‘मुंबईच्या कांदळवनांची भरपाई चंद्रपूरमध्ये’ ही बातमी (लोकसत्ता- ११ एप्रिल) वाचली. दहिसर -भाईंदर येथील जाफरी खाडी आणि वसई खाडीलगतची कांदळवने तोडून त्याऐवजी चंद्रपूरमध्ये वनीकरण, हा उलटा न्याय आहे. कांदळवने प्रामुख्याने समुद्रकिनारा, खाडी किंवा खारटन जमिनीवर निसर्गनिर्मित असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनीचा पोत कांदळवनासाठी पोषक नाही. यापूर्वी आरे कॉलनीत अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्याची भरपाई चंद्रपूर, गडचिरोलीत करण्याचा निर्णय घेतला होता; त्याचे पुढे काय झाले? मुंबई परिसरातील ही हिरवाई नष्ट करून, जिथे अभयारण्ये आहेत अशा चंद्रपूर जिल्ह्यात झाडे लावून पर्यावरणाचा कोणता समतोल साधणार? केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने भौगोलिक समतोलतेचा विचार केला आहे काय? कांदळवनांच्या कत्तलीमुळे मुंबई परिसराचे होणारे पर्यावरणीय नुकसान सरकार नेमके कसे टाळणार आहे?
● कल्याण केळकर, विरार
प्रश्न बाजूलाच राहतात, कारण…
‘मतदान सरो व मतदार मरो’ हा लेख वाचला. भावनिक मुद्दे चर्चेत आणून मूळ व जनतेचे प्रश्न बाजूला सारायचे हे बेजबाबदारपणाचे आहेच, पण हे प्रकार होत राहतात याला विरोधी पक्षातील समन्वय (किंबहुना त्याचा अभाव) हाही या प्रकारांना तितकाच कारणीभूत आहे. सत्ताधारी लोकांचे असे वागणे हे अनीतीचे व लोकशाहीला मारक आहे. विरोधक संख्येने कमी असले तरी त्यांच्या मतांचा आदर करणे हा सत्ताधाऱ्यांचा राजधर्म आहे पण तो विसरून त्यांनी विरोधी पक्षनेता न देणे हे त्यांच्या कोत्या मनाचे लक्षण वाटते. सत्ताधाऱ्यांत बदल होईल तेव्हा होवो, तोवर विरोधी पक्षाने हे लक्षात ठेवावे की, जनआंदोलन नसेल तर सत्ताधारी मदमस्त होतात. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अगर सड़कें खामोश हो जाएं तो संसद आवारा हो जाएगी।’
● अॅड. निशांत वाघमारे, लातूर
इच्छामरणाचा मार्ग खुला करावा
‘सहचारिणीच्या असह्य वेदनांवर मृत्यूची फुंकर’ हे वृत्त (लोकसत्ता- ११ एप्रिल) वाचले. कधी कधी सर्व उपचार करून, सर्व सकारात्मक विचार अंगीकारूनही आजार कमी होत नाही. तो रुग्ण काय भोगत असतो, ते त्याचे त्यालाच समजते. अशा व्यक्तींसाठी इच्छामरण ही बाब कायद्याने मान्य करावी. सदर घटनेत केवळ आत्महत्या नाही तर हत्यादेखील आहे. त्यामुळे याची चौकशी होईलच. पत्नीची मरणाची इच्छा होती का हा मोठा प्रश्न आहे. याचेच उत्तर शोधले जाईल. यानिमित्ताने पुन्हा एकदा इच्छामरण हा मुद्दा चर्चिला जावा असे वाटते.
● संजीव फडके, ठाणे
जगण्यासाठी सर्वांची साथ हवी
‘सहचारिणीच्या असह्य वेदनांवर मृत्यूची फुंकर’ हे वृत्त वाचून वाटले की, त्यांना टोकाचे पाऊल का उचलावे लागले हाही मोठा प्रश्न आहे. एक तर सततच्या आजारपणामुळे आजारी व्यक्ती आणि त्याचे कुटुंबातील कंटाळून जातात, महागडे औषधोपचार, त्यातून आर्थिक ओढाताण, घरातील कामकाजावरतीही मर्यादा येणे, यातून कुटुंबीयांचेही मानसिक खच्चीकरण होणे… अशा वेळी खरे तर जवळच्या नातलगांनी, मित्रमंडळी, आजूबाजूच्या लोकांनी योग्य साथ दिली, भावनिक, मानसिक आधार दिला, विचारपूस केली, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केला तर आजारी व्यक्ती आणि तिच्यासोबतच्या नातेवाईकांचेही मानसिक पुष्टीकरण होऊ शकेल, जगण्याचे बळ वाढू शकेल.
● अनिल साखरे, ठाणे पूर्व
अर्थव्यवस्था-द्रोहींनाही परत आणा
मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर १६ वर्षांनंतर भारतात आणण्यात आले, हे स्वागतार्हच. २०१६ साली नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांसारखे अनेक कर्जबुडवे देशाबाहेर पळून गेले आहेत. विशेष म्हणजे विजय मल्ल्याने विविध बँकांमधून जवळपास नऊ हजार कोटी रुपये कर्ज घेतले आणि राज्यसभा सदस्य असताना तो देशाबाहेर जो पळून गेला. नीरव मोदी, चोक्सी हे पंजाब नॅशनल बँक व इतर बँकांची जवळपास साडेतेरा हजार कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशी पळून गेले. संदेसरा बंधूंनी स्टर्लिंग बायोटेक कंपनीमार्फत साडेचौदा हजार कोटींचा घोटाळा केला. त्यानंतरही बड्या थकीतदारांना उदार मनाने माफ करून, करोडो रुपयांवर पाणी सोडून नव्याने कर्ज देण्याची तयारी आरबीआय, बँका करत राहतात. त्यामुळे राणा याला भारतात आणले गेले ते चांगलेच झाले, आता भारतीय अर्थव्यवस्थेशी द्रोह करणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आदींना भारतात परत आणून त्यांच्याकडून व्याजासहित पै न पै वसूल करायला हवी.
● अनंत बोरसे, शहापूर (जि. ठाणे)