पुरोगामी महाराष्ट्र वगैरे संकल्पना मोजक्यांनी गोंजारल्या. आज ज्ञानवादी काम करताना नव्या गोष्टी तयार कराव्या लागतील हे विसरून गेलेल्यांनीच भोवताल भरला आहे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आटपाटनगर होतं. त्यात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. अशी गोष्टीला सुरुवात होते. हूं… असा प्रतिसाद मिळू लागतो. मग गोष्ट रंगवणारा पुढं सांगू लागतो. गोष्ट रंगत जाते. पण सगळ्या आटपाटनगरातील गोष्टींमध्ये ब्राह्मणच कसे दरिद्री होते? गोष्टी रचणाऱ्यांच्या काळात दलित, आठरापगड जातीतील माणसे श्रीमंत होती, असा याचा अर्थ घ्यायचा का, की कथा सांगणारा ज्या जातीचा त्या जातीविषयीची कणव वाटावी म्हणून अशी रचना? असो!

कथा सांगणे ही खरेतर जगण्याची ऊर्मी. पण गोष्टीची साठा उत्तरांची कहाणी… पाचा उत्तरी सफळ संपूर्ण होत असताना त्यातील महिमावर्णन आणि प्रतिमासंवर्धन असे भेद कधी कोणी तपासले नाहीत. त्यातील जातवास्तव खरं की खोटं हे ताडून बघितलं नाही, कारण आपण गोष्टीच्या प्रेमात असतो. अगदी जातककथांमध्ये बोधिसत्त्व ब्राह्मणकुळात जन्मलेले आहेत. या गोष्टी आहेत खऱ्या नाहीत, रचलेलं आहे सारं, हे माहीत असलं तरीही ते मनाला उभारी देणारं आहे. हे हळूहळू माहीत होतं, पण तरीही गोष्ट विसरत नाही मन.

कर्नाटक सरकारने एक पुस्तक काढलं होतं ‘नलीकली’ असं त्याचं नाव. हसत खेळत श्रेणीतील. हे पुस्तक आहे गावोगावी गोष्टी सांगणाऱ्या आज्जीचं. आजीची माहिती किंवा ‘प्रोफाइल’ आणि तिची गोष्ट, असं संकलन जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प सुरू असतानाच्या काळातलं. तेव्हा म्हणजे दहा वर्षांपूर्वी कानडीतून गोष्टी सांगणाऱ्या आजीवरची एक ‘स्टोरी’ एका वृत्तवाहिनीने दाखवली. केळीच्या बागांचा भोवताल होता त्याला, दृश्यातून श्रीमंती दर्शविणारा! नेहमीप्रमाणे आजीच्या गोष्टीतला वाघ बोलत होता.

सिंह त्याच्या मुलाला डरकाळी कशी फोडायची हे शिकवत होता. हत्ती अंघोळ करून थकला होता. हे सारं खरं वाटण्याचा काळ आता संपला आहे. आता दीड वर्षाचं मुल गोष्ट बघतं. आजी लागत नाही गोष्टीसाठी. आता विक्रमाने त्याचा हट्ट सोडून दिला आहे. वेताळ त्याला पाठीवर घेऊन जात नाही. ‘माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर तुझं मुंडकं छाटीन’ असं वेताळही म्हणत नाही. आता अकबराचा दरबारही नाही आणि त्यात बिरबलही नाही. आताच्या दरबारातील बिरबल विदुषकी चाळे करताना दिसतो. गोष्ट सांगणारी रचना पूर्णत: बदलली आहे. येत्या काळात ‘एआय’ देखील हे काम करेल.

पण गोष्ट सांगणारा आणि त्यानं निर्माण केलेली पात्रं याचा संबंध मोठा विलक्षण असतो. माणूस समाजसंकेत मोडून किंवा स्वार्थ लपवून काही सांगू पाहत असतो तेव्हा तो आपले आत्मचरित्रात्मक मत एखाद्या पात्राच्या तोंडी टाकतो. म्हणून नाटकांमध्ये, गोष्टीमध्ये भेटणाऱ्या व्यक्तीचा पात्र म्हणून जन्म होतो. गोष्ट सांगण्याची हौस असणाऱ्या गावोगावच्या आत्या, काक्या, माम्या, मावश्या यांनी आपलं जगणं पुढं नेलं. त्यांचं जगणं, त्यांची कल्पनाशक्ती अभिव्यक्त करण्याची ती संधी होती, असंही म्हणता येईल. गोष्ट ही जेवढी सांगणाऱ्याची त्यापेक्षा ती ऐकणाऱ्याची अधिक. म्हणूनच गोष्टीला प्रतिसाद असतो. हूं… मग पुढे काय झालं, असा.

गोष्ट हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग. त्यामुळेच त्याची अनेक वर्षे आपण पूजा केली. सत्यनारायणाची पूजा खरेतर गोष्ट सांगण्याच्या प्रक्रियेचा मुख्य भाग. नवग्रहांची पूजा, जलपूजन असे काही विधी केले की, वाचली जाणारी पोथी हे गोष्टीचं पूजन आहे. अर्थात या गोष्टीच्या पूजनातून श्रद्धेचे नवे दुकान थाटणाऱ्यांची कमी नाही. नाही तर मुंबईसारख्या शहरात सरकारी कार्यालयांमध्ये घातल्या जाणाऱ्या सत्यनारायणांच्या पूजांचं काय करायचं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेच.

या गोष्टींमध्ये गरीब माणूस श्रीमंत होतो आणि श्रीमंत माणूस गरीब होतो. हे सारं फक्त ईश्वर किंवा फार तर परमेश्वरच घडवत असतो, अशा कल्पनांभोवती कथा रचलेली असते. त्यातील पात्र मिथक आहेत. माणूस शहाणा झाला की तो ही मिथकं बाजूला सारेल आणि वास्तव समोर आणेल असं गृहीतक गोष्ट रचनाऱ्याला माहीत असतं, पण सांगणाऱ्यांना माहीत असतंच असं नाही. ऐकणाऱ्यांना मिथक आणि वास्तव वेगवेगळं असतं हे कळूच नये अशी इच्छा असणारी आणि त्यासाठी प्रयत्न करणारी जमात सत्ताधाऱ्यांची असते. किंवा आपलंच म्हणणं पुढे रेटण्यासाठी आवश्यक असणारी पात्र रचना करणाऱ्या, बौद्धिकांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीही खास रचलेल्या असतात. धर्म संकल्पनेच्या विस्तारासाठी गोष्टींचा आधार घेतला जातो. बहुतांश पुराणकथा याच पद्धतीने रचलेल्या.

आजही अशा कहाण्या वाचल्या जातात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कोणतं व्रत करावं याच्या कहाणीची पुस्तकं महिला संक्रांतीच्या हळदीकुंकात लुटतात. एखादा नियम केल्याने ती देवता कशी जीवन सुलभ करते अशा चमत्कृतीयुक्त कथांनी भोवताल असा भारून ठेवला आहे की, त्यातील वास्तव तपासण्याचे कष्ट कोणी घेत नाही. वटसावित्री पौर्णिमेच्या कथेचा पगडा लक्षात घेतला की हे समजेल. मृत्यूच्या दाढेतून नवऱ्याची सुटका करणाऱ्या सत्यवान सावित्रीची वडाची पूजा ही त्याच्या गोष्टीत दडली आहे. आता विज्ञान- तंत्रज्ञान एवढं पुढं गेलं आहे तरीही वटसावित्रीची पौर्णिमा न करणारी बाई हुडकावीच लागते.

महाराष्ट्राबाहेरच्या म्हणजे अगदी केरळ, तमिळनाडूमध्ये किंवा अमेरिका आणि आफ्रिकेत सत्यवान किंवा सावित्री हे दोघेही नाहीत. पण पूजा न करताही त्या भागातील महिलांचे नवरे जिवंत राहतातच की. कदाचित एखादी सावित्री मनापासून जीवापाड प्रेम करत असेलही, पण गोष्टीतून व्रताचं पालन केलं नाही तर… ही भीती जास्त असते. आता शहरी भागात राहणाऱ्या, दिवसभर नोकरीत कोणत्याही आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या महिलांना सत्यवानाची कहाणी आता निरर्थक वाटू शकते. पण नवऱ्यासाठी ती व्रत करतेच. वटसावित्री असो की उत्तर भारतात ‘करवा चौथ’ हे व्रत- ते त्यांच्या कहाण्यांमध्ये आणि गोष्टींमध्ये दडलं आहे. धर्मपरंपराचे यमनियम निरसल श्रद्धेपोटी पाळले जातात, की भीतीपोटी हे तपासून घेणे गरजेचे नाही का? खरेतर गोष्टीतल्या पात्रांचा खरा चेहरा सांगण्याची गरज अधिक आहे. पण असं कोण करणार? उलटपक्षी बंधनं वाढत जावीत अशा नव्या गोष्टीही रचून सांगितल्या जातील. कारण गोष्ट रचणारी आणि रचून घेणारी जात सत्ताधारी असते. त्यामुळेच बहुतांश धार्मिक गोष्टी पुरुषसत्ताक असल्याचं दिसतं.

हूं… तर झालं असं की, असं म्हणत गोष्ट सांगणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये जेव्हा धर्म नसतो तोपर्यंत त्यातील मजा टिकून असते. त्यात भाषेच्या गमती- जमती. लयबद्धता, अलंकार, प्रतिमा, नुसतंच एखाद्या प्रसंगाचं लांबलचक वर्णन. जगण्याच्या सगळ्या पैलूंवर प्रकाश पडत राहतो. धर्मकथा नैतिक चौकटी आखत जातात किंवा तशा त्या आखल्या जाव्यात म्हणूनच त्याच्या कथा रचल्या जातात. या कथांमध्ये ‘व्हिलन’ मोठा असतो. म्हणजे जेवढा खलनायक शक्तिशाली तेवढा नायक उजळून निघतो.

जेव्हा खलनायक अदृश्य असतो तेव्हा गोष्टीतून निर्माण होणारी भीती वाढती राहते. करोनाकाळात अदृश्य भीतीचं सावट होतं. तेव्हा दारासमोर दक्षिण बाजूला दिव्याची ज्योत करून दिवे लावा, असा संदेश झपाट्याने फिरला. त्याचीही एक गोष्ट होती समाजमाध्यमी. अशा काळात सारासार विचार करण्याची क्षमता कमी झालेली असते. परिणामी भ्रामक कथांचा जन्म होतो. गोष्टीभोवती अंधश्रद्धेची पुटं चढतात. खरंतर गोष्टी सांगणाऱ्यांची एक परंपरा असणाऱ्या आपल्या देशातील गोष्टींमध्ये नवं विज्ञान येणं गरजेचं होतं. पण त्यातील रंजकता कमी होईल, म्हणून की काय किंवा पुरोगामी आळसापोटी नव्या तंत्रज्ञानासह जुन्या गोष्टी आपण पुढे रेटतो आहोत.

शाहू- फुले- आंबेडकरांचा, पुरोगामी महाराष्ट्र वगैरे या संकल्पना काही मोजक्यांनी गोंजारल्या. प्रत्यक्षात ज्ञान- विज्ञानवादी काम करताना नव्या गोष्टी तयार कराव्या लागतील, त्या सांगाव्या लागतील. हे विसरून गेलेल्या मंडळींनी भोवताल भरला आहे. गेले कित्येक दिवस लहान मुलांना सांगता येईल अशी एकही विज्ञानकथा पुढे आली नाही. देव दाम्पत्यांकडून होणारे अभिवाचनाने प्रयोग, ‘दास्तां गोई’सारखा अलीकडच्या काळात झालेला एखादा कथाप्रयोग वगळला तर या क्षेत्रात गावोगावी फक्त भागवत कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह.

गोष्ट नेणिवेत साठलेली असते. पुढे हे साठलेलं जाणिवेत येतं. व्यक्त होण्यासाठी धडपडतं तेव्हा गोष्टीला मूर्त रूप येतं. मूर्त रूपातील गोष्ट जेव्हा अमूर्त होत जाते तेव्हा कला जन्माला येते. त्यामुळेच गोष्ट जिवंत राहायला हवी. ती सांगणाऱ्यांना मोकळं अवकाश मिळावं, मग गोष्ट कोठेही असो कीर्तन, प्रवचन, गोंधळ प्रकारातील किंवा नाटक, चित्रपटातील. कारण गोष्ट टिकून राहिली तरच प्रतिसाद येईल. हूं… मग पुढं काय झालं? suhas.sardeshmukh@expressindia.com