तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशनानंतर दोनच दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेतील चार नामांकितांची राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून निवड केली. धावपटू पी. टी. उषा, संगीतकार इळया राजा, पटकथाकार व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि सामाजिक कार्यकर्ते-आध्यात्मिक गुरू वीरेंद्र हेगडे हे चौघे अनुक्रमे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या दक्षिणेतील चार वेगवेगळय़ा राज्यांतील आहेत. मोदींनी या चौघांची निवड भाजपच्या दक्षिणेतील पक्षविस्तार नजरेसमोर ठेवून केल्याचे दिसते. हैदराबादमधील कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सत्तास्थापनेचा संकल्प करण्यात आला होता. भाजपचे पहिले लक्ष्य तेलंगणा असून गेली साडेआठ वर्षे सत्तेमध्ये असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीविरोधात (टीआरएस) आक्रमक मोहीम राबवली जाईल. कार्यकारिणीमध्ये तेलंगणासंदर्भात स्वतंत्र ठराव संमत करून २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकीत तेलंगणावर भाजपचा भगवा फडकावण्याचा निर्धार केला गेला. तेलंगणासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या सहा राज्यांमध्ये सत्ताबदल करण्याचे दीर्घकालीन नियोजनही केले गेले. भाजपची कार्यकारिणी सुरू होण्याआधी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना तेलंगणातील विधानसभा मतदारसंघांमध्ये पाठवण्यात आले होते. भाजप तसेच, ‘टीआरएस’चे प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतदारांची मते जाणून घेण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली होती. हा प्रयोग कदाचित अन्य राज्यांमध्येही केला जाऊ शकतो. ‘केसीआर’ यांची सत्तेवरून हकालपट्टी होणार असून त्यांची ‘उलटी गिनती’ सुरू झाली आहे, असा दावाही भाजपने केला आहे. त्याचे दृश्यस्वरूप म्हणून तेलंगणामध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर घडय़ाळ लावण्यात आले आहे! भाजपच्या दक्षिणायनचा भाग म्हणूनच दक्षिणेतील प्रसिद्ध, कर्तबगार आणि वादातीत व्यक्तींची निवड राष्ट्रपतीनियुक्त सदस्यपदी करण्यात आली, ही केवळ अटकळ नव्हे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी निवड भाजपने जशी अत्यंत चाणाक्षपणे केली तशीच या चौघांची केली आहे. प्रसिद्ध पटकथाकार विजयेंद्र प्रसाद यांनी ‘बाहुबली’ या प्रचंड यशस्वी तेलुगु सिनेमाची कथा लिहिली असून त्यांचे पुत्र एस. एस. राजमौली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. संस्कृती, परंपरा, शौर्य यांचे बेमालूम मिश्रण असणारा ‘बाहुबली’ हा चित्रपट भाजपच्या राजकीय लाभाची ‘राष्ट्रवादा’ची मात्राही देणारा होता. इळया राजांची निवड फक्त संगीतकार व तमिळ म्हणून झालेली नाही, ते अनुसूचित जातीचे आहेत. तमिळनाडूमध्ये पक्षविस्तार करायचा असेल तर भाजपला तिथल्या बहुजन समाजाशी नाळ जुळवून घ्यावी लागणार आहे. केरळशी नाते जोडण्यासाठी पी. टी. उषा यांच्याइतके अन्य योग्य नाव भाजपसाठी नसेल! कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असली तरी, सामाजिक क्षेत्रात आदरणीय ठरलेली व्यक्ती राज्यसभेत असेल तर दक्षिणेतील व्यापक समाज भाजपशी जोडला जाऊ शकतो. भाजपसाठी वीरेंद्र हेगडे यांची निवडही राजकीय लाभाची ठरू शकेल. मोदी-शहांचा भाजप दीर्घकालीन योजनांची आखणी करतो, हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली म्हणून तेलंगणामध्ये भाजपची सत्ता येणार नाही. पण, मतदारसंघनिहाय व समाजघटकनिहाय आखणी केली तर संथगतीने का होईना पक्षविस्तार करता येऊ शकतो, असे भाजपला वाटते. त्या दृष्टीने या सदस्यांच्या निवडीकडे पाहता येऊ शकेल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा