महत्प्रयासाने एकत्र आलेल्या २८ पक्षांच्या आघाडीची एकजूट कायम ठेवायची असेल तर ममतादीदींच्या रागावर नियंत्रण मिळवल्याखेरीज पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर तातडीने तयार करण्यात आलेल्या एका अनौपचारिक समन्वय समितीची गुप्त बैठक सुरू झाली तेव्हा त्यात हजर असलेल्या साऱ्यांच्याच चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या समितीत समाविष्ट करण्यात आलेले विविध पक्षांतील दुसऱ्या फळीचे नेते दीदींना कसे शांत करता येईल यावर विचार करू लागले. ऐक्याची गाडी रुळावर यायला आता कुठे सुरुवात झाली असताना तिसऱ्याच बैठकीत दीदींचा पारा भडकल्याने चौथ्या बैठकीत काय होऊ शकेल याचा अंदाज सर्वाना आला होताच. तेवढय़ात एकाने सुचवले : पुढच्या बैठकीत रबींद्र संगीताच्याच धून सर्वत्र वाजतील अशी व्यवस्था करायची. हे ऐकताच साऱ्यांचे डोळे चमकले. मग दीदींना या संगीतातले नेमके काय आवडते याचा शोध घेण्यासाठी कोलकात्याला फोनाफोनी सुरू झाली. तेवढय़ात दुसरा म्हणाला : बैठकीच्या स्थळी ठेवलेल्या खुच्र्यावर नेत्यांची नावे चिकटवायचीच नाहीत. सर्वात आधी दीदी कुठे बसतात ते बघायचे व त्यानंतर इतर नेत्यांनी जागा पकडायची. दीदींच्या बाजूला काँग्रेस वा डाव्या पक्षांच्या नेत्यांना बसू द्यायचे नाही. सतत घाईत असलेले केजरीवाल त्यांच्या शेजारी बसले तर उत्तमच. या पर्यायावर उपस्थितांमध्येच वादावादी सुरू झाली. हे दोघे शेजारी बसले तर मिळून चिडचिड करतील अशी शंका एकाने बोलून दाखवली. नंतर तिसरा म्हणाला : बैठकीतील नाश्त्यात मिठाईसह सर्व बंगाली पदार्थ ठेवावेत.

निदान ते बघून तरी त्या शांत राहतील. यावर ‘विचार करू’ असे सर्वानी एकमताने ठरवले. ‘बैठकीची सुरुवात झाल्यावर उपस्थित होणाऱ्या प्रत्येक मुद्दय़ावर सर्वात आधी दीदींचे मत विचारात घ्यायचे. प्रत्येक नेत्याने ‘हं, बोला दीदी’ असे म्हणत त्यांना मान द्यायचा. त्यामुळे त्या हुरळून जातील, चिडण्याचा विचारही त्यांच्या मनात येणार नाही,’ अशीही एक सूचना आली. पण ‘असे केल्याने त्यांची पंतप्रधानपदाची इच्छा जागृत झाली तर?’ अशी शंका दुसऱ्याने उपस्थित करताच साऱ्यांनी त्याला चूप बसवले. मग चौथा पर्याय समोर आला. प्रत्येक बैठकीच्या आधी एक तासाची ध्यानसाधना आयोजित करायची. ती असेल दीदींसाठीच, पण सर्वच नेत्यांनी त्यात सहभागी व्हायचे व दीदी साधनामग्न होतात की नाही हे तिरक्या नजरेने न्याहाळायचे. हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यांना रागच येणार नाही. त्यावर एकाने शंका उपस्थित केली. ध्यानधारणेमुळे रागावर नियंत्रण शक्य आहे का, असा त्याचा प्रश्न होता.

मुंबईतील बैठकीत दीदींना राग येण्याचे खरे कारण होते बंगालमधील जागावाटपावर न झालेली चर्चा. त्याचे काय, असा प्रश्न एकाने उपस्थित करताच सारे एकमेकांकडे बघू लागले. मग पाचवा पर्याय समोर आला. आघाडीची चौथी बैठकच कोलकात्याला घ्यायची. आपसूकच दीदींना त्याचे आयोजन करावे लागेल. त्याच बैठकीत जागावाटपावर चर्चा करायची. त्यावरून त्यांनी कितीही थयथयाट केला तरी आयोजकत्वाचे ओझे त्यांच्यावर असल्याने त्या बाहेर जाणारच नाहीत. हे ऐकताच साऱ्यांच्या चेहऱ्यांवर ‘काम फत्ते’ असे भाव होते.. यापुढली बैठक म्हणे, कोलकात्यानंतरच होणार आहे!

Story img Loader