भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. व्ही. नारायणन यांनी नुकताच पदभार स्वीकारला. अवकाश आयोग आणि ‘इस्रो’च्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबरोबरच अवकाश विभागाचे सचिव म्हणूनही ते काम पाहतील. गेली ४० वर्षे ते ‘इस्रो’मध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. अनेक अवकाश मोहिमांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
सामान्य कुटुंबातून आलेले डॉ. नारायणन ‘आयआयटी खरगपूर’चे विद्यार्थी आहेत. तेथे त्यांनी ‘क्रायोजेनिक इंजिनीअरिंग’ या विषयात एम. टेक. केले. त्यानंतर ‘एअरोस्पेस इंजिनीअरिंग’ विषयात पीएच.डी. केले. एम.टेक. मध्ये ते पहिल्या क्रमांकासह रौप्यपदकाचे मानकरी ठरले. ‘इस्रो’मध्ये रुजू होण्यापूर्वी नारायणन यांनी ‘टीआय डायमंड चेन लिमिटेड’, ‘मद्रास रबर फॅक्टरी’ आणि ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ या ठिकाणी काम केले.
डॉ. नारायणन १९८४ मध्ये ‘इस्रो’मध्ये रुजू झाले. त्यांच्यातील संशोधकाने नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘इस्रो’मधील चार दशकांच्या त्यांच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या क्षणांचे ते साक्षीदार ठरले. अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक ‘प्रॉपल्शन सिस्टीम’मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. डॉ. नारायणन यांनी ‘इस्रो’च्या ‘लिक्विड प्रॉपल्शन सिस्टीम्स सेंटर’चे (एलपीएससी) संचालक म्हणून काम पाहिले आहे. ‘गगनयान मोहिमे’साठी राष्ट्रीय स्तरावरील मानवी मूल्यांकन प्रमाणीकरण मंडळाचे (एचआरसीबी) अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
ज्या वेळी भारताला ‘जीएसएलव्ही- एमके २’ या प्रक्षेपक वाहनासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारले गेले, तेव्हा डॉ. नारायणन यांनी त्यासाठी इंजिनची यंत्रणा तयार केली. आवश्यक सॉफ्टवेअर तयार केले. चाचणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्येच नव्हे, तर ‘क्रायोजेनिक अपर स्टेज’ पूर्ण करण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा होता. त्यांच्या अथक प्रयत्नांनी हा टप्पा कार्यान्वित झाला. ‘सी-२५’ क्रायोजेनिक प्रकल्पाचे संचालक म्हणून केलेल्या कामामुळे ‘लाँच व्हेइकल-मार्क-३’ (एलव्हीएम-३) विकसित होऊ शकले. ‘एलव्हीएम-३’साठी मानवी मूल्यांकनामध्ये आणि क्रायोजेनिक टप्प्यांसह विविध यंत्रणा विकसित करण्यामध्ये त्यांचे योगदान होते. क्रायोजेनिक तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर झालेल्या जगातील सहा देशांमध्ये भारताचे आज नाव आहे. त्यात डॉ. नारायणन यांचा वाटा मोठा आहे.
चांद्रयान मोहिमेमध्येही डॉ. नारायणन यांनी योगदान दिले. द्रवीभूत टप्प्यासह क्रायोजेनिक टप्पा आणि प्रॉपल्शन यंत्रणा विकसित केल्यामुळे चंद्राच्या कक्षेत हळुवार उतरण्याची (सॉफ्ट लँडिंग) मोहीम यशस्वी झाली. याखेरीज ‘आदित्य एल-१’ मोहिमेमध्ये त्यांच्या योगदानामुळे सूर्याचाही अभ्यास शक्य झाला. सूर्याचा अशा प्रकारे अभ्यास करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेतील दुसरा आणि चौथा टप्पा विकसित करण्यात, प्रॉपल्शन सिस्टीमसह प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. याखेरीज ‘गगनयान मोहिमे’मध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘इस्रो’ने प्रॉपल्शन यंत्रणेमध्ये मोठी मजल मारली. ‘शुक्र मोहीम’ आणि ‘चांद्रयान ४’ आणि भारतीय अवकाश स्थानकाच्या मोहिमांतही प्रॉपल्शन यंत्रणांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले. ‘इस्रो’सह देशाची मान जगामध्ये उंचावण्यामध्ये ज्यांचे योगदान आहे, असे संशोधक ‘इस्रो’ला प्रमुखपदी लाभले आहेत. त्यामुळे येत्या काळात ‘इस्रो’ची यशस्वी वाटचाल अधिक वेगाने पुढे जाईल, हा विश्वास आहे.