विद्यार्थी कसे व्हावे हे नीट कळले नाही, तर कितीही चांगले शिक्षक मिळाले तरीही काहीही उपयोग होत नाही.

डॉ. जयदेव पंचवाघ

Diagnostic accuracy of capsule endoscopy
‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे गंभीर आजाराचे अचूक निदान! ७३ वर्षीय वृद्धाचे वाचले प्राण;  जाणून घ्या अत्याधुनिक प्रक्रिया…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
2000-year-old underwater 'Indiana Jones' temple discovered
2,000-year-old temple:समुद्राखाली सापडलेले २००० वर्षे प्राचीन मंदिर कोणता इतिहास सांगते?
History of Ajrak
History of Ajrakh: इजिप्तपासून ते मोहेंजोदारोपर्यंत आधुनिक अजरकचा इतिहास आहे तरी किती जुना?
SSC Students News
SSC : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?
three savarkar brothers wife information
नाट्यरंग : ‘त्या तिघी’ हिमालयाच्या सावल्यांची खडतर आयुष्यं

गेल्या काही लेखांमध्ये मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियांमधल्या संस्मरणीय शोधाबाबत आपण चर्चा केली. त्याचबरोबर या शोधांच्या घटनांमध्ये अंतर्भूत असलेल्या व्यक्तिरेखासुद्धा बघितल्या. एखाद्या युगप्रवर्तक गोष्टीचा विचार मनामध्ये येणे, त्यावर आधारित काम करून शोध लावणे आणि हे ज्ञान रुजवून पुढे संक्रमित करणे ही एक प्रक्रिया असते. ही नेमकी कशी घडत जाते याचा विचार मला नेहमी उद्बोधक वाटत आलेला आहे.

अलीकडेच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने न्यूरोसर्जरीच्या संदर्भात गुरू आणि विद्यार्थी यांच्या नात्यासंबंधी काही विचार माझ्या मनात आले. न्यूरोसर्जरीतील शोध कसे लागले? या व्यक्तींना गुरूसारखे कोणी शिकवले? हे शिकवणारे गुरू होते? की आपल्या कामामध्ये उपयोग होण्यासाठी बरोबर काम करणाऱ्यांना चार गोष्टी समजल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होईल या भावनेने थोडे ज्ञान देणारे लोक? का आपल्या विद्यार्थ्यांने उत्कृष्ट काम केले तर कदाचित आपले महत्त्व कमी होईल या ईर्षेने दुसऱ्यांना अधिक ज्ञान देणारे सर्जन?

एखाद्या व्यक्तीने उत्कृष्ट काम केले तर त्याची असूया वाटून हे कामच कसे चुकीचे आहे आणि हे काम  करायला त्या व्यक्तीला परवानगी देऊ नये म्हणून आणखी चार मत्सरी लोकांना एकत्र करून त्या व्यक्तीचा नीतिमूल्यांवर, खासगी जीवनातील गोष्टींवर टीका करून त्याला नाउमेद करणारे डॉक्टर? (त्याचा संदर्भ पीटर जॅनेटाबद्दलच्या लेखांमध्ये आलेला आहे). या प्रत्येक प्रकारामध्ये बसणारे लोक इतिहासात दिसतात. न्यूरोसर्जरीच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे बघताना, वैद्यकीय ज्ञान व कौशल्य संक्रमित होण्याच्या प्रक्रियेचा विचार करताना तसेच माझ्या स्वत:च्या न्यूरोसर्जरी शिकण्याच्या आणि नंतर इतरांना शिकवण्याच्या प्रक्रियेकडे बघताना जे विचार आले ते मांडण्याचा आज प्रयत्न करत आहे. 

आपल्या अध्यात्मशास्त्रात ‘श्रीगुरू’ असे ज्यांना संबोधण्यात आले आहे, त्यांच्या बाबतीतील हे विचार नाहीत हे प्रथम नमूद करतो. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पंचेंद्रियांपुरते मर्यादित नसलेले ज्ञान प्राप्त झाल्यावर सुयोग्य विद्यार्थ्यांला तो ‘आपल्यासारखा होईपर्यंत’ इतर कुठलीही अपेक्षा न ठेवता मार्गदर्शन करतात ते श्रीगुरू, असे अध्यात्मशास्त्रात समजतात आणि मला वैयक्तिक स्तरावर ते पटते. पण ते सोडून इतर सगळे शिक्षक किंवा मास्तरच!

अगदी माझ्या विद्यार्थ्यांने मला ‘हॅपी गुरुपौर्णिमा’ असा आधुनिक संदेश पाठवला तरी मी स्वत:ला गुरू वगैरे म्हणून घ्यायला तयार नाही. ‘शिक्षक’ हा शब्द बरा. ‘मास्तर’ हा अजून चांगला. ही चर्चा क्षणभर दूर ठेवली, तरी न्यूरोसर्जरीसारख्या अवघड शल्यशास्त्रामध्ये फक्त ज्ञानच नव्हे, तर हस्तकौशल्य तसेच इतर सामाजिक कौशल्ये नेमकी कशी व केव्हा संक्रमित होतात याचा विचार उद्बोधक ठरेल. थोडक्यात शिकाऊ न्यूरोसर्जनचा तज्ज्ञ व निपुण न्यूरोसर्जन कधी, का आणि कसा होतो, या दृष्टिकोनातून अगदी हार्वे कुशिंग (न्यूरोसर्जरीचा जनक) पासून अगदी अलीकडच्या म्हणजे माझ्या पिढीपर्यंत पाहात गेलो आणि त्यात विशेष काम केलेल्या व्यक्ती अभ्यासल्या, तर एक गोष्ट अगदी ठळकपणे अधोरेखित होताना मला दिसते आणि ही गोष्ट आजच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची प्रकर्षांने गरज वाटते. ही गोष्ट म्हणजे, हे शास्त्र व कला शिकण्याच्या प्रक्रियेत उत्कृष्ट ‘विद्यार्थी’ असणे हे चांगला किंवा बरा शिक्षक मिळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. आणि म्हणून मला असे वाटले की, गुरुपौर्णिमेप्रमाणे एक ‘विद्यार्थी पौर्णिमा’सुद्धा असावी. एखाद्याला विद्यार्थी (विद्या-अर्थी) कसे व्हावे हे नीट कळले नाही तर कितीही चांगले शिक्षक त्याच्या सान्निध्यात आले, तरी त्याचा काहीही उपयोग नाही. विशिष्ट प्रकारचे ज्ञान किंवा कौशल्य शिकण्याची तीव्र इच्छा असणारा आणि त्यासाठी आत्यंतिक कष्ट करणारा विद्यार्थी असल्याशिवाय पुढच्या गोष्टी घडणे शक्य नसते. एखाद्या विद्येचा निष्ठावान, उत्कृष्ट शिष्य असणे हे चांगला शिक्षक मिळण्यापेक्षा कसे आणि का महत्त्वाचे असते हे विशद करण्यासाठी या न्यूरोसर्जरीतलीच तीन उदाहरणे समोर ठेवतो. हार्वे कुशिंग हा प्रसिद्ध सर्जन विल्यम हाल्स्टेडचा शिष्य. या जगप्रसिद्ध न्यूरोसर्जनविषयी मी या सदरात लिहिले आहे. त्याला न्यूरोसर्जरी या शास्त्राचा जनकच समजतात. हार्वे कुशिंग १८९५ ते १९०५ या काळात विल्यम हाल्स्टेड या जनरल सर्जनचा शिष्य होता. विल्यम हाल्स्टेड हासुद्धा प्रसिद्ध सर्जन. एका अर्थाने युगप्रवर्तक. त्या काळात कुशिंगला मेंदू व मज्जारज्जूची रचना, कार्य व आजार याविषयी आवड निर्माण झाली. मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची तळमळ आणि आंतरिक प्रेरणा त्याच्यात निर्माण झाली. हाल्स्टेडने त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकेल असे त्याला वाटत नव्हते. प्रत्यक्ष शिक्षकच त्याला ‘या भानगडीत पडू नकोस’ असे अप्रत्यक्षपणे सांगत होता, पण कुशिंगच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्याला प्रेरणा देणाऱ्या घटना घडत गेल्या. ‘विल्यम ऑस्लर’ या मेडिसिनच्या डॉक्टरने कुशिंगच्या कामाची दखल घेऊन त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. प्रत्यक्ष शिक्षक मार्गदर्शन करत नसला तरी मेंदू व मज्जारज्जूची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याच्या आणि त्यासाठी पाहिजे तेवढे कष्ट घेण्याच्या तळमळीमुळे त्याला विविध रूपांत ‘गुरू’ मिळत गेले. म्हणून भारतीय परंपरेत असे म्हणतात की ‘‘विद्यार्थी मनापासून तयार असेल तर गुरू-शक्ती अवतरते.’’ दुसरे उदाहरण डॉक्टर पीटर जॅनेटांचे. ट्रायजेमिनल न्यूराल्जियासारख्या आत्महत्या प्रेरक आजारावर १९६८ मध्ये शस्त्रक्रिया शोधून ती यशस्वी करणारा हा न्यूरोसर्जन. ही शस्त्रक्रिया करून तिचे महत्त्व रुजवेपर्यंत हे ज्ञान त्यांना कोणी दिले तर नाहीच, उलट आत्यंतिक विरोध केला. इतका की त्यांना ही शस्त्रक्रिया करूच देऊ नये इथपर्यंत काही न्यूरॉलॉजिस्ट व न्यूरोसर्जनची मजल गेली. स्वत:च्या डोक्यातून काहीही कल्पनाविलास करून ही शस्त्रक्रिया करू बघणारा लहरी सर्जन अशी त्यांची कुप्रसिद्धी करण्यापर्यंत मजल मारण्यात आली. तरीही, गरज पडली तर या निंदकांकडे दुर्लक्ष करून, जॅनेटांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या रुजवली. या निंदानालस्तीने त्यांना उलट सकारात्मक ऊर्जा दिली असे म्हणता येईल. या सर्व प्रकारांत शिक्षक निरुपयोगी ठरले, पण जॅनेटांच्या दृढ विश्वासामुळे आणि वेदना निवारणाच्या तळमळीने गुरू-शक्ती विविध रूपांत त्यांना शिकवत गेली असे मला वाटते.

एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात न भेटता तिच्या लिखाणातून आणि घडलेल्या घटनांच्या ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासातून मार्गदर्शन कसे मिळू शकते याचा मीसुद्धा अनुभव घेतलेला आहे. याचा संदर्भसुद्धा पीटर जॅनेटांच्या कार्याशी पोहोचतो.

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाची असह्य वेदना आणि हेमिफेशिअल स्पाझम यासाठी करण्यात येणाऱ्या एमव्हीडी (टश्ऊ) शस्त्रक्रियांना वाहून घेणारे भारतातील पहिले केंद्र २००५ सालाच्या आसपास पुण्यात सुरू करण्याचे आम्ही ठरवले. तेव्हापासूनच्या पहिल्या काही वर्षांत या शस्त्रक्रियेतील एखाद्या बारकाव्याविषयी मनात काही शंका आली तर डॉ. पीटर जॅनेटा यांच्या लिखाणातील नेमक्या त्या विषयावरचा पेपर माझ्या वाचनात यायचा आणि ती शंका दूर व्हायची. हे एक-दोनदा नव्हे तर पहिल्या पाचेक वर्षांमध्ये अक्षरश: वारंवार घडले आहे. त्यानंतर अशा अनेक शस्त्रक्रियांच्या अनुभवानंतर जॅनेटांच्या शस्त्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे असे मला वाटले. प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने मेंदूची ही अत्यंत खोलवरची शस्त्रक्रिया शोधून काढली त्यात बदल आणि सुधारणा करणे कितपत योग्य आहे असा विचार माझ्या मनात आला मात्र आणि त्याच दिवशी १९९९ मध्ये डॉ. जॅनेटांनी एका जर्नलमध्ये लिहिलेला आणि फार वाचला न गेलेला शोधनिबंध माझ्या वाचनात आला. ‘‘ न्यूरोसर्जरीतील तांत्रिक सुधारणा जसजशा होत जातील आणि या विषयावर अधिकाधिक संशोधन होत जाईल, तसतशी शस्त्रक्रियेची पद्धत चांगल्या दिशेने बदलेल आणि ती तशी बदलली पाहिजे,’’ असे खुद्द डॉ. जॅनेटा यांनी त्यात स्पष्टपणे नमूद केले होते.

रुग्णाच्या वेदना निवारणाच्या इच्छेने या विषयाच्या मुळाशी जाण्याच्या आमच्यातील तळमळीला कुठून तरी निश्चित उत्तर मिळत होते.  असे अनुभव इतर अनेक क्षेत्रांतील लोकांना आले असतील. तर मग विद्यार्थ्यांच्या या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये गुरूचे नेमके स्थान काय? माझे याविषयी असे मत आहे की, आतून एखादी गोष्ट शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर जे अदृश्य असे गुरुतत्त्व किंवा शक्ती आहे तीच त्या व्यक्तीच्या आजूबाजूला विविध रूपांनी ज्ञान मिळण्याची साधने तयार करत जाते. ही साधने कधी व्यक्तीच्या रूपाने समोर येतील तर कधी जुन्या लिखाणांच्या रूपाने. कधी कधी तर निंदकांच्या रूपानेसुद्धा!

याबाबतीत एकलव्याची गोष्ट अत्यंत बोधप्रद आहे. मला वाटते की एकलव्याने एक व्यक्ती म्हणून द्रोणाचार्याना अतिरिक्त महत्त्व देऊ न अंगठा देण्याची चूक केली. ते तर फक्त निमित्त होते. अर्जुनासाठी एकलव्याकडे अंगठा मागणारे ‘मास्तर’ होते. न्यूरोसर्जरी शिकण्यासाठी आतुर विद्यार्थ्यांमध्ये एकलव्य जागृत व्हावेत, हीच शुभकामना.