नोबेल पारितोषिकाच्या आधीच्या आठवड्यात साहित्याचा पुरस्कार कुणाच्या नावे असेल, याची अटकळ बांधणारी वृत्तसंपदा वाचणे मनोरंजक असते. कारण त्या अटकळयादीतील एकालाही पुरस्कार मिळत नाही. तो एखाद्या चर्चेत नसलेल्या नावालाच मिळतो. आदल्या यादीतील इतर लेखक बदलत जातात पण जपानी लेखक हारुकी मुराकामी याचे नाव गळून पडत नाही, हे सर्वात विशेष. यंदा त्याच्यासह स्पॅनिश लेखक सीझर ऐरा, आस्ट्रेलियातील लेखक गेराल्ड मर्मेन, कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड आणि अज्ञात अवस्थेत गेली पाच दशके वावरणारा अमेरिकी लेखक थॉमस पिंचन यांनी नोबेल दावेदारी फक्त चर्चेत मिरवली. सान शोया (Can Xue) या चिनी लेखिका गेल्या दोन वर्षांपासून नोबेल पुरस्काराच्या स्पर्धेत परमोच्चस्थानी मानल्या जात आहेत. पैकी हारुकी मुराकामी, सीझर ऐरा, मार्गारेट अॅटवूड हे समकालात वाचले जाणारे लेखक. थॉमस पिंचन यांनी अलिप्ततेतून स्वत:भोवती साधलेले वलय त्यांच्याबाबत कुतूहल निर्माण करणारे. असे असताना दक्षिण कोरियातील कादंबरीला पारितोषिक मिळेल, हे साहित्यतज्ज्ञांच्या कल्पनेपलीकडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिम्पथी फॉर मिस्टर व्हेन्जेनन्स’, ‘बिटरस्वीट लाइफ’, ‘चेझर’ आदी सूडपटांनी जगभर कोरियन चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग तयार केला. ‘पॅरेसाइट’ला ऑस्कर मिळाल्यानंतर जसे कोरियन चित्रपटांचे सिनेमागणित बदलले, तसेच त्यांच्या साहित्याला अनुवादित करून पुस्तकांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा काबीज करण्याचेही कोरियनांनी ठरविले. ‘के-पॉप’ या संगीताच्या प्रकाराची निर्यात जशी तिथून होतेय, तशीच हल्ली समकालीन लेखकांच्या पुस्तकांचीही. बोरा चुंग हिचे दोन कथासंग्रह, हा स्युंग-नान यांचे फ्लॉवर्स ऑफ मोल्ड, ब्लूबिअर्ड्स फर्स्ट वाईफ आणि डझनांहून अधिक कोरियन लेखकांच्या कथात्मक पुस्तकांचे तातडीने इंग्रजी अनुवाद झाले. गेल्या वर्षी बुकर इंटरनॅशनल पारितोषिकाच्या यादीत असलेल्या ‘व्हेल’ या दक्षिण कोरियाई कादंबरीने बरेच लक्ष वेधले होते. पुरस्कार मिळाला नसला, तरी ही कादंबरी बऱ्यापैकी वाचली गेली.

हेही वाचा : कलाकारण: काश्मीरची पिछवाई…

हान कँग या आंतरराष्ट्रीय पटलावर आल्या त्या ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकानंतर. भाषांतरित कादंबऱ्यांना दिले जाणाऱ्या पारितोषिकाचे निकष २०१६ पासून बदलले आणि ‘मॅन बुकर इंटरनॅशनल’ हे पारितोषिक दरवर्षी सुरू करण्यात आले. त्यातले पहिले पारितोषिक हान कँग यांना ‘द व्हेजिटेरियन’ कादंबरीसाठी मिळाले. ‘द व्हेजिटेरियन’ कादंबरी आपल्या आत्मसूडाच्या संकल्पनेला विविध पातळ्यांवर घासूनपुसून एका अतिसामान्य घटनेतून सुरू झालेल्या भीषण कुटुंबविघटनाला समोर आणते. यातील अतिसामान्य घटना आहे, ती प्रमुख व्यक्तिरेखेने एका स्वप्नाला आधार मानून मांसाहाराला आयुष्यातून हद्दपार करण्याची. ही घटना मिश्राहारी किंवा स्वातंत्र्योत्तर भारतात आहारसहिष्णू संस्कृतीतच वाढलेल्या आपल्या भारतीय जनमानसासाठी फारशी महत्त्वाचीही वाटू नये. पण मांसाहार हा अविभाज्य भाग असलेल्या दक्षिण कोरियाई राष्ट्रातील एका अतिसाधारण कुटुंबामधील महिला शाकाहारी राहण्याचा निश्चय करते, तेव्हा त्याचे पडसाद हिंसक बनलेले पाहायला मिळतात. पकडून ठेवणारी छळवादी गोष्ट ‘द व्हेजिटेरिअन’ सांगते. तिचे संदर्भ जितके स्थानिक, तितकेच जागतिक पातळीवर सारख्याच प्रमाणात वैचारिक घुसळण करणारे आहेत. ‘द व्हेजिटेरियन’नंतर चार-पाचच कादंबऱ्या लिहिणाऱ्या कँग यांना नोबेल मिळण्याचे कारण हे त्यात आहे, तेवढेच सांस्कृतिक आणि साहित्यिक विचारधारेच्या विकासातही. जपानी ज्या वेगाने आपल्या सर्वोत्तम समांतर साहित्याला सर्वप्रथम इंग्रजीत नेण्यासाठी आग्रही असते, (१९८०-९० पासून हे सुरू आहे) त्याच्या जवळपास जाणाराही गेल्या दशकापर्यंत आशियातील कुठला देश नव्हता. पण २००१ पासून दक्षिण कोरियात खास ‘लिटरेचर ट्रान्सलेशन इन्स्टिट्यूट ऑफ कोरिया’ या संस्थेची सरकारी पातळीवर म्हणजे सांस्कृतिक मंत्रालयातर्फे निर्मिती करण्यात आली. या संस्थेने फक्त इंग्रजीत नाही तर इतर २७ भाषांमध्ये ‘द व्हेजिटेरियन’चा अनुवाद केला. (ज्यांच्या आठ वर्षांत ७६ आवृत्त्या सुरू आहेत) नव्या लेखकांना परदेशात अभ्यासवृत्ती मिळवून देण्यापासून त्यांचे उत्तमोत्तम साहित्य जगभरातील भाषेत उपलब्ध व्हावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम ‘लिटरेचर ट्रान्सलेशन इन्स्टिट्यूट ऑफ कोरिया’ आणि आर्ट काऊन्सिल करीत आहे.

स्वभाषेवर प्रेम आणि त्याच्या प्रचाराचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या साहित्याची जगात नववसाहत घडविण्याचा विडा वीस वर्षांपूर्वी उचलला गेला, त्याची फळे येत्या दोन वर्षांत दिसतायत. अभिजात भाषेच्या गौरवात पोळलेल्या आपल्याकडे अशाप्रकारची जाणीव यायला आणखी वीस वर्षं लागू शकतील काय?

हेही वाचा : संविधानभान : वित्त आयोगाची भूमिका

हेही वाचा…

महिन्याच्या महिन्याला एक किंवा दोन पुस्तके संपवणारी शिस्तखोर जमात असते, तशीच चार-पाच पुस्तके वरवर चाळणारी बेशिस्त प्रवृत्तीही असते. समाजमाध्यमांवर नव्या महिन्याच्या आरंभी आदल्या महिन्यात वाचलेल्या पुस्तकांची यादी देण्याची प्रथा मराठीत सध्या बाल्यावस्थेत आहे. पण ‘गार्डियन’ मात्र तारांकित लेखक ते सर्वसाधारण वाचकांनी महिन्याभरात कोणती पुस्तके पचवली, ते खूप काळ छापते. त्याचा ताजा दाखला, येथे पाहता येईल.

https:// shorturl. at/ hxPjO

पुण्यात जन्मलेल्या आणि अमेरिकेतील ‘आयोवा’ लेखन संस्थेत कथात्मक लिखाणाचा अभ्यास केलेल्या देविका रेगे यांची ‘क्वार्टरलाइफ’ ही कादंबरी भारतात गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली. २०१४ नंतरच्या बदलत्या राजकीय वातावरणातील तरुणाईचा विषय असल्याने बऱ्यापैकी चर्चा झाली. आता इटालियन भाषेत अनुवादही होत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी आवृत्ती प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने त्यांच्या मुलाखतींचा नव्याने क्रम सुरू झाला आहे. त्यातील एक येथे वाचता येईल.

https:// shorturl. at/ jIF3 x

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nobel prize winner south korean author han kang literature and her struggle css