डॉ. जयदेव पंचवाघ
दर रविवारी मी पुण्यातल्या लॉ कॉलेजजवळच्या निसर्गरम्य टेकडीवर चालायला जातो. चालताना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं संगीत ऐकण्यासाठी आयपॉड कानात असतात. मागच्या रविवारी विलायत खान साहेबांचा सतारीवरचा यमन चालताना माझ्या कानात घुमत होता. विलंबित आणि मध्यलयीतील बंदिशी मी ऐकत होतो, तबल्याच्या तालावर पावलं टाकत चालत होतो. म्हणजे अशा रीतीनं चालायचं की समेवर उजवं पाऊल बरोबर जमिनीवर पडलं पाहिजे. हळूहळू तालातील मधले बोल आणि त्यातली अंतरंसुद्धा पावलांच्या हालचालीत सामावली गेली पाहिजेत. वादनातली लय या अशा प्रकारच्या चालण्यामुळे माझ्या शरीरात साहजिकच भिनली होती. विलंबित लयीत यमनचा एक-एक स्वर खाँ साहेब उलगडून दाखवत होते. निषाद, ऋषभ, गंधार आणि पंचम या तीन स्वरांची वेगवेगळी रूपं फक्त ऐकूच येत होती असं नव्हे तर डोळय़ासमोर दिसतसुद्धा होती.
निषाद आणि गंधार कधी आकाशात दिवाळीत सोडले जाणारे बाण काळोखात जसे अचानक प्रकाशमान होऊन नाहीसे होतात तसे लखलखत होते तर कधी अतिशय मंद पणतीप्रमाणे शांत प्रकाश दाखवत होते. कधी एकामागून एक निघणाऱ्या लोलकांसारखे आकाशपटावर प्रदीप्त होऊन हळूहळू विझत होते. मधूनच अतिशय डौलदार आणि संयमित ताना संथ खानदानी लयीत ये-जा करत होत्या.अत्यंत कुशल कारागिराने एखादा अप्रतिम अलंकार तयार करावा अशी ही रचना, त्या स्वरांमधून माझ्या डोळय़ांसमोर साकार होत होती. विलंबित आणि मध्य विलंबित लयीत माझी पावलं पडत असल्यामुळे माझा मेंदू आणि शरीर दोन्ही एकाच वेळी ही अनुभूती घेत होते. चालत असताना होणाऱ्या तालबद्ध म्हणजेच ‘एरोबिक’ व्यायामामुळे मेंदूमध्ये स्त्रवणारी ‘शांतता आणि उत्साहाच्या’ अनुभूतीची एकाच वेळी निर्मिती करणारी जी चेतासंप्रेरक रसायनं असतात त्यांचाही या अनुभवात सहभाग असेल.
या अनुभवाच्या अनुषंगानं सौंदर्यानुभूती आणि रसग्रहण करण्याची आपल्या सर्वामध्ये जी क्षमता असते आणि त्याविषयी चेताविज्ञानात जे संशोधन झालं आहे त्याबदल काही लिहावं असं मला वाटलं. याचं महत्त्वाचं कारण असं, की विविध कलांमधली सौंदर्यानुभूती घेण्याची जी मेंदूची क्षमता आहे तिच्यात आपल्या आयुष्यात अत्यंत उच्च दर्जाची सकारात्मकता निर्माण करण्याची शक्ती आहे. आपले विचार, भावना एवढंच नव्हे तर मेंदूची अंतर्गत रचना प्रभावित करण्याची तिची योग्यता सुद्धा आहे. आजच्या नकारात्मक भावना वारंवार निर्माण करणाऱ्या युगात ही क्षमता नीट ओळखून वृिद्धगत करणं महत्त्वाचं ठरेल.
कलांमधल्या सौंदर्याचा फक्त तर्कनिष्ठ नव्हे तर हृदयस्पर्शी अनुभव घेण्याच्या दिशेनं कधी कधी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. विशेषत: आजच्या कायम साशंक, सतत चिंताग्रस्त वातावरण असलेल्या जगात ही सौंदर्यदृष्टी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल असं याबाबतीतील संशोधन सांगतं. ‘न्यूरोसायन्स ऑफ एस्थेटिक्स’ अर्थात ‘सौंदर्यशास्त्राचं चेताविज्ञान’ या नावानं ओळखली जाणारी शाखा या विषयाचा गेली काही वर्ष अभ्यास करत आहे. चेताविज्ञानातील इतर शाखांप्रमाणे यातही ‘फंक्शनल एमआरआय’ या तपासणीचा अनन्यसाधारण उपयोग झालेला आहे.
कुठल्याही कलाविष्काराचे दोन महत्त्वाचे भाग असतात ते म्हणजे कलेचा आविष्कार किंवा सादरीकरण आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे त्या कलेचं रसग्रहण. हे रसग्रहण बौद्धिक आणि भावनिक दोन्ही पातळय़ांवर घडत असतं. पण कलेच्या दृष्टीनं अत्युत्कृष्ट रसग्रहण म्हणजे त्या कलाविष्काराशी एकरूपतेचा, तल्लीन अनुभव असंच म्हणावं लागेल. कलेच्या या अनुभवात कलाकार आणि तिचं रसग्रहण करणारा हे दोघेही त्या अनुभवात लय पावले पाहिजेत.अशा प्रकारचा अनुभव घेताना मेंदूतील नेमके कोणते भाग उद्दीपित होतात आणि कलेचं रसग्रहण करण्याचं कुठलं विशिष्ट केंद्र मेंदूत आहे का यावर गेल्या काही वर्षांत भरपूर संशोधन झालेलं आहे.
मेंदूच्या अगदी पुढच्या भागांमध्ये- ज्याला ‘प्रीफ्रंटल लोब’ असं म्हणतात- त्याचे दोन उपभाग असतात. पहिला ‘लॅटरल प्रीफ्रंटल लोब’ आणि दुसरा ‘मेडियल प्रीफ्रंटल लोब’. याला आपल्या सोयीसाठी आपण अनुक्रमे ‘एल’ आणि ‘एम’ असं संबोधू.यातला ‘एल’ हा भाग माणसाला विशिष्ट नियमांच्या चौकटीत विचार आणि कृती करण्याचे संदेश देत असतो. ‘एम’ हा भाग अधिक उत्स्फूर्त आणि सर्जनशील वर्तणुकीची निर्मिती करतो. संगीत ऐकण्याच्या प्रक्रियेत हे दोन्ही भाग उद्दीपित होतात. हे ‘एफ एमआरआय’ चाचण्यांवरून सिद्ध झालेलं आहे. एखादी व्यक्ती संगीत ऐकायला सुरुवात करते तेव्हा हे दोन्ही भाग उद्दीपित होतात; पण जसजशी ती व्यक्ती संगीतात अधिक समरूप होत जाते तसा त्यातला उत्स्फूर्त आणि आनंद निर्माण करणारा ‘एम’ हा भाग अधिकाधिक उद्दीपित होत जातो. ज्या संगीतामध्ये विशिष्ट नियमांची चौकट ओलांडून सर्जनशील विस्तार करण्याची क्षमता असते त्या संगीतांमध्ये ‘एम’ हा भाग अधिक तीव्रतेनं उद्दीपित होत जातो. हा भाग सौंदर्य आणि रसग्रहणाच्या प्रक्रिया मधला उच्च दर्जाचा आनंद निर्माण करणारा असा भाग आहे.
थोडक्यात ‘एल’ हा भाग कलाकाराला सांगत असतो ‘तू चौकटीत राहा, नियम मोडू नकोस’- ‘एम’ हा भाग म्हणतो, ‘नियम मोडून मुक्त सौंदर्यनिर्मिती कर!’- या दोन्ही प्रेरणांच्या समतोलातून कलेची निर्मिती होते आणि भान हरपून टाकण्याची क्षमता असलेला अनुभव उगम पावतो. हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतात रागांचे नियम तर असतात पण स्वयंस्फूर्त व सौंदर्ययुक्त मुक्तविस्तार करण्याची सुद्धा शक्यता असते हे आवर्जून लक्षात ठेवावं लागेल.
यातून साहजिकच निर्माण होणारा प्रश्न असा की, कलेच्या रसग्रहणात निर्माण होणारा निखळ आनंद देऊ शकणारा भाग हा माणसांमध्ये उत्तरोत्तर वृद्धिंगत करता येऊ शकतो का? माझ्या मते याचं उत्तर निश्चितच होकारात्मक आहे. या दृष्टिकोनातूनच कलेविषयी माहिती असणं – किंबहुना ती सुरुवातीच्या काळात जाणीवपूर्वक करून घेणं- हे महत्त्वाचं आहे. यासाठी ती व्यक्ती त्या कलेत निष्णात अशी कलाकार असण्याचं कारण नाही. त्यासाठी त्या कलेबद्दलचं कुतूहल अगदी लहानपणापासून निर्माण करणं गरजेचं आहे आणि कदाचित याच दृष्टिकोनातून कुठलीही कला शालेय जीवनात शिकवली गेली पाहिजे. दुर्दैवानं शाळेतच ‘याला चित्रकला येत नाही, त्याला संगीत कळत नाही’ अशा प्रकारची लेबलं मुलांच्या मनावर कायमची बिंबवली जातात. कलेच्या प्रक्रियेतील रसग्रहणाचा भाग हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्याशिवाय कुठलाही कलाविष्कार पूर्ण होऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. कलेच्या या अंगाचा प्रशिक्षण देण्याचा साधा प्रयत्नसुद्धा शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणक्रमात होत नसावा यासारखी दु:खदायक गोष्ट दुसरी नाही.
या विषयातल्या संशोधनाचा दुसरा आणि कदाचित अधिक महत्त्वाचा भाग आहे- आपल्या मेंदूच्या मध्यभागाजवळ लिम्बिक सिस्टीम नावाची एक केंद्रशृंखला असते. त्यात अमिग्डेला, हिप्पोकॅम्पस आणि इतर भाग मिळवून एक वर्तुळाकार रचना असते. भावना, स्मृती वगैरे गोष्टींचं पृथक्करण इथं घडतं आणि त्यावरून आपल्या शरीरातली ‘ऑटोनॉमिक’ चेतासंस्था नियंत्रित होते. विशेषत: अमिग्डेला हा भाग भोवतालच्या वातावरणातून, निसर्गातून आणि इतर व्यक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांचं पृथक्करण करत असल्यामुळे लिम्बिक सिस्टीमचा हा भाग कायम अतिसतर्कतेच्या अवस्थेत बुडालेला असतो. आजच्या युगात आपल्यावर विविध प्रकारच्या समाजमाध्यमांतून आणि सभोवतालून सतत येणाऱ्या उलट-सुलट माहिती अमिग्डेलाला जवळपास कायमस्वरूपीच अतिसतर्क करून ठेवते. त्याचा परिणाम प्रलंबित काळासाठी भावना आणि एकूणच विचारांची स्थिती अतिचिंताक्रांत (अँग्झायटी) राहण्यात होतो. मानसिकदृष्टय़ा ही एक नकारात्मक आणि विषारी स्थिती आहे. याचा अतिरेक झाल्यास कालांतराने भावनांचा ‘बर्नआऊट’ होण्यात त्याचं रूपांतर होतं.
आपल्या मूळ विषयाशी याचा संबंध असा की, संगीतासारख्या कलाविष्कारात खऱ्या अर्थानं एकरूप होऊन रसास्वाद घेणं जमलं तर त्या वेळापुरतं तरी अमिग्डेलाचं कार्य खूप कमी किंवा बंद होतं असं सिद्ध झालेलं आहे. आपल्याला सतत चिंताक्रांत स्थितीत ठेवणारा हा भाग काही वेळासाठी जवळपास बंद होतो. एखादं चित्र काढताना किंवा बघताना त्याच्याशी तादात्म्य पावलेल्या व्यक्तीतही अशाच प्रकारची घटना घडते.म्हणूनच मला नेहमी वाटतं की, एखाद्या कलेचा रसास्वाद घेऊन त्याच्याशी पूर्णत: तादात्म्य पावण्याची कला खूप लहानपणापासून शिकवायला हवी. एका झटक्यात शिकण्याइतकी ती सोपी नसली तरी प्रत्यक्ष केलेचं सादरीकरण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींपेक्षा कित्येक जास्त लोक हा भाग शिकू शकतील. एखादी कला उपजत येत असो वा नसो; ती जर डोळसपणे काही प्रमाणात शिकवली गेली आणि विशेषत: त्यातली सौंदर्यस्थळं दाखवली गेली तर तानसेन नाही तर कानसेन शेकडोंनी तयार होतील.
कलेच्या या श्रवण व ग्रहण शक्तीचा अत्यंत सकारात्मक परिणाम होत असल्याच्या या संशोधनाचा अर्थच, ‘यात अधिक प्रयत्न व्हायला हवेत’ असा आहे.
लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.
brainandspinesurgery60@gmail.com