कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणार असतानाच तेथील राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागलेले दिसते. गेल्या दहा दिवसांत कर्नाटक किनारपट्टी परिसरात तीन राजकीय हत्यांमुळे वातावरण ढवळून निघाले. उडपीमध्ये सुरू झालेल्या हिजाबच्या वादाचे पडसाद देशभर उमटले. दक्षिण कन्नड या जिल्ह्यात १९ वर्षीय मसूद याची हत्या करण्यात आली होती. आठवडाभरातच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण नेत्तारू तर त्यानंतर दोन दिवसांत मोहमंद फझील या युवकाची हत्या झाली. या हत्यांना धार्मिक रंग देण्यात आला. युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. दक्षिण कन्नड, उडुपी, मंगळूर आदी भागातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू झाले. पक्षात एवढी संतप्त प्रतिक्रिया उमटली की, प्रदेशाध्यक्षांच्या गाडीला कार्यकर्त्यांनीच वेढा दिला. पक्षाच्या मंत्र्यांना रोखण्यात आले. मुख्यमंत्रीपदाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हत्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी शोक व्यक्त करण्यासाठी जावे लागले. गेल्या चार वर्षांत कर्नाटक किनारपट्टी परिसरात २१ जणांच्या हत्या झाल्या आहेत. कर्नाटकचा हा परिसर गेल्या काही वर्षांत धार्मिक ध्रुवीकरणाचा केंद्रिबदू ठरला आहे. या ध्रुवीकरणाचा भाजपला फायदाही झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत या परिसरातील विधानसभेच्या २१ पैकी १८ जागा भाजपने जिंकल्या. उडुपीमधील हिजाबच्या वादानंतर पुन्हा या परिसरातील वातावरण तापू लागले होते. हत्यासत्रानंतर भाजप व संघ परिवाराने सारे खापर हे मुस्लीम संघटनांवर फोडले आहे. केरळात पूर्वी डावे पक्ष आणि संघ परिवारात सूडाची भावना होती, त्यातून अनेकांच्या हत्या झाल्या होत्या. इथे भावना तीच, पण प्रकार निराळा. देशविरोधी शक्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजप आणि संघ परिवाराकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येऊ लागली. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मुद्दा हवाच आहे. संतप्त भाजप व संघ परिवारातील कार्यकर्त्यांचा रोष कमी करण्याकरिता मुख्यमंत्री बोम्मई यांनी उत्तर प्रदेशातील ‘योगी मॉडेल’ कर्नाटकात राबविण्याचा इशारा दिला. ‘योगी मॉडेल’ म्हणजे काय तर दंगली घडविणाऱ्या किंवा त्यात सहभाग असणाऱ्या विशिष्ट समाजातील कार्यकर्त्यांची घरे बुलडोझर लावून तोडली जातात. इस्त्रायलमध्ये पॅलेस्टाईनांच्या विरोधात याच तंत्राचा वापर तेथील लष्कराने केला होता. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात एका विशिष्ट समाजाच्या विरोधात हे तंत्र वापरले. त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणास साहजिकच मदत झाली. विधानसभा निवडणुकीत योगींच्या प्रचारसभांमध्ये मुद्दामहून बुलझोझर उभा ठेवलेला असे. तसेच दंगलखोरांचा ‘विकास दुबे’ करू, असे इशारे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिले जाऊ लागले. दुबे या गुन्हेगाराचा उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट चकमकीत खातमा केला होता. मात्रउत्तर प्रदेशातील ‘योगी मॉडेल’ हे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात वापरले जाते हे लपून राहिलेले नाही. ‘योगी मॉडेल’चा वापर करण्याचा विचार मुख्यमंत्री बोम्मई बोलून दाखवत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही बांधकामे तोडताना नोटीस देणे व अन्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, असे योगी सरकारला बजावले आहे. ‘विकास कामांवर निवडणुका जिंकतो’, असा दावा भाजपचे धुरिण करीत असले तरी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाशिवाय भाजपचे गाडे पुढे सरकत नाही हेच यातून स्पष्ट होते.
अन्वयार्थ : बुलडोझरचा आदर्श ?
आठवडाभरातच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण नेत्तारू तर त्यानंतर दोन दिवसांत मोहमंद फझील या युवकाची हत्या झाली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-08-2022 at 05:24 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murders in karnataka take communal turn political murder in karnataka religious polarization in karnataka zws