मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्या ‘वेदनादायक’ बैठकीनंतर बाहेर येताच स्वत:चा बचाव करण्यासाठी ‘लाडक्या मंत्र्यांच्या यादीत मीच’ असे विधान उत्स्फूर्तपणे सुचले म्हणून नितेश राणे भलतेच खुशीत होते. जे घडले त्याचा मागमूसही चेहऱ्यावर येऊ न देता थोडेफार बदल करत मूळ भूमिका मांडत राहणे हेच राजकारणातले महत्त्वाचे तत्त्व असे कुणीतरी कधी सांगितल्याचेही त्यांना आठवले. मग त्यांनी वडिलांना फोन केला व ‘आत’ जे काही घडले ते सविस्तर सांगितले. ‘घाबरू नको, आडवळणाने का होईना पण भूमिका मांडत राहा. परिवार सांभाळून घेईल’ हा त्यांचा सल्ला ऐकून ते निर्धास्त झाले.

तेवढ्यात त्यांना सीएमओमधून एका पीएचा फोन आला. ‘तुम्हाला कसे कळले आमच्याकडे लाडके कोण व दोडके कोण याची यादी आहे म्हणून?’ या प्रश्नावर ते दचकलेच. आता पुन्हा काही झापाझापी होणार का या विचारानेच त्यांना घाम फुटला. मग तो पीएच म्हणाला. ‘अहो, खरेच अशी यादी आहे आमच्याजवळ. दर आठवड्यातील प्रत्येक मंत्र्यांचे कामकाज बघून त्यांची क्रमवारी तेवढी बदलते.’ हे ऐकून राणेंच्या खुशीला पारावार उरला नाही. याच भरात त्यांनी गुरुवारच्या स्नेहभोजनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उकडलेले काय काय आवडते याची यादीच खानसाम्याला पाठवून दिली. प्रत्यक्ष भोजनप्रसंगी मुख्यमंत्री त्यांच्याशी फारच सौजन्याने वागले. सर्वांनी ते बघितले. येतात असे कटू प्रसंग आयुष्यात असे मनाला समजावत राणे आणखीच निर्धास्त झाले. नंतर काही दिवसांनी त्यांना छंदच जडला. वेळ मिळाला की हळूच सीएमओमध्ये जायचे व ‘ती’ यादी बघायची. फोन करणारा पीएसुद्धा त्यांना बाजूला नेऊन त्या यादीतले त्यांचे नाव तेवढे दाखवायचा. एकदा पूर्ण यादी दाखवण्याचा आग्रह राणेंनी धरला. पण पीएने सपशेल नकार दिला. प्रत्येकाचे मूल्यमापन गुप्त ठेवायचे, असे थेट मुख्यमंत्र्यांचेच आदेश आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे तेवढे बघा, इतरांच्या नावांचा आग्रह कशाला धरता, असा त्याचा युक्तिवाद होता. प्रत्येक वेळी तो पीए यादी असलेला कागद वर व खाली हाताने झाकून फक्त त्यांचे नाव दिसेल एवढेच दाखवायचा. लाडक्या मंत्र्यांची यादी हीच हे कशावरून समजू असा प्रश्न एकदा राणेंनी न राहवून विचारला तेव्हा थोडी दया दाखवत त्याने वर दिलेले ‘लाडके मंत्री’ असे शीर्षक त्यांना दाखवले. मग खात्रीच पटली की यादी खरी आहे. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राणेंच्या भूमिकेला आणखी धार चढली. एका भेटीत त्यांनी ‘लाडक्यांच्या’ क्रमवारीत मी नेमका कोणत्या क्रमांकावर हेही दाखवा असा आग्रह पीएजवळ धरला. खूप आढेवेढे घेतल्यावर त्याने नावासोबत क्रमांकही दाखवला. तो बघून अरेच्चा आपण तिसऱ्या क्रमांकावर, मग आधीचे दोन कोण असा प्रश्न त्यांना सतावू लागला. बोलणे आणि कृती यात आपल्या मागेपुढेसुद्धा एकही मंत्री नाही. मग हे वरचे दोन नेमके आहेत तरी कोण? त्यांच्यासमोर आपल्याला कसे जाता येईल? त्यांची नावे तरी कळायला हवीत या प्रश्नांनी ते हैराण झाले. दुसरीकडे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भूमिका मांडतानाच मीच मुख्यमंत्र्यांचा लाडका हे त्यांचे सांगणे सुरूच होते.

अखेर एक दिवस मुख्यमंत्र्यांचा गप्पांचा मूड आहे हे बघून पत्रकारांनी त्यांना या लाडक्यांच्या यादीबद्दल विचारलेच. त्यावर मोठ्याने हसत ते म्हणाले. ‘अशी यादी वगैरे करण्याच्या भानगडीत मी पडत नाही. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन माझ्या डोक्यात असते. सरकारात काम करताना लाडके वा दोडके असे काही नसतेच. शेवटी काम महत्त्वाचे’ हे ऐकताच राणे हादरले. त्यांनी त्या पीएला खूप फोन केले पण प्रतिसादच मिळाला नाही.

Story img Loader