‘न्यू यॉर्कर’ मासिकाचा शंभर वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात पहिला अंक निघाला. या आठवड्यात १७ ते २५ फेब्रुवारी असा पंधरा दिवसांचा जोडअंक हा ‘न्यू यॉर्कर’ने शताब्दी अंक काढला असून १७६ पानांचा हा विशेषांक दोन जॅकेट्ससह एका मुखपृष्ठाचा ऐवज देणारा आहे. याच साप्ताहिकात जिल लपोर या गेली दोन दशके अर्वाचीन अमेरिकी इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या पत्रकार लेखिकेने ‘न्यू यॉर्कर’च्या शैली-शताब्दीवर भरभरून संदर्भपट उभारलाय… तो उभारताना शंभर वर्षांपूर्वी संपादक हेरॉल्ड वॉलेस रॉस यांनी लिहिण्यासाठी घालून दिलेल्या नियमांना मोडत असल्याची तपशिलात नोंद करीत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेरॉल्ड रॉस यांनी आपल्या लेखक आणि उपसंपादकांना सक्त ताकीद दिली होती की, ‘लेखक ही सतत लेखनकामाठी करणाऱ्यांव्यतिरिक्तच्या जगासाठी कंटाळवाणी जमात असल्याने कुणीही लेखकांविषयी लिहू नका. जे लेखकांविषयी, तेच संपादकांबाबतही तंतोतंत खरे असल्याने त्याच्या नावाचाही उल्लेख कुठे येऊ देऊ नका.’ तर पुढचे काही तप चाललेल्या आणि त्यानुसार घडलेल्या या नियतकालिकाने फक्त अमेरिकेतील एका शहराशी संबंधित पत्रकारिता आणि साहित्यसेवा केली नाही; तर ‘सरधोपटता वजा करणाऱ्या’ लिखाणाची चव काय असते याची दीक्षा जगाला दिली. या दशकांगणिक विस्तारत जाणाऱ्या शब्दयुद्धाचा आलेख जिल लपोर यांनी प्रत्येक दशकावर छाप पाडणाऱ्या या साप्ताहिकाचे संचितमासले उपलब्ध करून देत मांडलाय. रॉस यांच्या नियमांना बगल देत फक्त न्यू यॉर्करमधील लेखकांना आणि त्यांच्या संपादकांच्या अ-कंटाळवाण्या कार्याचा सतत उल्लेख त्या करतात.
ताज्या अंकात विद्यामान (पाचवे) संपादक डेव्हिड रेम्निक यांनीदेखील ‘द टॉक ऑफ द टाऊन’ या साप्ताहिक स्तंभात आधीच्या हेरॉल्ड रॉस, विल्यम शॉन, रॉबर्ट गॉटलीब, टीना ब्राऊन आदींच्या संपादकीय कार्यकाळाची चर्चा केली आहे. २१ फेब्रुवारी १९२५ च्या २५ सेंट्सना उपलब्ध झालेल्या पहिल्या अंकाच्या प्रतीच विकल्या गेल्या नाहीत. रॉस आणि त्यांची पत्नी जेन ग्राण्ट यांच्या कल्पनेतून हे साप्ताहिक काढण्यात आले. तिरकस अंगाचा विनोद आणि शहराची माहिती पुरवणारे साप्ताहिक काढून ते लोकप्रिय करण्याचा त्यांचा इरादा पहिल्याच मासिकानंतर धुळीस मिळाला. पहिल्या काही वर्षांपासूनच पीटर अर्नो यांची मुखपृष्ठे आणि विनोदी, सामाजिक संशोधनयुक्त लेखन यांनी न्यू यॉर्करला वाचक मिळू लागला. १९२७ पासून ई. बी. व्हाइट यांचा संपादकीय विभागात समावेश झाला आणि पुढे त्यांच्या पत्नी बनलेल्या संपादिका कॅथरिन व्हाइट यांनी न्यू यॉर्करमध्ये नव्या लेखकांना, कवींना लिहिते केले. त्या नवख्या लेखकांची नावे होती व्लादिमीर नोबोकोव्ह, जॉन ओहारा, मॅरी मेकार्थी, जॉन चीवर, जॉन अपडाईक… आणखीही भरपूर नाणावलेल्या लेखकांनी यात कथा लिहिल्या. पुढली काही दशके हे लेखक पुस्तकांद्वारे जगभर गाजत होते आणि त्यासह न्यू यॉर्करमधील लेख/ कथा। कवितांनीदेखील लोकप्रिय ठरत होते.
न्यू यॉर्कर जन्मले त्याआधी अमेरिकेतील सर्वात जुने हार्पर्स (१८५०), लाइफ (१८८३), कॉस्मोपोलिटन (१८८६), व्होग (१८९२), द वाइड वर्ल्ड (१८९८), व्हॅनिटी फेअर (१९१३), एस्क्वायर (१९३३) ही समाजाची चावी पकडणारी मासिके होतीच. पण वाचकप्रिय अथवा खपाची मासिके म्हणून त्यांचा बोलबालाच नव्हता. ‘आर्गसी’ (१८९२), वीअर्ड टेल्स (१९२२) , पॉप्युलर मॅगझीन (१९०३), रँच रोमान्स मॅगझीन (१९२४), डिटेक्टिव्ह फिक्शन वीकली (१९२४) , डाईम डिटेक्टिव्ह मॅगझीन (१९३२), घोस्ट स्टोरीज मॅगझीन (१९२६), ब्लू बुक मॅगझीन (१९०५), बॅटल बर्ड मॅगझीन (१९३२), अस्टाऊंडिंग मॅगझीन ( १९३०- अनालॉग सायन्स फिक्शन अॅण्ड फॅक्ट्स), मूव्ही क्लासिक मॅगझीन (१९१५), मॉडर्न स्क्रीन मॅगझीन (१९३०), थ्रिलिंग डिटेक्टिव्ह मॅगझीन (१९३१), अॅडव्हेंचर मॅगझीन (१९१०), वेस्टर्न अॅडव्हेंचर मॅगझीन (१९३०), फिफ्टीन वेस्टर्न टेल्स (१९४२), ऑल अमेरिकन मॅगझीन (१९३७), स्पोर्ट्स नॉव्हेल्स मॅगझीन (१९३७), पीपल मॅगझीन (१९४०), द मास्क्ड डिटेक्टिव्ह (१९४०), द स्पायडर मॅगझीन (१९३३) या भरपूर खपाच्या, चटपटीत कथा-कादंबऱ्या आणि लेख असलेल्या मासिकांचा खप तुफान होता. इतर मासिक-नियतकालिकांमधील उत्तमोत्तम लेख संकलित करणाऱ्या ‘रीडर्स डायजेस्ट’चा जन्मही न्यू यॉर्करच्या तीन वर्षे आधीचा म्हणजे १९२२चा. (पाच-दहा वर्षांत रीडर्स डायजेस्ट इतके लोकप्रिय झाले की, मूळ लेख असलेल्या काही नियतकालिकांनी रीडर्स डायजेस्टवर खटला भरला.) तर इतक्या मोठ्या आणि दोन महायुद्धांदरम्यान हेर-युद्ध-चमत्कार-जादू-विज्ञान असल्या गोष्टींनी सर्वसामान्य वाचकांना धरून ठेवलेले असताना न्यू यॉर्करचा पैस त्यांच्या तुलनेत किती तो असणार? संपूर्ण युरोप युद्धाच्या खाईत लोटलेला असताना डिटेक्टिव्ह अथवा पल्प मासिकांचा बाजार जोमात सुरू होता. ही वर उल्लेख केलेली सर्व मासिके आज आंतरजालावर मोफत पाहता येतात. लेखन हा व्यवसाय १०० वर्षांपूर्वी किती भरभराटीला होता, याचा तपशील त्यातील जाहिरातींमधूनही मिळेल. एडगर अॅलन पो, एच. पी लव्हक्राफ्ट, एडगर राईस बरोज ते शेकडो लोकप्रिय लेखक तसेच टारझन ते मास्क ऑफ झोरोपर्यंत १०० वर्षे गाजत असलेले कित्येक नायक या लगदा-कागदी मासिकांच्या सुवर्ण युगातूनच गाजले.
वाचक समुदायावर या पल्पप्रधान मासिकांचे वर्चस्व तब्बल १९५० पर्यंत राहिले. तोवर विविध प्रकारे युद्ध पत्रकारिता, उत्तम विनोदी लेखन, कथा-कवितांचा न्यू यॉर्करने धडाका लावला होता. डेव्हिड रेम्निक यांनी त्यांच्या ताज्या लेखात तपशील दिला आहे की, एलिन मॅके (बर्लिन) या लेखिकेचा ‘व्हाय वी गो टू कॅबरे’ (नोव्हेंबर १९२५) हा लेख गाजला. त्यानंतर अंकाची पत वाढू लागली आणि हळूहळू न्यू यॉर्कर आकाराला येऊ लागला.
युद्धवार्ता, युरोपसह ब्रिटनमधील राजकीय हालहवाल, जॉन हर्सी या पत्रकाराचा ‘हिरोशिमा’ हा संपूर्ण अंकभराचा लेख आणि न्यू यॉर्करसह अमेरिकेतील इतर शहरांमधील चाललेल्या महत्त्वाच्या घडामोडी, सिनेमा, नाटक, कथा-कविता यांची विस्तृत दखल हा १९४०-५० च्या दशकातील न्यू यॉर्कर मासिकाचा जनमानसातील चेहरा. रेम्निक संपादक झाल्यानंतर पहिल्या तीन दशकांतील सर्वोत्तम लेखनाचे संकलन त्यांनी ग्रंथरूपात केले. त्यातील ‘फोर्टीज’, ‘फिफ्टीज’, ‘सिक्स्टीज’चे अंक हाताळल्यास कितीतरी मोठ्या नावांची यादी त्यात लेखक म्हणून सापडेल. या संकलनात ‘व्हाय डू पीपल रीड डिटेक्टिव्ह स्टोरीज’ हा एडमंड विल्सन यांचा लेख वाचून त्या काळातील वाचकांचा लसावि-मसावी काढता येतो. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यावर, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल्स’ कादंबरीवर लेख वाचायला मिळतात. शर्ली जॅक्सन यांच्या ‘लॉटरी’ या कधीच शिळी न झालेल्या कथेसह कार्लसन मॅक्क्युलर, नोबोकोव्ह, विल्यम मॅक्सवेल, आयर्विन शॉ यांची कथा वाचायला मिळते. पन्नासच्या दशकाच्या संचात कलाकार, कलेविषयीचे लेख यांचा न्यू यॉर्करमध्ये अंतर्भाव झालेला दिसतो. रोआल्ड डाल, मॅव्हिस गॅलण्ट, फिलिप रॉथ यांच्या कथांचा उदय झाल्याचेही लक्षात येते.
साठचे दशकच बंडखोरीचे. या दशकात अमेरिकी पत्रकारितेत प्लेबॉय, रोलिंग स्टोन, जंटलमन्स क्वार्टर्ली आदी नव्या मासिकांचीदेखील गर्दी झाली. न्यू यॉर्करच्या साठच्या दशकाच्या खंडात ‘यूथ इन रिव्होल्ट’ हा चार मोठ्या लेखांचा विभाग वाचायला मिळतो. कला-कलाकारांमध्ये क्रीडा आणि क्रीडापटूंच्या व्यक्तिवेधांचाही समावेश झालेला दिसतो. पैलतटावरच्या म्हणजेच अटलांटिक महासागराच्या पलीकडल्या जगताची खबरबात ठेवणारा विभाग पाहायला मिळतो. सिनेमा परीक्षणांचा दर्जा समीक्षणपदाला पोहोचलेला वाचताना लक्षात येते. नायजेरियाचे स्वातंत्र्य, पॅरिस शहरावरचे टिपण, व्हॅटिकन सिटीचा फेरफटका असा वैश्विक कुतूहलाचा भाग घाऊक शब्दांत मिळतो.
यानंतरच्या दशकांमध्ये न्यू यॉर्करची पत्रकारिता आणि त्यांनी साहित्याची महत्ता टिकवण्यातील सातत्य यांची तपासणी वेगळ्याच निकषांवर करायला हवी. कारण ‘एस्क्वायर’ मासिकातून गे तलिस, टॉम वूल्फ, नोरा एफ्रॉन आणि डझनभर लेखक ‘अमेरिकन न्यू जर्नलिझम’ची लाट आपल्या टोकदार लिखाणांतून पुढे आणत होते. रोलिंग स्टोन मासिकामध्ये एकटा हंटर थॉम्प्सन आपल्या राजकीय लेखांची धुळवड राष्ट्राध्यक्षांवर उडवत वाचकांच्या केंद्रस्थानी येत होता. ‘प्ले बॉय’ अर्ध-अनावृत ललनांचे आकर्षण ठेवत उत्तम लेखनासाठी अमाप पैसा ओतून कथाकार आणि वादग्रस्त मुलाखतींची माळ लावत बसला होता. या काळातही न्यू यॉर्कर आपल्या अनंत निकषांतून (फॅक्ट चेकिंग, स्टाइल चेकिंग आणि कथा रिपेरिंग) मजकूर घडवत होता. ‘आम्हाला द्यायचे ते चांगलेच देणार, तुम्हाला हवे ते घ्या’ हा खाक्या कायम ठेवून आठवडी साप्ताहिकाची घडी जुळवणे हे खायचे काम नसून ‘शब्दयुद्धाची कला’च म्हणावी लागेल.
१९९५ साली (टीना ब्राऊन या किंचित बदनाम संपादिकेच्या अखत्यारीत) सुझन ऑरलिन यांचा ‘ऑॅर्किड फीव्हर’ हा लेख प्रसिद्ध झाला. या फुलाच्या अमेरिकेतील दुर्मीळ जाती ज्ञात असणाऱ्या आणि त्यांची सरकारी उद्यानांतून चोरी करून खासगीरीत्या जतन करणाऱ्या व्यक्तीवरचा हा वेध पुढे ‘ऑर्किड थीफ’ या पुस्तकात विस्तारला. त्यावर अद्भुत चित्रपटदेखील आला. सुझन ऑरलिनचा व्यक्ती आणि वल्ली शोधण्याचा कार्यक्रम अद्याप सुरूच आहे. तोच प्रकार डेव्हिड ग्रान यांच्याकडून होत आहे. रेम्निक यांच्यापासून दीड डझन नावे अंकात आपल्या प्रदीर्घ लेखांसह झळकली की चाहत्यांकडून फक्त त्या नावांसाठीच मजकूर वाचला जातो. अनुवादित कथांपासून जगात काय घडत आहे, याचे भान (इकॉनॉमिस्ट वृत्त विश्लेषणातून देते; न्यू यॉर्कर सखोल तपशिलांतून) हे साप्ताहिक शंभर वर्षांपासून देत आहे, हेच अद्भुत. केवळ दशकांचेच नाही, तर न्यू यॉर्कर बुक्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, कार्टून बुक्स यांसह न्यू यॉर्करचे फक्त मांजरींवरील लेख-कथांचे एक संकलनही उपलब्ध आहे.
आता, शेवटाकडे येताना काही मुद्द्यांकडे बोट ठेवणे आवश्यक. न्यू यॉर्करचा जन्म झाला तेव्हा मराठीत किमान चाळीस-पन्नास मासिकांचा उत्सव जोमात होता. न्यू यॉर्कर २५ सेंट्सना मिळायचे तेव्हा मौज दिवाळी अंकाची किंमत (साल १९२३. संपादक अनंत हरी गद्रे) आठ आणे होती. अमेरिकी डॉलरचा दर भारतीय एक रुपयाच होता. (विनिमय दर जाऊन पडताळता येईल.) पुढे आपल्या मरहट्टी वातावरणात मासिक-साप्ताहिकांची संख्या नव्वदपूर्व काळात हजारच्या जवळपास गेली. मग वाचकच इतका करंटा निपजला की त्यांनी साप्ताहिक-मासिकांची आर्थिक श्वासकोंडी करीत आत्ताची परिस्थिती निर्माण केली. कारणे कितीही देता येऊ शकली, तरी ग्रंथालये, पुस्तकालये आणि मासिक-साप्ताहिकांचा दर्जा देशाच्या बौद्धिक समृद्धीची अवस्था दर्शवतो. तिकडे न्यू यॉर्करसह कितीतरी नियतकालिके उदाहरणार्थ सांगता येतात. इकडे आपण चार साप्ताहिक-मासिकांची नावे घेतानाही गारद होतो, ते काय दर्शवते?
pankaj.bhosale@expressindia.com