जयपूरजवळच्या दौस्यात एक कवी संमेलन सुरू असते. संपूर्ण उत्तर भारतातून सहभागी झालेले अनेक नामवंत कवी आपल्या रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवत असतात. उत्तररात्री व्यासपीठावर पेंगू लागलेल्या एका कवीचे नाव पुकारले जाते. खडबडून भानावर येत ते खिशातला कागद काढून संथ लयीत कविता वाचू लागतात. ‘दहा पँट, तीन मोठे व चार लहान शर्ट, दोन झबले, एक किलो तुरीची डाळ, दोन किलो साखर, रवा, चहापत्ती’. त्यांचा सूर कविता वाचण्यासारखाच असल्याने रसिक सवयीप्रमाणे टाळय़ा वाजवायला सुरुवात करतात. नंतर कवीच्या लक्षात येते की आपण बायकोने दिलेली वाणसामानाची यादीच वाचली. मग खजील होत ते माफी मागून त्याच सुराच्या पट्टीत दुसऱ्या कागदावरची कविता वाचायला सुरुवात करतात.. साखरझोपेत असलेल्या अशोक गहलोतांना हे स्वप्न पूर्ण होताच जाग आली. ते उठून बसत विचार करू लागले. स्वप्नातही दौसाच का दिसले असेल? त्या सचिनचा विचार आपल्या डोक्यातून काही केल्या जात नाही, याचे तर हे निदर्शक नसेल? सभागृहात चुकून जुना अर्थसंकल्प वाचला गेला. हा कटाचा भाग असेल का? त्या पायलटने नोकरशाहीला फूस लावली असेल का? असल्या नानाविध प्रश्नांनी गहलोत हैराण झाले. वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो, हे खरे; पण म्हणून काय त्या कवीसारखी आपली अवस्था व्हावी. छे! शक्यच नाही. गृहपाठ तर आपण बरोबर केला होता. तरीही सलग आठ मिनिटे लक्षात कसे आले नसेल? सभागृहात गेल्यावर त्या सचिनकडे बघून ठेवणीतले हसलो. तिथेच चूक झाली. तो दिसला की तळपायाची मस्तकात जाते. मन विचलित होते. नेमक्या याच मनोवस्थेचा फायदा नोकरशाहीने घेतला असावा. बघू, चौकशीत काय समोर येते ते. काहीही झाले तरी पद सोडायचे नाही. मागे त्या कृष्णांनीसुद्धा असेच भलतेच भाषण वाचले होते. तेही युनोत. थोडी खळखळ झाली, पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा आदर कायम राहिलाच की. आता त्याच बुद्धीचे तेज दाखवून द्यायचे. सोबतीला आपल्या नसानसांत भरलेला राजकीय बेरकीपणा आहेच. त्या विश्वगुरूने पण आपली फिरकी घेतली. आजकाल लोक चुकीचे आकडे वाचतात म्हणून. ते बुद्धीची तल्लखता वाढवण्यासाठी मशरूम खातात म्हणे! नेमके कोणते ते आपणही शोधायला हवे. यामुळे देशभर हसे झाले असले तरी आमदार आपल्यासोबत आहेतच. त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी आणखी थोडे ‘कष्ट’ करावे लागतील एवढेच. मात्र त्या सचिनला परत एकदा ‘हल्दीघाट’ दाखवायचाच. विचार करत ते शयनगृहाच्या बाहेर आले तर समोर डझनभर साहाय्यक प्रश्नार्थक चेहरा घेऊन उभे. त्यांच्या मनाचा अंदाज येताच गहलोत हसत उद्गारले. ‘चिंता मत करो, कुछ नही होगा. परवाच्या प्रसंगामुळे राज्य व देशभर चर्चा झाली ती माझ्या चुकीची. अंदाजपत्रकात काय आहे याकडे कुणाचे लक्षच गेले नाही. तसेही या वेळी काही सांगण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे आपली मूठ झाकलेली राहिली. हेच आपले यश समजा व कामाला लागा.’ एवढे बोलून ते स्वत:च्याच बेरकीपणाला दाद देत आन्हिकासाठी पुन्हा आत वळले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2023 रोजी प्रकाशित
उलटा चष्मा : दौस्यातील वाणसामानाचे काव्य..
संपूर्ण उत्तर भारतातून सहभागी झालेले अनेक नामवंत कवी आपल्या रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवत असतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-02-2023 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Near jaipur the meeting ashok gehlot structure of enthusiasts ysh