‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’सारखे आजार केवळ शस्त्रक्रियेविषयीची भीती आणि गैरसमज यांच्यामुळे उपचारांविना ठेवण्यात काय अर्थ आहे?

डॉ. जयदेव पंचवाघ

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. त्यापैकी एका गैरसमजाबद्दल मला अनेकदा प्रश्न विचारला जातो आणि मणक्याची शस्त्रक्रिया करण्याआधी त्याचं निवारण अनेक वेळेला करावं लागतं म्हणून याविषयी काही लिहावं असं वाटलं.

वयाच्या साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले तरीही ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा त्यातला वारंवार दिसणारा आणि वेळीच उपचार केला तर बरा होणारा असा एक आजार. या आजारामुळे जी लक्षणं दिसतात त्यांना ‘न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन’ असं नाव आहे. यात कंबर दुखणं, थोडं अंतर चालून गेल्यावर मांडय़ा, पोटऱ्या भरून येणं, जड पडणं, बधिर होणं, पायात मुंग्या येणं, अशी लक्षणं सुरू झाल्यामुळे चालणं थांबवावं लागतं. काही वेळ थांबलं की परत पुढे चालता येतं. हे जे ‘त्रास न होता चालू शकता येईल’ असं अंतर असतं ते दिवसेंदिवस कमी होत जातं. शेवटी शेवटी नुसतं उभं राहिलं तरी कंबर, पोटऱ्या आणि पाय भरून येतात. विशेषत: स्त्रियांमध्ये या लक्षणांमुळे ‘ओटय़ापाशी उभं राहिलं तर कधी एकदा बसते’ अशी स्थिती सुरू होते. आजारावर योग्य वेळी निदान आणि उपचार झाला नाही तर पावलांतली शक्ती आणि लघवीवरचं नियंत्रण जाणं यांसारखे त्रास होऊ शकतात.

या आजाराची लक्षणं थोडी विचित्र असल्यामुळे याचं निदान अनेकदा लवकर होत नाही, कारण सुरुवातीच्या काळात काही अंतर बिलकूल त्रास न होता चालता येऊ शकतं आणि लक्षणं त्यानंतर सुरू होतात. त्यामुळे बहुतेक, ‘वाढत्या वयामुळेच’ पायातली शक्ती कमी झाली असेल असा चुकीचा निष्कर्ष काढला जाण्याची शक्यता असते. मग या आजाराच्या शस्त्रक्रियेसंबंधी निर्णय का व कसा घ्यावा हे विशद करण्यासाठी पुढील घटना दिली आहे.

‘‘डॉक्टर, मला हा जो कंबरेच्या मणक्याचा त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे.. पण कंबर, मांडय़ा व पोटऱ्यांतलं दुखणं मी अजूनही सहन करू शकतो म्हणून मी शस्त्रक्रियेचा विचार पक्का केलेला नाही’’ – श्री. गोसावी (प्रातिनिधिक, बदललेले आडनाव) मला सांगत होते. ते ७२ वर्षांचे गृहस्थ. पाच वर्षांपासून त्यांना कंबरदुखी व ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिसचा’ त्रास होता. त्याचबरोबर १५ वर्षांपासून मधुमेह आणि दहा वर्षांपासून रक्तदाबाचा आजार होता. कंबरेच्या त्रासाची सुरुवात कंबरदुखीपासून झाली. त्यानंतर, चालायला लागल्यावर काही अंतरानंतर दोन्ही कुले, मांडय़ा व पोटऱ्यांत गोळे येऊ लागले. पाऊण किलोमीटर चालल्यावर पाय अत्यंत जड पडून थांबावं लागायचं. थोडा वेळ थांबलं, की आणखी काही वेळ ते चालू शकायचे. पण जसजसे दिवस उलटले तसं हे अंतरसुद्धा कमी होत गेलं. चालल्यावर पाय जड पडून व मुंग्या येऊन थांबावं लागायचं आणि कंबर, नितंब, मांडय़ा, पोटऱ्या भरून यायच्या.. ते आता फक्त काही मीटर चालल्यावरच! 

गोसावींना अजून असं वाटत होतं की, निदान चालणं थांबलं की दुखणं जातं आहे.. त्यावर फार न चालणं हा उत्तम उपाय. त्यातच मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल अनेक उलटसुलट मत ऐकण्यात आलेली. त्यामुळे विचारांचा आणखी गोंधळ. गोसावींसारख्या अनेक व्यक्तींना मी न्यूरोस्पाइन क्लिनिकमध्ये बघतो. त्यांना ज्या गोष्टी कळणं आवश्यक आहे असं मला नेहमी वाटतं त्या या संभाषणात दडलेल्या आहेत :

‘‘आपण फक्त पाच ते सात मिनिटंच सलग चालू शकता. बरोबर?.. आणि दोन-तीन वर्षांपूर्वी चांगले एक तास चालण्याचा व्यायाम करत होता?’’

‘‘हो हे बरोबर आहे.’’

‘‘या कंबरेच्या त्रासामुळे तुम्ही तुमचं चालणं कमी केलं. चाललोच नाही तर कंबर दुखणारच नाही आणि पायात गोळे येणारच नाहीत हा तुमचा युक्तिवाद होता, पण यात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात.. खरं तर वय जसं वाढत जातं तसं उलट चालण्याचं महत्त्व वाढत जातं. नव्हे तर चालण्याच्या व्यायामाशिवाय इतर व्यायाम अशक्य होत जातो. जर तुम्ही चाललाच नाहीत तर तुमचा डायबेटिस वाढेल, सभा-समारंभांना जाणं बंद होईल- थोडक्यात आयुष्य उपभोगणंच बंद होईल. आणखी काही महिन्यांनंतर उभं राहणंसुद्धा कष्टप्रद होईल. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या कंबरेच्या मणक्याच्या तीन, चार आणि पाच नंबरच्या मणक्यातल्या शिरा दबलेल्या आहेत. तीन व चार नंबरचे मणके एकमेकांवर घसरलेले आहेत. शस्त्रक्रियेनं हा दाब काढून या मणक्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि जर तसं केलं तर तुमचं चालणं पूर्ववत होऊ शकतं. एक लक्षात ठेवा, की हा निर्णय घेताना फक्त कंबरदुखी आणि ‘चालल्यावर पाय जड पडणं’ या गोष्टी बऱ्या व्हाव्यात हा उद्देश नाही तर चालण्याची क्षमता वाढून रक्तदाब, डायबेटिस आटोक्यात राहावेत, मानसिक उत्साह आणि आयुष्य उपभोगण्याची क्षमता वाढावी हा महत्त्वाचा विचार आहे.

शस्त्रक्रिया कधी व कोणावर करावी हे ठरवणं हे एक शास्त्र आहे. ते शास्त्र प्रगत आणि उपयुक्त आहे. ‘शस्त्रक्रिया करू नका!’ असा तुमच्या आजाराचा व एमआरआय तपासणीचा व्यवस्थित अभ्यास न करता मिळालेला सल्ला हा जरी जनमानसाला संतोष देणाऱ्या सल्ल्यांपैकी असला तरी नेहमीच जनआरोग्याला योग्य असतो असं नाही. व्यायामाचं महत्त्व आणि त्याचा आजारात उपयोग कसा करावा याचा विचार न करण्याइतकं न्यूरोसर्जरीचं हे शास्त्र काही लेचंपेचं नाही. सरसकट सगळय़ांना ‘शस्त्रक्रिया करू नका’ असा सल्ला देणारे महामानवतावादी नाहीत आणि याउलट व्यवस्थित विचार व तपासणी न करताच शस्त्रक्रिया करणं हे चांगल्या सर्जनचं लक्षण नाही.

मणक्याच्या कुठल्या आजारावर कधी व कशा प्रकारची शस्त्रक्रिया करावी हे न्यूरोसर्जरीसारख्या अभ्यासक्रमांत तीन ते पाच वर्षांमध्ये शिकवलं जातं. हे मोठं शास्त्र आहे. ‘शस्त्रक्रिया करू नका’ असं ‘एमआरआय’सारख्या तपासण्यांकडे तुच्छतेने बघून सांगणारे, माणसाचं चालणं बंद झालं तर त्यांना परत मदत करायला येणार नसतात किंवा चालण्याचं अंतर कमी होऊन डायबेटिस वाढला तर तो स्वत:वर घेणार नसतात. त्यामुळे स्वत:ला काय योग्य याचा यथार्थ निर्णय शास्त्रीय माहितीच्या आधारावरच आणि स्वत:च घ्यावा, हे उत्तम.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रक्रियेत थोडेफार धोके असतात हे सांगायला कुठल्या विद्वानांची गरज नाही. किंबहुना कुठल्याही मानवी उपक्रमांमध्ये धोका हा कायमच असतो, पण या धोक्यांची तुलना, ‘शस्त्रक्रिया केली नाही तर काय होईल?’- या प्रश्नाच्या उत्तरांशी करणं गरजेचं असतं. मला नेहमी वाटतं की ‘डॉक्टर, शस्त्रक्रियेत काय धोके आहेत?’ याबरोबर ‘शस्त्रक्रिया न करण्यात काय धोके आहेत?’ हा प्रश्न नेहमी विचारला जावा. या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांच्या तुलनेत बऱ्याचदा खरा निर्णय दडलेला असतो.

मणक्याच्या आजारांविषयी शस्त्रक्रियेचा सल्ला देणाऱ्या आणि शस्त्रक्रियेशिवाय फक्त व्यायाम इत्यादी करण्यास सांगणाऱ्या दोघांनाही या प्रश्नांची उत्तरं माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती रुग्णांना त्यांना आस्थेनं देण्याची वृत्ती पाहिजे.’’

श्री. गोसावींना मी जे सांगितलं तेच अनेकदा रुग्णांना कळेल अशा भाषेत सांगावं लागतं म्हणून मी हा संवाद त्याच स्वरूपात सांगण्याचा घाट घातला. गोसावींची शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांचं दुखणं जाईल हा एक भाग होताच, पण त्यांचं जीवनमान एकूणच सुधारणं हा या शस्त्रक्रियेच्या निर्णयामागचा खरा हेतू होता. त्यांची शस्त्रक्रिया होऊन आज सव्वा वर्ष झालं. गेलं वर्षभर ते रोज किमान एक ते दीड तास चालत आहेत. त्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे आणि गुडघ्याभोवतीच्या स्नायूंची ताकद वाढल्यामुळे गुडघेदुखीसुद्धा कमी झाली आहे.

आजच्या वैद्यकीय प्रगतीच्या काळात आयुष्याची लांबी वाढत चालली आहे. निसर्गाने दिलेलं आयुष्य परावलंबी न होता स्वत:च्या पायांवर आणि उत्साहाने जगायचं असेल तर आजच्या काळात अशा प्रकारचे ‘बरे होणारे’ आजार केवळ भीती आणि गैरसमजापोटी उपचारांविना राहू नयेत असं मला वारंवार वाटतं आणि त्यांपैकी ‘लंबर कॅनॉल स्टेनोसिस’ हा एक महत्त्वाचा प्रतिनिधी आहे असं म्हणता येईल.

Story img Loader