हिनाकौसर खान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुस्लिमेतर समाजातील, मुस्लिमांशी माध्यमांखेरीज कुठलाही संबंध नसलेल्या बहुतांश व्यक्तींना मुस्लीम बाई बिचारीच आणि पुरुष राक्षसच वाटतो.. वास्तविक कुठला समुदाय या वास्तवावर टिकेल?
‘‘तुझे बाबा चळवळीशी संबंधित होते का?’’ माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या एका सीनियरनं विचारलं.
‘‘नाही गं.’’
‘‘तरीही त्यांनी तुला इतकं शिकवलं.. फारच कौतुकास्पद.’’
‘‘ओह थँक्स. तुझ्याही बाबांचं कौतुक.’’
‘‘माझ्या बाबांचं कशासाठी?’’
‘‘त्यांनीही तुला शिकवलं ना.’’
‘‘अगं पण आमच्याकडं अलाउडच आहे.’’
‘‘आमच्याकडंही.’’
‘‘अगं म्हणजे आमच्या घरात पहिल्यापासूनच शिक्षणाला खूप महत्त्वंय.’’
‘‘आमच्याही घरात.’’
‘‘तसं नाही गं. तू बुरखासुद्धा घालत नाहीस, म्हणून म्हटलं कौतुक.’’
‘‘हं तूही तर कुठं घालतेस?’’
‘‘चेष्टा काय करतेस. आमच्याकडे कुठं घालतात? ते तर तुमच्याकडे घालतात.’’
‘‘हो पण आमच्याकडेसुद्धा नाहीच घालत.’’
‘‘काय बाई, वेड घेऊन पेडगावला जातेस. तुमच्याकडे म्हणजे तुमच्या धर्मात गं..’’
‘‘अगं पण आता आपण आपापल्या घरात होतो ना.. मग धर्मात कुठं शिरलीस?’’
‘‘तसं नाही गं तुमचं कसं सगळं धर्मातच असतं. बायकांना इतका त्रास त्यामुळंच तर आहे.’’
‘‘हो तर, धर्म आणि सगळय़ाऽऽ सोशीक खवातीन फक्त आमच्याकडेच आहेत.’’
‘‘तुला कळत नाहीये का मी काय बोलत्येय ते? म्हणजे तू सुटली असशील, पण तुमच्यामध्ये बायकांवर केवढी धार्मिक बंधनं असतात. बिचाऱ्या. तुमच्याकडचे पुरुषसुद्धा बायकांचा फार जाच करतात असं ऐकलंय.’’
‘‘हो ना- आणि बाकी जगभरातल्या पुरुषांनी बायकांसाठी पायघडय़ाच पायघडय़ा अंथरून ठेवल्याचंदेखील ऐकलं असशील. इतर सगळे पुरुष किती रोमॅण्टिक आणि सेन्सिटिव्ह. आपके खुबसूरत कदम जमींपर मत रखो म्हणत बायकांच्या मागंपुढं करतात. यार, हाऊ लकी दीज विमेन आर!’’
‘‘छे! तुला काही कळतच नाहीये.’’
‘‘हो ना, तुलाही.’’
‘‘नंतर बोलू सविस्तर’’ म्हणत तिनं विषय बदलला.
मी फक्त स्मित केलं.
****
भारतीय मुस्लीम स्त्री ‘पीडित’ असते किंबहुना असायलाच हवी त्याशिवाय ती मुस्लीम कशी अशा धारणा आपल्या मातीत सेट आहेत. मुस्लीम स्त्रीच्या प्रतिमांमध्ये त्या बाईनं काळय़ा बुरख्यातच असणं अपेक्षित आहे. फार तर मळकटलेल्या रंगाच्या सैलसर सलवार कमीझमध्ये. तिनं सतत भेदरलेलं असणं आणि तिच्या खािवदचा मार खायला वा अत्याचार सहन करायला कायमच तत्पर असणं तर अगदीच अनिवार्य. तिच्या शौहरचं डोकं कधीही फिरू शकतं आणि तो तलाकचा उच्चार करून तिला कधीही सोडून देऊ शकतो हा ताण तिच्या देहबोलीतून प्रतीत व्हायलाच हवा आणि घराची चौकटही कधीच न लांघलेली बाई तर केवळ मुस्लीम असते. मुस्लीम स्त्रीचं ‘बिचारे’पण आकर्षक केल्याखेरीज तिची प्रतिमा ‘पीडित’ कशी होणार? आणि तिची प्रतिमा पीडित करायची असल्यास मुस्लीम पुरुषाचं अन्यायकर्ता, दुष्ट, क्रूरकर्मा या धारणा रुजणं ओघानंच आलं.
या धारणांना छेद गेला, त्याची जिवंत उदाहरणं आसपास दिसत असली तरी त्यावर चटकन विश्वास ठेवला जात नाही किंवा ठेवला तरी ते आठवं आश्चर्य असल्यासारखं पाहिलं जातं. खरं तर भारतीय संस्कृतीत मिसळून गेलेला मुस्लीम समूह आपल्या आसपास आहेच. नाव/आडनाव सांगितल्याशिवाय ते मुस्लीमधर्मी आहेत हे निव्वळ पाहण्यानं लक्षात येत नाही. असा समूह आपल्या परिचयाचा आणि पाहण्यातला असला तरी आपल्याला माध्यमांच्या प्रतिमांविषयी फार कळवळा असतो. त्यातूनच मग मूलभूत कुतूहलापेक्षा समोरच्याला पूर्वग्रहावर आधारित प्रश्न केले जातात. काही वेळा ते समोरच्याला अनकम्फर्टेबल करणारे असू शकतात तर काही वेळा दुखावणारेही. अर्थात मुस्लिमांचा इतका तरी कधी विचार होणार! म्हणून तर ‘ते’ कुठं स्वच्छ राहतात, ‘त्यांच्या’कडे एवढी मुलंच असतात, ‘त्यांच्या’ कुठं नादी लागायचं, ‘त्यांना’ कुठं समजावणार अशी वाक्यं सहज कानावर येतात. आपलं हे बोलणं निव्वळ पूर्वग्रहग्रस्त नाही तर द्वेषमूलक आहे याची भीडभाड बहुतांश जणांना नसते. मागे एकदा एका नियतकालिकात माझी एक कथा प्रसिद्ध झाली. त्यात मुख्य पात्र मुस्लीम स्त्री होती. कथेच्या प्रारंभापासून त्या स्त्रीच्या वर्णनात आणि वावरात साडी या पेहरावाचा उल्लेख होता. कथेचं चित्र मात्र पंजाबी ड्रेस घातलेल्या महिलेचं होतं. हे कुठून येतं? इथं चित्रकारानं कथा वाचायलाच हवी होती, पण तसं न केल्यास प्रतिमा कुठल्या असतात?
एक गमतीशीर गोष्ट आसपास आढळते. ती म्हणजे मुस्लीम समाजातील एकूण एक स्त्री ही दु:खी, कष्टी, अपार यातना भोगणारी आहे. तिच्या जगण्यातले महत्त्वाचे प्रश्न तलाक, हलाला, बहुपत्नीत्व हेच आणि इतकेच आहेत. या प्रथांना एग्झिक्यूट करणारा पुरुष आहे आणि तसं वागण्याची मुभा धर्मातून मिळते हा एवढाच कॅनव्हास आपल्यापुढं सतत उभा केला जातो. त्यातून मुस्लीम समुदायाचे एकूणच मुद्दे धर्मात ढकलले जातात आणि त्यात बदल केल्याशिवाय त्यांचा उद्धार करणं अशक्य आहे हे एक कथानक रेटलं जातं. मुस्लिमेतर समाजातील मुस्लिमांशी माध्यमांखेरीज कुठलाही संबंध नसलेल्या बहुतांश व्यक्तींच्या मनात हेच चित्र दिसतं. त्यांना बाई बिचारीच आणि पुरुष राक्षसच वाटतो. कुठला समुदाय या वास्तवावर टिकेल?
मुळातच कुठल्याही धर्माचा आधार आणि मुळं ही पितृसत्तेत दडलेली आहेत आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांशी लढताना पितृसत्तेचा कॅनव्हास डोळय़ांसमोर ठेवायला हवा या विचारातून मात्र मुस्लीम धर्म सहजी वगळला जातो. तिथं ‘केवळ’ आणि ‘केवळ’ धर्माची चौकट ग्राह्य धरली जाते. मुस्लीम पुरुष दुष्ट आणि िहसक आहे हे नॅरेटिव्ह रेटायलाही त्याची मदत होते. अलगतावादाला खतपाणी घालणं सोपं होतं. एखाद्या समाजातील पुरुषाला गुन्हेगार म्हणून सातत्यानं पेश करून भयाचं चित्र निर्माण केलं जातं. भय आलं की संशय येतो आणि ध्रुवीकरणाचा मार्ग मोकळा होतो. काही वेळा शब्दांशी खेळलं जातं. एखाद्या मंदिरावर हल्ला करणारा आरोपी हिंदू असेल तर त्याचं नाव दडवून तो तिथं दुआ करत असे असं म्हणून काम साधलं जातं. कधी ग्राफिक्सचं गिमिक वापरलं जातं. तबलिगी मुस्लिमांना करोनास्प्रेडर म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ग्राफिकमध्ये करोना व्हायरसला टोपी आणि दाढी दाखवण्यात आली. यातून भोळय़ाभाबडय़ा प्रेक्षकांच्या मनावर काय बिंबत असेल? अर्थात जे बिंबवलं जाणं अपेक्षित आहे तेच. भक्तिभावानं सगळंच खरं मानणाऱ्यांचा उतारा कसा करणार? ‘लव्ह जिहाद’चं नॅरेटिव्हदेखील त्याचंच प्रॉडक्ट. मुस्लीम पुरुष हिंदू स्त्रीशी लग्न करतो तेव्हाच ‘लव्ह जिहाद’ म्हटलं जातं. मुस्लीम स्त्रीनं हिंदू पुरुषाशी लग्न केलं तर नाही. कारण तेव्हा त्या कथित पीडितेची तिच्या क्रूर समाजातून एका मुस्लिमेतर व्यक्तीनं सुटका केली हा दृष्टिकोन तिथं बाळगला जातो. त्यात पुन्हा योनिशुचितेचा मुद्दा आहेच.
थोडक्यात काय पीडित मुस्लीम स्त्री आणि दानवी वृत्तीचा मुस्लीम पुरुष हे नॅरेटिव्ह बिंबवण्याचं काम बहुतांश माध्यमांनी केलं/ करत आहेत. त्यांनी तसं न केल्यास त्यांच्या प्राइम टाइमच्या विषयांचा मोठाच घोटाळा होऊ शकतो. अत्यंत ‘निरागस’ असणाऱ्या प्रेक्षकसंख्येचा आलेख कायमच चढता ठेवण्याखेरीज त्यांच्याकडे तरी पर्याय कुठंय? या प्रकारच्या नॅरेटिव्हमधून केवळ ध्रुवीकरण वाढवणंच नव्हे येणाऱ्या पिढय़ांच्या मनातला राग, द्वेष आणि तिरस्काराची भावना जागवणं हे त्यांना आद्यकर्तव्य वाटत असावं. यात त्या पिढय़ा मानसिकरीत्या बरबाद झाल्या तरी त्याची चिंता वाहण्याचं काम आपलं थोडीच. भविष्याची चिंता करू नये अशी आध्यात्मिक उंची या माध्यमांनी गाठलेली आहे.
इतका पसारा आहे न बे.. आपण काय करू शकतो? तर संवाद.. तो नाहीये म्हणून शंका आहेत आणि त्या आहेत म्हणून एकमेकांविषयीचं भय. रूढ आणि खोटय़ा प्रतिमांच्या प्रेमात न अडकता आपण प्रत्यक्षातला संवाद साधू या. आपल्याला कॉम्प्युटरवर निरनिराळय़ा विंडोज ओपन करायची सवय आहेच. आता संवादाची एक खिडकी तरी उघडण्याची निकड आहे. तीही थेट आणि समोरासमोरची!
लेखिका मुक्त पत्रकार असून आरोग्य संज्ञापन क्षेत्रात कार्यरत आहेत.
greenheena@gmail. com