ऑलिम्पिकप्रमाणेच नीरज चोप्राने भालाफेक या प्रकारात परवा जागतिक सुवर्णपदकही जिंकले. ऑलिम्पिक, जागतिक, आशियाई आणि राष्ट्रकुल अशा स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या दुर्मिळातील दुर्मीळ खेळाडूंमध्ये त्याची गणना होईल. वास्तविक यांतील पहिली दोन सुवर्णपदके जिंकणे ही अतिशय खडतर बाब. भालाफेकीत तर ऑलिम्पिक आणि जागतिक सुवर्णपदक जिंकलेले नीरजव्यतिरिक्त आणखी दोनच अॅथलीट आहेत. याचे कौतुक तर आहेच. पण हे सगळे नीरजकडून अतिशय सहजपणे घडून आल्यासारखे वाटते आणि हे त्याचे वर्चस्व थक्क करणारेच ठरते. प्रकाश पडुकोण, विश्वनाथन आनंद, पी. व्ही. सिंधू यांच्याप्रमाणे एकापेक्षा अधिक अजिंक्यपदे महत्त्वाच्या स्पर्धामध्ये जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या छोटय़ाशा गटातही त्याचे स्थान आणि पान मानाचे राहील. हे मासले खेळाडू म्हणून त्याची उंची दर्शवणारे ठरतात. त्याविषयी कौतुक आहेच. पण जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पदकविजेत्यांच्या सत्कारसोहळय़ाच्या वेळी त्याने या स्पर्धेतील उपविजेता, पाकिस्तानच्या अर्शद नदीमला जवळ बोलावून घेतले. अर्शदकडे पाकिस्तानी ध्वज नव्हता, तेव्हा त्याला आपल्या तिरंग्यामध्ये कवटाळून नीरज त्याच्यासह छायाचित्रकारांना सामोरा गेला. ही कृती माणूस म्हणून त्याची उंची दर्शवते! अर्शद हा नीरजच्या प्रमुख प्रतिस्पध्र्यापैकी एक. एरवी भारत-पाकिस्तान ही चुरस अॅथलेटिक्सच्या मैदानावर दिसण्याची शक्यता एक टक्काच. तशातही सध्याच्या ‘पाकिस्तान्याला फायनलमध्ये हरवल्या’बद्दल जल्लोषसंदेश पेरल्या जाण्याच्या वातावरणात नीरजची ही कृती विशेष लक्षवेधक ठरते. त्याच्यासाठी अर्शद नदीम पाकिस्तानी नाही, आणि स्पर्धा संपल्यानंतर प्रतिस्पर्धीही नाही. तो आहे केवळ एक सह-क्रीडापटू, ज्याच्याविषयी आदर आणि मैत्री असण्यात काहीच गैर नाही ही नीरजची भावना.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
क्रीडामैदानाबाहेरही त्याच्या प्रांजळ आणि सहज स्पष्टवक्तेपणातून त्याची वैचारिक खोली स्पष्ट होते. त्याच्या विधानांमध्ये रोकडे ग्रामीण शहाणपण असते. महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लाठीहल्ल्याविषयी त्याने खेद व्यक्त केला होता. टोक्यो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत त्याचा भाला नदीमने ‘चोरल्या’च्या वृत्ताचा आणि त्यावरून समाजमाध्यमांत उडालेल्या वादळाचाही त्याने रोखठोक शब्दांत समाचार घेतला होता. एखाद्या मुद्दय़ावर भूमिका घ्यावी वा न घ्यावी हा पर्याय साहित्यिक, कलाकार, चित्रपटकार यांच्याप्रमाणेच क्रीडापटूंसमोरही खुला असतो. खरे तर या लोकशाही देशातील कोणत्याही जबाबदार नागरिकाचा तो घटनादत्त अधिकार आहे. पण हुजऱ्या-मुजऱ्यांच्या भाऊगर्दीत आणि कोलाहलात या अधिकाराचा एक तर विसर पडतो किंवा तो सोयिस्करपणे विसरला जातोही! तसा तो न विसरणाऱ्या मोजक्या क्रीडापटूंमध्येही नीरज चोप्राचे नाव अग्रणी आहे. तो आज जितक्या साधेपणाने पुरस्कर्त्यां बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांत जाऊन तेथील उच्चशिक्षित कर्मचारी-अधिकारी वर्गाशी बोलतो, तितक्याच निरलसपणे एखाद्या आडगावच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. वलयांकित क्रीडापटूंच्या बाबतीत असा संवाद आणि समाजाशी जोडलेले असणे हल्ली दुर्मीळ बनले आहे. नीरज चोप्रा बहुतेक वेळा परदेशात सराव करतो. पण आजही हरयाणवी धाटणीचे इंग्रजी बोलण्यात त्याला कमीपणा वाटत नाही. ही निर्विष मानसिकताच बहुधा मैदानावर त्याची ताकद ठरत असावी. गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक पातळीवर भारतीय क्रीडापटू चमकलेले दिसून आले. गतसप्ताहाच्या अखेरीस प्रज्ञानंद बुद्धिबळाच्या पटावर हुकूमत गाजवत होता आणि त्याने विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्याच वेळी जागतिक बॅडिमटन स्पर्धेत प्रणय एच. एस.ने कांस्यपदक जिंकताना जगातील अव्वल मानांकित बॅडिमटनपटूला अस्मान दाखवले. जागतिक अॅथलेटिक्समध्ये भालाफेकीत नीरजने सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी अंतिम फेरीत त्याच्यासह आणखी दोघे भारतीय खेळाडू होते ही बाब कमी नवलाईची नाही. भारताचा ४ बाय ४०० मीटर्स रिले चमू अंतिम फेरीपर्यंत धडकला, हेही कौतुकास्पदच. ही प्रगती सातत्यपूर्ण नाही आणि अजून बरीच मजल मारायची आहे. पण जागतिक म्हणवणाऱ्या जाणाऱ्या खेळांमध्ये भारतीय मोठय़ा संख्येने नसले, तरी अव्वल स्थानांवर दिसू चमकू लागले आहेत हे नाकारता येत नाही. हे सगळे पाहिल्यावर आपल्याकडील क्रिकेट विश्वचषकाविषयीच्या विद्यमान घडामोडी भलत्याच नीरस भासू लागतात. यंदाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील तिहेरी सुवर्णपदक विजेता नोआ लाइल्स याने अमेरिकी बास्केटबॉल लीगला (एनबीए) ‘जागतिक’ कशासाठी म्हटले जाते असे विचारत अमेरिकन असूनही लीगची खिल्ली उडवली होती. क्रिकेट हा खेळ खरोखरच किती जागतिक आहे आणि त्यातील यश किती देदीप्यमान वगैरे असू शकते, असा प्रश्न आपल्यालाही पडेल अशी नीरज, प्रज्ञानंद, प्रणय प्रभृतींची कामगिरी ठरू लागली आहे हे नक्की.