ब्रती… बंगालमधल्या एका अत्यंत उच्चभ्रू, सुखवस्तू कुटुंबातला मुलगा. संवेदनशील, स्वप्नाळू आणि हट्टीही. विश्वनाथ आणि सुजाता हे त्याचे आई-वडील. १९७०चं दशक हे बंगालमधल्या नक्षलवादी चळवळीचं धुमसतं दशक. ब्रती त्यात ओढला जातो. व्यवस्था परिवर्तन अशा काहीशा ध्येयानं तो झपाटून जातो. तो आणि त्याचे मित्र यांच्या बैठका बाहेर सुरू होतात. ब्रतीच्या घरातल्यांना याची काहीच कल्पना नसते. ज्योती, निपा आणि तुली ही ब्रतीची भावंडं. मोठं श्रीमंत कुटुंब पण याचं मन त्यात रमत नाही. वडिलांविषयी तर त्याच्या मनात अढीच असते आणि वडिलांच्याही मनात त्याच्याबद्दल एक कायम अंतर असल्याची भावना. तो खुलतो त्याच्या आईजवळच. सगळ्या लेकरांपेक्षा तो वेगळा आहे याची आईलाही जाणीव आहे. आता त्याच्या मित्रमंडळींच्या सोबतच्या बाहेरच्या बैठकांना वेग आलेला असतो. प्रक्षुब्ध तरुणांचे वेगवेगळे गट सक्रिय असतात. त्यांच्या काय- काय योजना चाललेल्या असतात. त्यातल्याच विरोधी गटाकडून दगाबाजी होते आणि ब्रतीसह त्याचे काही मित्र मारले जातात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे घरचा फोन खणखणतो. आई सुजाता तो फोन घेते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रती चटर्जी तुमचा कोण?’ पलीकडून अत्यंत टणक असा आवाज.

‘मी आई आहे त्याची.’ असा इकडचा धास्तावलेला स्वर.

‘काटापुकुरला या… मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी.’ आवाजातली जरब आणि टणकपणा तोच.

हळूहळू घरातले सगळे सदस्य जमतात. वडिलांना या गोष्टीचा फारसा धक्का बसलेला नाही. उलट मला तिकडे यायला जमणार नाही असं त्यांचं उत्तर असतं. हे सगळे मारले गेलेले जे तरुण असतात त्यांचं शवागार काटापुकुरला. ब्रतीची आई तिथे पोहोचते पण तिची या ठिकाणची ओळख केवळ एक हजार चौऱ्याऐंशीव्या मृतदेहाची आई एवढीच. त्याच्याआधी १०८३ जण मारलेले असतात. तिथे गेल्यावर पाहण्यासारखं काही शिल्लकच उरलेलं नसतं. चेहऱ्यावरच्या जखमांनी जवळजवळ त्याची ओळख नष्ट केलेली असते. मारेकऱ्यांनी चेहरा अक्षरश: ठेचून काढलेला असतो. त्याचा मृतदेह घेऊन जाण्याची इच्छा असूनही आईकडे तो दिला जात नाही. तिकडेच अंत्यसंस्कार करून आल्यानंतर त्याला आठवताना आईची जीवघेणी घालमेल सुरू होते.

मृत्यूच्या आधी तो ज्यांना भेटला, त्यांच्याशी संवाद साधून आपल्याच मुलाला पुन्हा नव्याने उमजून घेण्यासाठी चाललेली ही धडपड… ज्याला वाढवताना, जोजावताना इतके कष्ट घेतले तो नेमका कुठल्या बिंदूपासून आपल्याला अनोळखी, अपरिचित वाटू लागला याचा शोध ही आई घेत राहते. ज्याच्या घरी तो मारला गेला त्याच्या- सोमूच्या- आईला भेटून, जिच्यावर ब्रतीचं मनस्वी प्रेम होतं त्या नंदिनीला गाठून आपल्या मुलाच्या आयुष्याचे काही तुकडे ती गोळा करू लागते. फुटलेल्या काचांप्रमाणे त्या तुकड्यांना एकमेकांना जोडण्याचा तिचा प्रयत्न अत्यंत उत्कट वाटू लागतो.

बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांची ‘हजार चुराशीर मा’ ही तशी आकाराने अतिशय छोटी कादंबरी. त्यांच्याच ‘अरण्येर अधिकार’ वगैरे कादंबऱ्यांच्या मानाने तर खूपच लहान पण ही कादंबरी वाचकाला आरपार बदलून टाकते. सळसळत्या रक्ताचे तरुण व्यवस्थेशी लढताना भरकटतात, चुकतात. प्रसंगी चुटकीसरशी जीव गमावतात. एका अर्थाने ही अंधारात घेतलेली उडीच पण ती घेण्याची ऊर्मी येते कुठून? अशा घटनांचा समाजावर काय ओरखडा उमटतो, एवढंच काय त्या तरुणांच्या कुटुंबीयांनाही त्यांना समजून का घ्यावंसं वाटत नाही असे असंख्य प्रश्न ही कादंबरी वाचकांच्या मनात निर्माण करते.

ब्रतीचं घरदार तो गेल्यानंतर त्याच्या बहिणीच्या- तुलीच्या- लग्न जुळल्याच्या पार्टीत हरखून गेलं आहे. सगळ्यांचं हसणं, खिदळणं सुरू असतं. फक्त या सर्वांमध्ये रममाण होत नाही ती त्याची आई. ती वेगवेगळ्या रूपांत त्याला आठवत राहते. तो गेल्यानंतरचा घाव तिच्या मनावर खोलवर झालेलाच आहे पण या घावाच्या जखमा भरू लागतात तेव्हा अगदी कुटुंबातल्या सदस्यांशीही ती कणखरपणे वागायला लागते. संघर्षासाठी उभी राहू पाहते. ‘हजार चुराशीर मा’ ही काही कुठल्या चळवळीचं तत्त्वज्ञान सांगत नाही. ती फक्त स्वत:लाच अज्ञात वाटू लागणाऱ्या पोटच्या लेकराबद्दल तीळ तीळ तुटणाऱ्या आईची गोष्ट आहे.

ही कादंबरी बंगालीत पहिल्यांदा प्रसिद्ध झाली ती १९७४ या वर्षी. त्यानंतर या कादंबरीचे अनेक भाषांत अनुवाद झाले. गोविंद निहलानी यांचा सिनेमाही याच कादंबरीवर आहे आणि त्यात ब्रतीच्या आईची- सुजाताची- भूमिका जया बच्चन यांनी पडद्यावर फार अप्रतिम साकारली आहे. महाश्वेतादेवी यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी, भटके, जल- जंगल- जमीन यासाठी संघर्ष करणारे लोक दिसतात. ‘खूप दीर्घ काळापासून माझ्या अंत:करणात आदिवासी समाजाविषयीच्या दु:खाची एक ज्वाळा सतत धडधडत राहिली आहे. ती बहुधा माझ्या चितेसोबतच शांत होईल,’ असं त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं. अनेक कादंबऱ्या आणि कथा लिहिणाऱ्या महाश्वेतादेवींच्या लेखनात आदिवासी लोककथा, पुराणकथा वाचकांना आढळतात. त्या एवढ्या प्रमाणात येण्याचं कारणही त्यांनी असं सांगितलेलं आहे की अशा कथांमध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळ अगदी हातात हात घालून चालत असतात. महाश्वेतादेवी यांच्या साहित्याची माध्यमांतरंही खूप झाली. ‘रुदाली’ हा सिनेमाही त्यांच्याच कथेवरचा. या कथेचं नाट्यरूपांतरही झालं आहे. त्यांच्या कथा- कादंबऱ्यांचे नायक व्यवस्थेशी विद्रोह करतात. मणिपूरसारख्या घटना घडतात तेव्हा त्यांची ‘द्रौपदी’सारखी कथा आठवते. अक्षरांची ओळख नसलेली निर्धन, फाटकी माणसं जगण्याची लढाई लढता लढता धीरोदात्त नायक वाटू लागतात हे त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचं यश. बिरसा मुंडा यांच्यासारख्या नायकांचा सर्जनशील शोध तर त्यांनी घेतलाच, पण साध्या माणसांनाही त्यांनी नायकत्व मिळवून दिलं.

बऱ्याचदा होतं असं, की साहित्यकृतीच्या पानातले संदर्भ समाजात दिसू लागतात आणि समाजातल्याच काही घटनांचं प्रतिबिंब पुस्तकाच्या पानांत दिसू लागतं. आता आपल्याकडच्या गडचिरोली जिल्ह्यातली २५ वर्षांपूर्वीची एक घटना. मरकनार या गावचा चिन्ना मट्टामी हा आदिवासी तरुण एके दिवशी मासेमारीसाठी जंगलात जातो. त्याला नक्षलवादी ठरवून गोळी घातली जाते. तो आधी नक्षलवादी आणि नंतर नक्षलसमर्थक ठरवला जातो. निरपराध मुलाच्या मृत्यूनंतर त्याची आई जब्बेबाई हिचा पुढची अनेक वर्षे संघर्ष चाललेला असतो. माझा मुलगा नक्षलवादी नाही, गुन्हेगार नाही. त्याच्यावर नक्षलवादाचा शिक्का मारण्यात आला आहे, यासाठी एका आदिवासी बाईचा व्यवस्थेशी, त्यातल्या पोलीस- न्याय यंत्रणेशी जो लढा सुरू झाला तो पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. जब्बेबाई आपल्या मुलाच्या मृत्यूचा जाब विचारण्यासाठी झगडत राहिली. कदाचित उच्च न्यायालयाचे दार ठोठावलेली ती पहिली माडिया असावी. मुलावर असलेला नक्षलवादाचा डाग पुसण्यासाठी तिचा हा लढा एका निर्णायक टोकावर आला तेव्हा चिन्ना मट्टामीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी आणि जब्बेबाईला दोन लाख रुपये भरपाई असा आदेश त्या वेळी न्यायालयाने दिला होता.

अगदी तीन महिन्यांपूर्वीची घटना. परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या आईला निरोप गेला. सोमनाथला श्वसनाचा आजार होता, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं. पण माझा मुलगा गुन्हेगार नाही आणि त्याला कसलाही आजार नव्हता. माझ्या लेकराला वकील व्हायचं होतं. पोलिसांनीच माझ्या लेकराचे प्राण घेतलेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे यावर सोमनाथची आई ठाम राहिली. सरकारने दिलेली दहा लाखांची मदत तिने नाकारली. आपल्या आजूबाजूला अशा व्यक्तिरेखा दिसू लागतात तेव्हा महाश्वेतादेवींच्या कथा-कादंबऱ्यांमधलीच ही पात्रं आहेत, असं वाटू लागतं. ब्रतीच्या आईचा विद्रोह तिच्या कुटुंबातल्या सदस्यांपासून सुरू होतो. चिन्ना मट्टामी किंवा सोमनाथ यांच्या आया व्यवस्थेच्या विरोधात पाय रोवून उभ्या राहतात. व्यवस्थेच्या चिरेबंदी भिंतीवर मस्तक रक्तबंबाळ करून घेताना आपलं काय होईल, या अजस्रा ताकदीपुढे आपला जीव तो केवढा असे प्रश्नही त्यांच्या मनात येत नाहीत… आपल्या अंत:करणातला हा निखारा विझू नये, त्यावर राख बसू नये यासाठीची त्यांची शिकस्त हेच तर महाश्वेता देवींच्याही साहित्याचं सूत्र आहे.