समंजसपणा हा मानवी स्वभावाचा मूलभूत गुणधर्म. सारासार विचार करण्याची क्षमता हे त्या स्वभावाचे वैशिष्टय़ आणि त्यातून होणारी अभिजात कृती हे त्याचे व्यक्तिमत्त्व. या तिन्ही गुणांचा समुच्चय असणारे अनेक धुरीण भारतात समाजातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आले आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रांतात शेकडो वर्षांच्या संतपरंपरेतून सामान्यातल्या सामान्यांपर्यंत जो विचार पोहोचवला गेला, तो सहिष्णुतेचा. त्यामागील सर्वंकष विचार करण्याच्या प्रेरणा या प्रांतातील माणसांचे आयुष्य वैचारिक आणि भावनिक पातळीवरही अभिजाततेच्या पातळीवर नेण्यास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे रूढी-परंपरा यांमागील समंजसपणाची चौकट समजून घेऊन त्यांना सामोरे जाण्याची वृत्ती या प्रांती उपजली. त्र्यंबकमध्ये जे झाले, त्याने ही वृत्तीच नाकारली जात नाही ना, असा विचार सुज्ञांनी तरी करायलाच हवा. एखाद्या धार्मिक विचाराची आपण जोपासना करतो, तेव्हा अन्य धर्मातील अनेक चांगल्या गोष्टीही आपल्याला खुणावत असतातच. त्यामुळे त्याच भक्तिभावाने आणि श्रद्धेने विशिष्ट धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश मिळत आला. अशा कितीतरी प्रार्थनास्थळांमध्ये मनोभावे जाणारे अनेक अन्य धर्मीय असतात. अशा कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मनी भक्तीचा भाव दाटायला हवा. तो परिपूर्ण असेल, तर त्याला धर्माची, जातीची बंधने कशाला हवीत?
त्र्यंबकेश्वरातील मंदिरात दरवर्षी पायरीपर्यंत जाण्याची परंपरा पाळली जात असेल, तर त्याबद्दल कुणीही विरोध का करावा? कुणाला या मंदिरातील स्थापित शक्तीला नमन करण्याची इच्छा होणे, हे चांगले की वाईट? परधर्मीयांबद्दलची सहिष्णुता हा तर मानवी समाजाचा गुणधर्म असतो, असायला हवा. तसा तो असेल, तर कुणी कुठे जावे, कोणाला कुठे प्रवेश निषिद्ध असायला हवा, कोणाला कोठपर्यंत जाता यावे, यासारख्या यमनियमांमुळे हा भक्तिभाव आटण्याचीच शक्यता अधिक. दरवर्षी भक्तीचा मळा फुलवणाऱ्या पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांना श्रद्धेने अन्नदान करणाऱ्या, त्यांच्यासाठी जागोजागी पाणपोया उभारणाऱ्या अन्य धर्मीयांचे अष्टभाव दाटलेले चेहरे अनेक वेळा पाहण्यात येतात. अनेक धार्मिक उत्सवांत अन्य धर्मीयांचा सहभाग हा या भूमीतील संतपरंपरेचा परिपाक आहे. वात्सल्य, निव्र्याज प्रेम, आदर, करुणा, कणव या मानवाच्या मूलभूत संप्रेरणा असतात. त्यामध्ये रंग, रूप, जात कधी आड येत नाहीत. येतो तो मत्सर. तोही सत्ता, पद आणि संपत्तीतून निर्माण होतो. श्रीमंत, गरीब यांतील भेदभाव अधिक तीव्र होत जातो आणि त्यातून मानापमानाचे नाटय़ उभे राहते. हीनत्वाची भावना माणसाच्या मनात निर्माण होते, ती या अवगुणांमुळे. मात्र, संपन्नतेची अभिजातता विचारांच्या मोकळेपणातूनच येते. सतत कुणा ना कुणाला पाण्यात पाहून, मिळणारा आनंद आसुरी असतो. कैवल्याच्या आनंदाचे जे गुणगान संतांनी केले, त्याची पूजा बांधल्यामुळेच संतपरंपरेत सर्व जातींना स्थान मिळाले. अन्य धर्मीयांनाही सामावून घेण्याची क्षमता या परंपरेतून आलेल्या विचारधनातूच प्राप्त झाली. समाज म्हणून एकत्र राहताना, कुणी एकमेकांवर धार्मिक कारणांसाठी कुरघोडी करण्याची आवश्यकता का निर्माण व्हावी? धार्मिक विद्वेषाने समाजाची एकतानता बिघडते, याचा अनुभव जगातील अनेक मानवी समूहांनी आजवर अनेकदा घेतला आहे. स्वातंत्र्य ही जर आजमितीस सर्वात महत्त्वाची आणि समाजाच्या एकरूपतेसाठीची संकल्पना असेल, तर त्यामध्ये एकमेकांचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही एकमेकांवरच असते, हे विसरता कामा नये. कुणाला दुखवून किंवा भावना भडकवून जे साध्य होते, ते अल्पकालीन असते, त्याने समूहाची शांतता भंग पावते आणि भविष्यावरच ओरखडे उमटवले जातात. निरपेक्ष बुद्धीने समाजाच्या फक्त भल्याचा विचार करणाऱ्या आणि त्यासाठी आपले सारे आयुष्य वेचणाऱ्या धुरीणांना गेल्या काही दशकांत समाजानेच वाळीत टाकले. अशी व्यक्ती आपले फक्त हितच चिंतेल, असा विश्वास निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आता ऱ्हास होताना का दिसतो, याबद्दल आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. प्रत्येकच कृतीमागे काही विष पेरणारे हितसंबंध असतात, अशा समजुतीतून बाहेर येण्यासाठी आपल्या वैचारिक परंपरांनाच शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही धर्मातील अशी कोणतीही कृती बुद्धीच्या कसोटीवर तासून पाहिल्याशिवाय त्याकडे विशिष्ट नजरेने पाहणे, हेच अधिक धोकादायक होत चालले आहे. एकोपा आणि सामंजस्य यामागे परम सहिष्णुतेचा पाया असतो. तो भुसभुशीत होणे हे समूहाच्या शांततेसाठी अधिक धोकादायक असते. हा सारासार विचार माणसाला संपन्न आणि अभिजात बनवतो. हेच खरे.