प्रसंग एक – पुण्यात मांजर आडवी जाण्याच्या प्रकाराला प्रसिद्धी मिळाली म्हणून अस्वस्थ असलेले नाना प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयातील कक्षात डोळे मिटून बसलेले. तेवढय़ात त्यांचा सहायक चार धिप्पाड तरुणांना घेऊन आत येतो. ‘‘साहेब, हे आपले नवे ‘मार्जाररक्षक’. यापुढे तुम्ही जिथे जाल तिथे अंगरक्षकांच्या कडय़ानंतर हे चारही दिशांना घारीसारखी नजर ठेवून वावरतील. यातला एक अनोळखी मांजरीला लळा लावण्यात वाकबगार आहे. कोणत्याही रंग व प्रजातीचे मांजर असो याची तिच्याशी नजरानजर झाली की लगेच ती याच्याकडे धावत येते. त्यामुळे ती तुम्हाला आडवी जाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. हा दुसरा, कुत्र्यांचे आवाज काढण्यात एक्सपर्ट आहे. याने आवाज काढायला सुरुवात केली की मांजरी पळून जातात. केवळ मांजरीलाच ऐकू जाईल एवढय़ा हळू स्वरात हा आवाज काढतो, त्यामुळे गर्दीला ते कळणार पण नाही. हा तिसरा, याच्या पडक्या घरात खूप उंदीर होते. त्यांना फस्त करण्यासाठी याने आजवर अनेक मांजरी पाळल्या. त्यामुळे त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांची याला पूर्ण कल्पना आहे. ती कुठल्याही स्थितीत तुमच्यासमोर येणार नाही याची काळजी हा घेईल. हा चौथा, थोडा जास्त जाडा आहे. हे तिघे मांजर नियंत्रणात व्यस्त असतानाचा प्रसंग कॅमेऱ्यांनी टिपू नये यासाठी हा त्यांच्यासमोर उभा राहील. या चौघांचे गणवेशसुद्धा पट्टेदार मांजरीप्रमाणे शिवून घेतले आहे.’’ हे ऐकून नानांनी काही न बोलता केवळ अंगठा दाखवला. त्यानंतर ते खुर्चीवर रेलत तांबे-थोरातांच्या आडवे जाण्याचे काय करायचे या विचारात गढून गेले.

प्रसंग दुसरा – भाजपच्या प्रदेश कार्यालयातील एका अडगळीच्या कक्षात नव्यानेच स्थापन झालेल्या ‘मार्जरसेल’ची बैठक सुरू असते. सर्वाचे स्वागत झाल्यावर सेलचे संघटनमंत्री बोलू लागतात. ‘या सेलचे काम गुप्त पद्धतीने चालणार आहे. आपले प्रतिस्पर्धी नाना रोज कुठे, केव्हा व कोणत्या कार्यक्रमाला जाणार याची माहिती तुम्हाला वेळेत दिली जाईल. तुम्ही त्या ठिकाणी थोडे आधी पोहचून एकदोन मांजरी सोडून द्यायच्या. हे काम इतक्या बेमालूमपणे करायचे की कुणाच्या लक्षातही येऊ नये. आपला समाज इतका अंधश्रद्ध आहे की नानाला वारंवार मांजरी आडव्या जातात हे बघून तो त्यांच्यावर अपशकुनी असा ठप्पा मारेल व काँग्रेसचे काही खरे नाही अशी भावना त्याच्या मनात प्रबळ होईल. या आडवे जाण्याला प्रसिद्धी देण्याचे काम ‘आपला’ मीडिया करेल. ‘ऑपरेशन पप्पू क्रमांक दोन’ असे या मोहिमेचे सांकेतिक नाव असेल. मांजरींचा पुरवठा तुम्हाला नियमितपणे होईल. त्याची काळजी नको.’’ भाषण संपताच सारे जण ‘म्याव.. म्याव’ असा आवाज काढून त्याला अनुमोदन देतात.

प्रसंग तिसरा – अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या कार्यालयात राज्यप्रमुखासह मोजके कार्यकर्ते चिंतामग्न चेहरे करून बसलेले. त्यातल्या अनेकांनी मुद्दाम मांजरी सोबत आणलेल्या. मग प्रमुख बोलू लागतात. ‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मांजरीवरून शकुन-अपशकुनाचा जो काही खेळ चाललाय तो योग्य नाही. याचा आपण कडाडून निषेध करायला हवा.’ यावर जोरदार टाळय़ा वाजत असतानाच चार-पाच कुत्रे भुंकत आत शिरतात व मांजरीच्या मागे धावू लागतात. मग एकच पळापळ होते. कार्यकर्ते मांजरी सोडून बाहेर धूम ठोकतात. कुत्र्यांपासून बचाव व्हावा म्हणून खुर्चीवर उभे राहिलेल्या प्रमुखांना प्रश्न पडतो, ‘ही सभा उधळणारे कोण असतील?’