१९४० च्या दशकात नामिबिया असा काही देशच नव्हता, आपण गुलाम आहोत याची जाणीवही पुरेशी नव्हती, त्या काळापासून प्रयत्न करून नामिबियाच्या- किंवा पूर्वीच्या ‘साउथ वेस्ट आफ्रिका’च्या स्वातंत्र्याची आकांक्षा सॅम नुजोमा यांनी चेतवली. १९९० मध्ये त्या देशाचे ते पहिले राष्ट्राध्यक्ष झाले आणि २००५ मध्ये ‘चौथ्यांदा पद नको’ म्हणून पायउतार झाले… दीर्घकाळ सत्तेवर असणाऱ्यांना हुकूमशहा ठरवणे सोपे असते; पण नामिबियात राज्यघटना-आधारित लोकशाही प्रस्थापित करण्यात नुजोमा यांचा पुढाकार होता. ९ फेब्रुवारीस वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले, शोकसंदेशांत ‘लोकशाहीवादी’असा नुजोमा यांचा उल्लेख आवर्जून होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास ताजा आहे आणि तो रक्तरंजितही आहे. आधी पोर्तुगीज, मग जर्मन आणि पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आलेला हा र्नैऋत्य आफ्रिकेतला प्रदेश ब्रिटिशांनी वर्णभेदकारक दक्षिण आफ्रिकन राजवटीच्या आधिपत्याखाली ठेवला होता. टोळीप्रमुखाच्या घराण्यातले असूनही दहा वर्षांचे होईपर्यंत गुरे वळणारे सॅम अखेर एका शाळेत गेले . काळ्या आफ्रिकींना सहावीपर्यंतच शिकता येई, तिथवरचे सारे शिक्षण घेऊन वाल्व्हिस बे इथे कामासाठी आले. देवमाशांची शिकार करण्यासाठी नॉर्वेजियनांनी उघडलेल्या या केंद्रात सॅम होते १७ वर्षांचे. त्यांना कुतूहल भारी… दुसऱ्या महायुद्धानिमित्ताने आलेले अनेक युरोपीय देशांचे सैनिक तेथे असत, ते कसे जगतात? त्यांचा देश कसा आहे? तिथे पगार किती? – वगैरे. पण या कुतूहलातून फुलली ती अन्यायाची जाणीव. मग सॅम नुजोमा रेल्वेत मजूर म्हणून लागले. इंग्रजी आलेच पाहिजे, म्हणून रात्रशाळेत शिकले आणि परिस्थितीच्या चटक्यांना वाचनाची जोड मिळाल्यामुळे कामगार-चळवळीचा अंगारही पेटू लागला. त्यातून उठली ती र्नैऋत्य आफ्रिकेतल्या ओव्हाम्बो प्रादेशिक संघटनेची ज्वाळा. या संघटनेचे रूपांतर १९५९ सालात ‘स्वापो’ (साउथ वेस्ट आफ्रिकन पीपल्स ऑर्गनायझेशन) मध्ये झाले आणि अत्यंत सनदशीर मार्गाने स्वातंत्र्यलढा सुरू झाला. ‘दक्षिण आफ्रिकेच्या प्रशासनाखालील र्नैऋत्य आफ्रिकेत युरोपीय १२ टक्के पण त्यांच्या शिक्षणासाठी वार्षिक तरतूद ७,८१,००० रॅण्डची (द. आफ्रिकेचे चलन), तर काळ्या र्नैऋत्य आफ्रिकनांसाठी मात्र अवघे १,९०,००० रॅण्ड’ असे मुद्दे ते मांडत होते. १९६० मध्ये सॅम नुजोमा यांनी थेट न्यू यॉर्क गाठले. संयुक्त राष्ट्रांकडे हा अन्याय आकडेवारीनिशी मांडण्याखेरीज वर्णभेद, शासक देशापासून अंतर आदी मुद्दे त्यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या उपसमितीपुढे मांडल्यावर, आमसभेने मागणीवजा ठराव केला – ‘१९६३ पर्यंत नामिबियास स्वातंत्र्य द्यावे’!

या मागणीला अजिबात धूप न घालणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सशस्त्र, रक्तरंजित संघर्ष (नुजोमांच्याच शब्दांत, ‘सुरुवातीला दोन बंदुका आणि दोनच पिस्तुलांनिशी’) सुरू झाला, तेव्हा नुजोमांनी पडद्याआडून सूत्रे हलवली. या संघर्षाला अतिरेकी वळण मिळणे त्यांनी टाळले; त्यामुळेच पुढे १९९० नंतर लोकशाहीची स्थापना होऊ शकली. समलैंगिकांच्या विरोधातली टोकाची मते वगळता, सॅम नुजोमा हे अखेरपर्यंत समतोल, विचारी नेते होते. रशिया, चीन, उत्तर कोरिया, क्यूबा अशा डाव्या देशांकडून १९७० मध्ये शस्त्रे मिळवणाऱ्या नुजोमांनी पुढे अमेरिकेसह अनेक देशांशी संबंध जोडले होते.