मुंबईने नुकतेच विक्रमी ४२ व्यांदा रणजी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले, ही बातमी होत नाही. तर या अजिंक्यपदासाठी आठ वर्षे वाट पाहावी लागली, ही खरी बातमी. जवळपास ९० वर्षांच्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासामध्ये ४०हून अधिक अजिंक्यपदे मुंबईच्या नावावर आहेत. म्हणजे दर दोनेक वर्षांनी एकदा मुंबईकडून विजय अपेक्षित आहे. या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर आठ वर्षे प्रतीक्षा म्हणजे प्रदीर्घ दुष्काळच. तसे पाहता आजघडीला मुंबईमध्ये क्रिकेटचे धडे गिरवून मोठे झालेले दहाहून अधिक खेळाडू भारताच्या विविध आंतरराष्ट्रीय संघांतून झळकत आहेत. रोहित शर्मा हा तिन्ही आंतरराष्ट्रीय संघांचा कर्णधार आहे. यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खानसारखे खेळाडू भारताच्या कसोटी संघामध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्य रहाणेसारखा मुरब्बी क्रिकेटपटू आज भारतीय संघात नाही, पण त्याचे नेतृत्वगुण आजही मुंबईसाठी लाभदायी ठरत आहेत. श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ सध्याच्या कसोटी संघात नाहीत. पण तरी हे पुनरागमनासाठी आवश्यक उमेद आणि गुणवत्ता बाळगून आहेत. चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, अभिषेक नायर, सुलक्षण कुलकर्णी या मुंबईकरांची गणना देशातील निष्णात प्रशिक्षकांमध्ये केली जाते. मुंबई क्रिकेटची समर्थ परंपरा ही मंडळीदेखील सांभाळत आहेत. ही परंपरा आहे खेळावरील निस्सीम प्रेमाची, सचोटीची आणि मेहनतीची.
हेही वाचा >>> चांदनी चौकातून : ‘मोटी चमडी’ कोणाची?
मुंबई क्रिकेटमध्ये आज अनेक उपनगरीय क्रिकेटपटू झळकत आहेत. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर ही उदाहरणे वानगीदाखल देता येतील. पण क्रिकेटचे धडे घोटवून घेणारी शिवाजी पार्क, क्रॉस मैदान, आझाद मैदानसारखी केंद्रे आजही दक्षिण मुंबईतच आहेत. या ठिकाणी जायचे म्हणजे ‘जिवाची मुंबई’ करावीच लागते. लोकलच्या प्रवासातून अनेक दिव्ये पार करत मैदानात सरावासाठी आलेल्या खेळाडूच्या मानसिक कणखरपणावर विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. लोकल, बसप्रमाणे खेळाच्या मैदानावरही इच्छुकांची भलीमोठी रांग. अशा वेळी कशीबशी संधी मिळाल्यानंतर ती हातची जाऊ द्यायची नाही याकडेच कल. हीच ती सुप्रसिद्ध ‘खडूस’ वृत्ती. याच वृत्तीतून उम्रीगर, वाडेकर, गावस्कर, वेंगसरकर, मांजरेकर, तेंडुलकर, रहाणे घडले. याच वृत्तीतून ४० हून अधिक रणजी अजिंक्यपदेही चालून आली.
हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : आपण गिरवलेले धडे आपण विसरलो आहोत का?
युवा खेळाडू हा या परिसंस्थेचा एक भाग. पण या गुणवत्तेला मार्गदर्शनाची जोड हवीच. मुंबई क्रिकेटमध्ये असे मार्गदर्शक प्रत्येक दशकात निर्माण झाले. अण्णा वैद्य, कमल भांडारकर, वासू परांजपे, रमाकांत आचरेकर अशा गुरूंची मुंबई क्रिकेटला मोठी परंपरा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाइतकेच शिस्तीच्या आग्रहामुळे डोक्यात हवा गेलेले क्रिकेटपटू मुंबईत फारसे कधी आढळले नाहीत. क्रिकेटचे तंत्र घोटवून घेण्याबरोबरच प्रामाणिक माणूस म्हणूनही या गुरुजनांनी खेळाडूंना घडवले. या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच उत्तम क्रिकेटपटूंइतकेच उत्तम प्रशिक्षकही मुंबई क्रिकेटला लाभले. आज असे अनेक प्रशिक्षक इतर रणजी संघांनाही मार्गदर्शन करत आहेत. आयपीएलमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. लाल चेंडूचे क्रिकेट जो उत्तम खेळतो, त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये कौशल्य प्राप्त करता येतेच हा धडा पहिल्यांदा मुंबई क्रिकेटने देशाला दिला. तंत्रावर हुकमत म्हणजे खेळावर हुकमत हा मंत्र घोटवूनच रोहित शर्मासारखे फलंदाज मैदानावर थक्क करणारी फटकेबाजी करू शकतात. या फटकेबाजीला, तंत्राला, अस्सल क्रिकेटला दाद देतील असे चाहते लाभणे हेदेखील मुंबई क्रिकेटचे वैशिष्टय. तीस-चाळीस वर्षे केवळ रणजी आणि कांगा लीग पहायला येणारे प्रेक्षक वानखेडे, बेबर्न, बीकेसी या मैदानांवर आजही मोठया संख्येने आढळतात. दक्षिण मुंबईतील कार्यालयांमध्ये जाणारा-येणारा मोठा वर्ग जायच्या-येण्याच्या वाटेवर थांबून मुंबईतील मैदानावर पांढऱ्या पोशाखांमध्ये खेळले जाणारे क्रिकेट सामने उत्कटतेने आस्वादत असतो. मुंबई क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेटपटूंचे नाते वेगळे आहे. त्यामुळेच एकीकडे मुंबईकर क्रिकेटपटूंना डोक्यावर घेणारे, वेळ पडल्यास सचिनसारख्या क्रिकेटपटूची वानखेडेसारख्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात हुर्योही उडवतात. हा हक्क, हा अधिकार सचिननेही मान्य केलेला असतो. या प्रेमाची परतफेड रणजी विजयाने झालेली आहे. कोणत्याही आयपीएलपेक्षाही आज या नगरीत त्यास अधिक महत्त्व आहे, हे महत्त्वाचे.