एल. के. कुलकर्णी
या भूतलावरची समजली जाणारी काही ठिकाणे व क्षेत्रे अशी आहेत, की ती फक्त कल्पनेतच अस्तित्वात आहेत. सोन्याचे गाव मानले जाणारे अमेरिका खंडातील ‘एल डोरॅडो’ हे शहर, गूढ असे ‘अॅटलांटिस’ हे बेट किंवा बर्म्युडा त्रिकोण ही तशी उदाहरणे. त्यापैकी बर्म्युडा त्रिकोण म्हणजे अटलांटिक महासागरातील एक काल्पनिक त्रिकोणी क्षेत्र असून त्यात विमाने नाहीशी होतात असा अजूनही बऱ्याच जणांचा समज आहे.

या प्रकाराची सुरुवात झाली ती १७ सप्टेंबर १९५० रोजी. त्या दिवशी विंकल जोन्स यांचा एक लेख अनेक अमेरिकन नियतकालिकांत आला. त्यात बर्म्युडा परिसरात विमाने व जहाजे नाहीशी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. बर्म्युडा हे अटलांटिक महासागरातील एक बेट आहे. संयुक्त संस्थानातील नॉर्थ कॅरोलिनाच्या पूर्वेस १४४० किलोमीटर अंतरावर असणारे हे बेट इथून पुढे एकदम प्रकाशझोतात आले. यानंतर दोन वर्षांनी ‘फेट’ नावाच्या मासिकात जॉर्ज एक्स सॅन्ड यांचा एक लहानसा लेख आला. त्यात प्रथमच अटलांटिक महासागरातील त्रिकोणी क्षेत्राचा उल्लेख करण्यात आला. बर्म्युडा हे या त्रिकोणाच्या उत्तर टोकावर असल्याने हे क्षेत्र बर्म्युडा त्रिकोण या नावाने ओळखले जाऊ लागले. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील मियामी आणि प्युर्टोरिको मधील सॅन जुआन हे या काल्पनिक त्रिकोणाचे दुसरे दोन बिंदू मानले जातात. दुसऱ्या महायुद्धापासून अनेक विमाने जहाजे नेमकी या भागात नाहीशी झाल्याचा दावा सॅन्ड यांनी या लेखात केला होता. त्यापैकी ‘फ्लाईट १९’ हे एक होते. या फ्लाईटमध्ये अमेरिकी नौदलाची पाच प्रशिक्षणार्थी टॉरपेडो बॉम्बर विमाने होती आणि ती सर्व नाहीशी झाली असे सॅन्ड यांचे म्हणणे होते. पुढे एप्रिल १९६२ मध्ये ‘अमेरिकन लिजन मॅगझीन’मधील एका लेखात अॅलन एकर्ट यांनी फ्लाईट १९ बद्दल अन्यही खळबळजनक दावे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार ही विमाने नाहीशी होण्यापूर्वी त्यांच्याकडून आलेला संदेश गूढ होता. पुढे फेब्रुवारी १९६४ मध्ये ‘अर्गोसी’ या नियतकालिकात व्हिन्सेंट गॅडीस यांचा ‘जीवघेणा बर्म्युडा त्रिकोण’ (डेडली बर्म्युडा ट्रँगल) हा लेख आला. त्यात असे म्हटले होते की बर्म्युडा परिसरात विमाने इ. नाहीशी होणे, असे चमत्कारिक प्रकार १८४० पासून सुरू आहेत. पुढे गॅडीस यांनी या विषयावर पुस्तकही लिहिले. यानंतर मग या विषयावर पुस्तकांची लाटच आली. त्यापैकी जे. डब्लू स्पेन्सर यांचे ‘लिंबो ऑफ द लॉस्ट’ (१९६९), चार्ल्स बर्लिझ यांचे ‘द बर्म्युडा ट्रँगल’ (१९७४)आणि रिचर्ड विनर यांचे ‘द डेव्हिल्स ट्रँगल’ (१९७४) ही विशेष नावे. यापैकी चार्ल्स बर्लिझ यांच्या पुस्तकाने बर्म्युडा त्रिकोणाला फार मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

बर्लिझ हे लोकप्रिय लेखक असून ते काही वर्षे अमेरिकी नौदलात गुप्तहेर खात्यात नोकरीला होते. त्यांची अपसामान्य घटना (अॅबनॉर्मल इव्हेंट्स) या विषयावर अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी ‘बर्म्युडा ट्रँगल’ हे सर्वाधिक गाजलेले. त्यांचे हे पुस्तक एवढे लोकप्रिय ठरले की जगातील ३० भाषांत त्याच्या दोन कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. या विषयावर मग अनेक पुस्तके बाजारात येऊ लागली. एवढेच नव्हे तर तथाकथित गूढ घटनांची संभाव्य स्पष्टीकरणेही पुढे आली. बर्म्युडा त्रिकोणात समुद्रतळाशी एक गूढ पिरॅमिड असावा, या घटनांमागे परग्रहावरील सजीव असावेत, अटलांटिस हे गूढ प्राचीन बेट तिथे असावे किंवा लघु कृष्णविवर असावे इ. अफवा पसरू लागल्या. त्यावरही पुस्तके निघाली, चित्रपट निघाले आणि टीव्हीवरचे कार्यक्रमही खूप गाजले. या सर्वांतून बर्म्युडा त्रिकोण हे मिथक तयार झाले. ते एक वास्तव आहे असे मानणारा सुशिक्षित वर्ग जगात निर्माण झाला.

हेही वाचा : अन्वयार्थ: शेतकऱ्यांना आता सोयाबीन रडवणार?

पण १९७० च्या दशकातच या रहस्यावरील पडदा दूर होण्यास सुरुवात झाली होती. लॅरी कुशे हे एक अमेरिकन लेखक होते. आधी ते वैमानिक इंजिनीअर होते. पुढे ग्रंथालय शास्त्राचे उच्च शिक्षण घेऊन ते १९६९ पासून हेडन येथे संशोधक ग्रंथपाल म्हणून काम करू लागले. त्याच काळात बर्म्युडा ट्रँगल या विषयावर पुस्तके प्रकाशित झाली. वाचक त्या पुस्तकांची आणि त्यांच्या खरेखोटेपणाची चौकशी करू लागले. त्यामुळे कुशे यांनी स्वत:च संशोधन सुरू केले. त्याचा परिपाक म्हणजेच १९७५ मधील ‘द बर्म्युडा ट्रँगल मिस्टरी सॉल्व्ह्ड’ हे त्यांचे पुस्तक. त्यांच्या संशोधनातून बर्म्युडा त्रिकोण हे वास्तव नसून केवळ भ्रामक समजूत किंवा मिथक असल्याचे त्यांना आढळले व तेच कुशे यांनी पुस्तकात मांडले. त्यांच्या अभ्यासानुसार, बर्लिझ व गॅडीस यांनी नोंदवलेल्या अनेक घटना या अतिशयोक्त, संशयास्पद, पडताळणी न करण्याजोग्या माहितीवर आधारित आहेत. त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, साक्षीदार व त्यांनी केलेली वर्णने यात विसंगती व चुका आहेत. उदाहरणार्थ, याटमधून जगप्रदक्षिणा करणारे डोनाल्ड क्रोहर्स्ट हे नाहीसे झाल्याचा बर्लिझ यांचा दावा निखालस खोटा होता. बेपत्ता झालेली अनेक जहाजे पुढे काही दिवसांतच सापडली होती, पण ते मात्र सांगण्यात आले नाही. बेपत्ता विमाने व जहाजांच्या अनेक घटना बर्म्युडा त्रिकोणाच्या क्षेत्राबाहेर घडलेल्या आहेत. दुसरे, अशा बेपत्ता होण्याच्या घटनेच्या वेळी तेथील वादळे वा बिघडलेले हवामान याचा उल्लेखच टाळण्यात आला. त्यामुळे अशा घटना वाचकांना खरेच गूढ वाटल्या. बर्म्युडा त्रिकोणात वाहने बेपत्ता होण्याचे प्रमाण जगातल्या तशा कोणत्याही क्षेत्रापेक्षा अधिक नाही. तथाकथित बर्म्युडा त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३९ लक्ष चौ. किलोमीटर, म्हणजे पूर्ण भारत देशाहून अधिक आहे. एवढ्या प्रचंड क्षेत्रफळात वाहने हरवण्याचे किंवा अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण जगात कुठेही जेवढे असते, त्याहून बर्म्युडा त्रिकोणात जास्त नाही. उलट या भागातील मोठी वाहतूक व चक्रीवादळांची वारंवारिता बघता, हे प्रमाण सामान्य आहे. काही घटना तर घडलेल्याच नाहीत. कुशे यांच्यानंतरही अनेक अभ्यासक व संस्थांनी बर्म्युडा त्रिकोण हे एक शुद्ध मिथक असल्याचे दाखवून दिले. १९९२ मध्ये ‘लॉइड्स ऑफ लंडन’ या सागरी विमा कंपनीला विचारण्यात आले होते की, बर्म्युडा त्रिकोण परिसरात जहाजे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे का? त्या कंपनीने ते स्पष्ट शब्दांत नाकारले. हा नकार फार महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या सागरी सीमा सुरक्षा दलाच्या (कोस्टल गार्ड) नोंदीतही असे काही आढळलेले नाही. उलट बेपत्ता होण्याच्या तथाकथित घटना त्या भागातील सागरी वाहतुकीच्या तुलनेत नगण्य असून बर्म्युडा त्रिकोणाशी संबंधित साहित्य व माहितीच्या आधारे लेखक मंडळींनी केलेले दावे संशयास्पद असल्याचे या दलाने अधिकृतरीत्या जाहीर केले. २०१३ मध्ये वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर या संस्थेने सागरी प्रवासासाठी धोकादायक अशा दहा क्षेत्रांची यादी प्रकाशित केली, त्यात बर्म्युडा त्रिकोणाचे नाव नाही. महत्त्वाचे म्हणजे, अनेकांना वाटते तसे बर्म्युडा त्रिकोण हे विमान व सागरी वाहतुकीसाठी वर्जित क्षेत्र नसून त्यातून दररोज हजारो जहाजे व विमाने जातात. अर्नेस्ट टेव्हेस, बॅरी स्टिव्हर्स सारखे अनेक जण विषयावर संशोधन करतात. त्यांच्या मते अशा विषयावरील साहित्य अधिक लोकप्रिय व फायदेशीर ठरत असल्याने त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. पण त्याची स्पष्टीकरणे प्रकाशित करण्यात मात्र मीडिया व प्रकाशकांना विशेष रस नसतो.

हेही वाचा : संविधानभान: संविधानाच्या तटबंदीचे संरक्षक

बर्म्युडा ट्रँगल हे पूर्णत: रचलेले मिथक किंवा दंतकथा असून, लोकांच्या गूढ व थरारकतेच्या आकर्षणावर आधारलेले, गैरसमजातून वा सदोष कारणमीमांसा देत लेखकांनी नकळत किंवा मुद्दाम विणलेले छद्मारहस्य आहे. पण तरी अनेक लोकांच्या मनावरील त्याचे गारुड अजून कायम आहे. त्याला कारण गूढता, रहस्य व अनाकलनीयतेचे मानवी मनाला असलेले आकर्षण. या जगात गूढ, रहस्यमय, असे काही तरी, कुठे तरी असावे, असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे अशा विषयावरील साहित्य, चित्रपट इ. मोठा प्रतिसाद मिळतो. त्याचा लाभ घेऊन अनेक लेखक तशा प्रकारची निर्मिती करून प्रसिद्धी व धन कमावून घेतात. अर्थात बर्म्युडा त्रिकोण हे भूतलावर कुठेही अस्तित्वात नसलेले पण फक्त पुस्तकात व काही लोकांच्या मनात असलेले एक काल्पनिक ठिकाण, अर्थात एक भौगोलिक मिथक आहे.

Story img Loader