रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वर्तनात दिसणारी मग्रुरी कायम आहे, हेच मुंबईतही पुन्हा दिसले. वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीवरील दाम्पत्याला उडवल्याच्या घटनेने पुन्हा एकदा बेदरकारपणे वाहन चालविण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला. पुण्याच्या कल्याणीनगरात भरधाव आलिशान मोटारीने दोन संगणक अभियंत्यांचा जीव घेतला, त्याला जेमतेम दीड महिना झाला. त्यानंतर जवळपास तसाच प्रकार मुंबईत होऊन त्यात एका सामान्य व्यक्तीचा हकनाक बळी जातो, याचा अर्थ आणखी काय काढणार? विजयोत्सवासाठी रस्ते अडवून केल्या जाणाऱ्या उन्मादापासून बिनधास्त सिग्नल तोडण्यापर्यंत आणि ‘नो एंट्री’तून वाहने दामटण्यापासून नियम पाळणाऱ्यांवरच अरेरावी करण्यापर्यंत सगळे अगदी आहे तसेच सुरू आहे! आधीच्या घटनांतून कोणीही काहीच धडा घेत नाही. नव्हे, घेणारच नाही, अशी ही अत्यंत निर्लज्ज वृत्ती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पहिली बाजू : असत्याची फॅक्टरी बंद पडेल!

पुण्यातील घटनेच्या वेळी चालक एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता, मुंबईच्या अपघातातील चालक शिवसेना (शिंदे गट) उपनेत्याचा मुलगा आहे. पुण्याच्या घटनेतील मुलगा अल्पवयीन होता, हा फरक सोडल्यास रात्री केलेली पार्टी, चालक बरोबर असूनही त्याला बाजूला बसवून मुलाने स्वत: गाडी चालवणे, अपघात झाल्यानंतर पळून जाणे वा तसा प्रयत्न करणे आदी तपशील साधारण सारखेच आहेत. मुंबईच्या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीला धडकून महिला खाली पडल्यावर तिला गाडीबरोबर फरपटत नेण्याचा प्रकार. ‘धडकेनंतर पत्नी पाठीवर कोसळल्याने ती गंभीर दुखापतीपासून वाचली होती. मात्र, चालकाने तिला फरपटत नेले. त्याने थोडी माणुसकी दाखवली असती, तर पत्नी जिवंत असती.’ – हे या घटनेत दगावलेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांचे म्हणणे तर कुणालाही चीड यावी असेच. आलिशान मोटारींचे अनेक चालक ज्या बेलगाम पद्धतीने गाड्या चालवतात, ते पाहता त्यांना आपणच धडक दिलेल्या माणसाला मदत करायला जावे, अशी सुबुद्धी होणे फारच लांब. अशा प्रकारच्या रस्ते अपघातात बळी पडणारे हे या बेमुर्वतखोर वृत्तीचे बळी असतात. दुर्दैवाने ही वृत्ती कमी-अधिक प्रमाणात इतकी सार्वत्रिक आहे, की अशा घटनांत गाडी कुठली- गेले कोण एवढाच तपशिलाचा फरक. हकनाक जीव गमावलेल्यांच्या आप्तेष्टांना योग्य न्याय मिळतो का, हाही प्रश्न अशा प्रकारच्या सर्व अपघातांनंतर कायम. आरोपींना व्हायलाच हवी अशी कठोर शिक्षा होते का, यावर तर आणखीच मोठे प्रश्नचिन्ह.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : वायफळ तक्रार!

याचा संबंध व्यवस्थेशी आहे. ते प्रकरण नीट हाताळले जाणे, योग्य कलमांतर्गत गुन्हे दाखल होणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुण्यातील प्रकरणात जनमताच्या रेट्यामुळे नंतर कडक कलमे लावली गेली आणि मुंबईतील घटनेतही भारतीय न्याय संहितेतील कठोर शिक्षेची तरतूद असलेली कलमे गुन्हा नोंदवताना लावली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनीही कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल, अशी ग्वाही दिली. मात्र, उत्तर भारतातल्या निठारी हत्याकांडातला मुख्य आरोपीसुद्धा कायद्याच्या प्रक्रियेनुसारच सुटू शकतो, हे किमान सीसीटीव्हींत नोंद झालेल्या घटनांबाबत तरी घडू नये. भरधाव गाड्या चालवून माणसे चिरडणाऱ्या बेताल वृत्तीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न केवळ पोलीस प्रशासन किंवा न्यायव्यवस्थेपुढचा नाही, तर समाजापुढचाही आहे. गाडी चालविण्याचा परवाना हा ‘नियमांच्या अधीन राहून गाडी चालविण्यासाठी’ मिळत असतो, इतके साधे भान सुटलेल्यांना आवरण्यासाठी नियम आणखी कडक करणे हाच एकमेव उपाय. अर्थात, ते तसे कडक केले की त्याची अंमलबजावणी कशी रखडते याचा अनुभव ‘मोटार वाहन कायदा २०१९’मधून महाराष्ट्रासह अनेक राज्यांना आहे. लोकांचा विरोध हे कारण त्यासाठी पुढे केले जाते. मात्र, वाहनचालकांमध्ये काही मूलभूत शिस्त आणण्यासाठी नियम कडकच असावे लागतात. वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी कठोर शिक्षांबरोबरच वाहन परवाना थेट रद्द करण्यासारखी पावले उचलावी लागणारच आहेत. मुंबईतील घटना घडून २४ तास उलटत नाहीत, तोवर पुण्यात पुन्हा भरधाव गाडीने दोघांना उडवल्याची घटना घडली. या घटनेत गस्त घालणारा एक पोलीस कर्मचारी ठार होतो, दुसरा जबर जखमी होतो आणि हे सर्व करणारा चालक आपल्याला काहीच होणार नाही, असे गृहीत धरून निवांत घरी जाऊन झोपतो यामागे नियम, कायदे, त्यातील कलमे याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही, ही बेदरकार वृत्ती आहे. ती चेचण्यासाठी वाहनचालक परवाना रद्द करण्यासारखे कडक नियम हाच उपाय असू शकतो!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bmw hit and run case woman dies after bmw hits two wheeler in worli zws
Show comments