असे म्हणतात की ज्ञानाचे फळ मिळो न मिळो, अज्ञानाची किंमत मात्र चुकवावीच लागते. भूगोलात तर हे फार खरे आहे. नाझींनी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो नॉर्मंडीच्या लढाईत..
४ जून १९४४. दुसऱ्या महायुद्धाचा काळ. इंग्लंडच्या सागरकिनाऱ्यावर दोस्त सैन्याच्या आक्रमणाची लगबग चालू होती. अचानक हवामान बदलले. पावसासह वादळी वारे वाहू लागले. मोहिमेचे सुप्रीम कमांडर विचारात पडले. उद्याची नॉर्मंडीवरील चढाई ही नाझी भस्मासुराच्या अंताचा आरंभ ठरावी अशी तयारी चालू होती. १ लक्ष ८५ हजार पायदळ, १ लक्ष ९५ हजार नौसैनिक, सोबत विमानातून उतरणारे ४० हजार सैनिक या लढाईत सहभागी होणार होते. त्यात ऐनवेळी वादळाचे अस्मानी संकट उभे राहिले. पण भौगोलिक स्थितीची योग्य हाताळणी करून दोस्त राष्ट्रे दुसऱ्या दिवशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणार होती.
तसे तर १९४१ पासून रशियाच्या स्टॅलिनचा आग्रह होता की दोस्त राष्ट्रांनी युरोपात हिटलरविरुद्ध आघाडी उघडावी. अखेर १९४३ मध्ये युरोपवर आक्रमण करण्याचे ठरले. तोपर्यंत फ्रान्ससह बहुतेक युरोप हिटलरच्या तावडीत होता. फ्रान्सच्या किनाऱ्यावर सैन्य उतरवून तेथील जर्मन सैन्याला मागे रेटीत न्यायचे अशी योजना होती. कधी ना कधी असे होणार हे हेरून जर्मनांनीही फ्रेंच किनाऱ्यावर संरक्षणाची भक्कम तयारी केली होती. सागरकिनारी पाणसुरुंग व सापळे यांचे जाळेच उभारण्यात आले होते. शिवाय जर्मन हेर व रडार यंत्रणा पहारा देत होत्या.
इंग्लिश खाडीच्या ‘नॉर्मंडी’ या फ्रेंच किनाऱ्यावर चढाई करण्याचे दोस्तांनी ठरवले होते. अमेरिकेचे मेजर जनरल डी. डी. आयसेनहॉवर हे त्या मोहिमेचे सुप्रीम कमांडर होते. मानवी इतिहासातील सर्वात मोठया अशा सागरी आक्रमणाच्या त्या मोहिमेचे सांकेतिक नाव होते ‘ऑपरेशन नेपच्यून’. इंग्लंड, अमेरिका व फ्रान्स यांच्याशिवाय १० मित्रराष्ट्रे यात सहभागी होती.
फ्रेंच किनाऱ्यावरच्या ब्रिटनी, कॉटेंटिन, कॅलिस व नॉर्मंडी या चार ठिकाणांचा विचार झाला. यापैकी कॅलिस हे फ्रेंच बंदर इंग्लंडच्या समोर केवळ ८२ कि.मी. अंतरावर आहे. अर्थातच तिथे हिटलरने प्रतिकाराची जय्यत तयारी केली होती. कॉटेंटिन व ब्रिटनी या ठिकाणांची भूरचना भूशिराची होती. त्यामुळे तेथे उतरणाऱ्या दोस्त सैन्याची कोंडी सहज होऊ शकली असती. म्हणून ही तिन्ही ठिकाणे वगळून नॉर्मंडी बीचची निवड करण्यात आली.
हल्ल्याचा दिवस आणि वेळ निश्चित करण्यासाठी तीन मुख्य अटी ठरवण्यात आल्या होत्या. त्या दिवशी पौर्णिमा असावी ही पहिली अट. हल्ल्यापूर्वी विमानातून बॉम्बवर्षांव करताना पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वैमानिकांना आपले लक्ष्य दिसले असते. तसेच समुद्रकिनाऱ्यावर जर्मनांनी पेरलेले पाणसुरुंग व सापळेही दिसले असते. शिवाय पौर्णिमेला उधाणाची भरती असल्याने सैनिकवाहक नौका किनाऱ्याच्या अधिक आत जाऊ शकणार होत्या. दुसरी अट ही होती की चढाईची वेळ भरती आणि ओहोटी यांच्या मधली असावी. अशा वेळी भरतीचे पाणी अर्धे आत गेल्यामुळे सापळे व सुरुंग उघडे पडले असते. तसेच अर्धी भरती असल्याने सैनिकांना पाण्यातून पायी पार करावयाचे अंतर अर्धेच उरले असते. तिसरी अट अशी होती, की हल्ल्याची वेळ सूर्योदयापूर्वी थोडी आधीची असावी. त्यामुळे सैनिक समुद्रातून बाहेर येईपर्यंत धूसर अंधाराचा फायदा मिळणार होता.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : राज्यपालांना ‘अपवादात्मक’ सल्ला
म्हणजे त्या दिवशी पौर्णिमा असावी आणि भरती-ओहोटीच्या मधली वेळ पहाटे असावी, असा विशेष मुहूर्त आयसेनहॉवरना हवा होता. अर्थात हे सर्व जुळणाऱ्या तारखा मोजक्याच होत्या. आयसेनहॉवर यांनी ५ जून १९४४ ही तारीख निश्चित केली. पण अशा ऐन निकराच्या वेळी हवामानाने आपली खेळी केली. वेगवान वारे, पाऊस आणि खवळलेला समुद्र यामुळे दुसऱ्या दिवशी फ्रेंच किनाऱ्यावर उतरणे अवघड दिसू लागले. तसेच कमी उंचीवरील ढगांमुळे विमानांना आपले लक्ष्य दिसणे कठीण होते. आयर्लंडच्या हवामान केंद्राने तर गेल्या कित्येक वर्षांत झालेले नाही, अशा वादळाचा इशारा दिला होता. १३ देशांचे लाखो सैनिक, हजारो नौका व विमाने गोपनीयरीत्या गोळा होऊन जय्यत तयारीत होते. ५ जूनचा मुहूर्त टळला तर पुढची योग्य तारीख दोन आठवडे दूर १८ ते २० जून होती. पण त्या वेळी पौर्णिमा नव्हती. शिवाय एवढी मोठी तयारी फार दिवस लपून राहणे शक्य नव्हते. जर्मनांना सुगावा लागलाच असता.
पण ४ जून रोजीच सायंकाळी ब्रिटिश हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन जेम्स स्टॅग यांच्या हवामान चमूने अद्ययावत माहितीवरून असे भाकीत केले की ६ जून रोजी काही काळ तरी नॉर्मंडी किनाऱ्यावर हवेची स्थिती सुधारेल. त्यामुळे ६ जून रोजी चढाई शक्य होती. आयसेनहॉवरनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून ही शास्त्राधारित जोखीम घ्यायचे ठरवले. तिकडे जर्मनांना मात्र वाटत होते की, दोस्तांचा हल्ला झालाच तर अमावास्येच्या अंधारात होईल आणि दोस्त सैनिक सुरुंग तसेच सापळयांना बळी पडतील. त्यामुळे ते बेसावध होते.
योजनेनुसार दोस्त सैन्याने ६ जून रोजी पहाटे नॉर्मंडी बीचवर चढाई केली. जर्मनांचा प्रतिकार झालाच आणि घनघोर लढाईही झाली. पण ती जिंकून दोस्त सैन्याने हिटलरच्या किनारी तटबंदीचा धुव्वा उडवला आणि पॅरिसच्या दिशेने मुसंडी मारली. पॅरिसही जिंकून ते जर्मनीच्या दिशेने सरकू लागले. अशा प्रकारे नॉर्मंडीची चढाई हे अंतिम विजयाचे पहिले पाऊल ठरले.
असे म्हणतात की ज्ञानाचे फळ मिळो की न मिळो, अज्ञानाची किंमत मात्र चुकवावीच लागते. हे भूगोलात फार खरे आहे. एक तर दोस्त अमावास्येच्या रात्री व तेही कॅलिस येथे हल्ला करतील या भ्रमात जर्मन होते. दुसरे, हवामानाच्या अद्ययावत माहितीचे महत्त्व त्यांनी ओळखले नाही. पॅरिसच्या हवामान केंद्राने वादळाचे भाकीत वर्तवले होते. तेवढयावर फ्रेंच किनाऱ्यावरील जर्मन सैनिकांत जणू सुट्टीचे बिनधास्त वातावरण होते. मात्र नूतनतम नकाशे आणि अधिक अभ्यासाच्या आधारे अचूक भाकीत मिळवून दोस्तांनी त्या वादळातली फट शोधून काढली. त्याआधारे त्यांनी विजय मिळवून दुसऱ्या महायुद्धाच्या अंताची सुरुवात केली आणि नाझींना अज्ञानाची किंमत चुकवावी लागली – आणि ती होती हिटलरचा संपूर्ण विनाश.
एक दंतकथा अशी की, हे आक्रमण सुरू झाले तेव्हा हिटलर बव्हेरियन आल्प्समधील आपल्या निवासामध्ये साखरझोपेत होता. त्याच्या आज्ञेशिवाय प्रतिकारासाठी सैन्य हलवता येत नव्हते. आणि त्याला झोपेतून उठवण्याची कुणाची हिंमत नव्हती. कॅलिस येथील भक्कम संरक्षण यंत्रणेमुळे चिटपाखरूही फ्रेंच भूमीवर पाय ठेवू शकणार नाही, असा विश्वास हिटलरला होता. पण अलेक्झांडरपासून नेपोलियनपर्यंत सर्वांना मिळालेला धडा तो विसरला होता. आयुष्यात व युद्धात भूरचना व हवामान या बलाढय शक्ती आहेत. त्यांचा हात सोडला की निरंकुश सत्ताधीशही पराभूत होतो हाच तो धडा!
भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक lkkulkarni.nanded @gmail.com