्या दिशेने मुक्तीबोध यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा अनेक मोठमोठे लेखक, कलावंत त्यात सहभागी झाले होते. प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांचाही त्यात समावेश होता. या अंत्ययात्रेत हुसैन यांनी पहिल्यांदा अनवाणी चालायला सुरुवात केली. त्यानंतर ते आयुष्यभर अनवाणीच राहिले. ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा कवीने अन्य एका भाषेत एखाद्या अढळ ताऱ्याप्रमाणे आपलं स्थान निश्चित करावं ही गोष्ट खरोखरीच थोर आहे. लिहिण्यातली जोखीम काय असते याचं उदाहरण म्हणूनही मुक्तिबोध कायमच महत्त्वाचे आहेत.

aasaramlomte @gmail.com

लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.