निव्वळ नग्नचित्राचे प्रदर्शन किंवा लैंगिकतेशी संबंधित वर्णन अश्लील ठरत नाही. नग्न चित्रांना तर गेल्या काही शतकांपासून भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही कलापरंपरांत स्थान आहे. हा इतिहास भारतीय सीमाशुल्क विभागाला माहीत नसेलच असे नाही. पण स्वातंत्र्याच्या उष:काली भारतीय आधुनिक दृश्यकलेची पायाभरणी करणाऱ्यांपैकी फ्रान्सिस न्यूटन सूझा, किंवा त्यानंतरच्या चार-पाच वर्षांत ही आधुनिकता पुढे नेणाऱ्यांपैकी अकबर पदमसी यांची चित्रे नुकतीच या सीमाशुल्क विभागाने अडवून ठेवली. अखेर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली गेली. ही चित्रे नीट जपून ठेवा, ती नष्ट करू नका, असाही आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीमाशुल्क विभागास दिला. तो द्यावा लागतो ही या सरकारी विभागाची नामुष्कीच, अशी चर्चा नुकती सुरू झाली असताना न्या. महेश सोनक आणि न्या. जितेन्द्र जैन यांनी हे प्रकरण निकाली काढले. तेही अर्थातच, ही भारतीय चित्रे परदेशातून ज्यांनी मायदेशात आणली त्यांना ती दोन आठवड्यांत सुपूर्द करा, असा स्पष्ट आदेश देऊन!
चिरीमिरीसाठी अनादिकाळापासून चर्चेत असलेल्या सीमाशुल्क विभागाला इतके साधे आदेशही न्यायालयाने दिल्यानंतरच कळतात, याचे अनेकांना काहीही नवल वाटणार नाही. पण ही सीमाशुल्कीय अडवणूक, त्यासाठी माल ओलीस ठेवल्यासारखा रोखून धरणे हे प्रकार अंगवळणी पडणे हा आपला एकच सामाजिक दोष याप्रकरणी दिसतो, असेही नाही. त्याहून मोठे दोन दोषही उघड झालेले आहेत. पहिला म्हणजे, कलाकृतींना आपण निव्वळ विक्रयवस्तू मानतो. कलाबाजार फोफावला आहे कबूल; पण तो केवळ पैशाचा खेळ झाला की मग कलेच्या इतिहासाचे महत्त्व कमी होते. हा इतिहास केवळ चित्रकारांचा वा कलावंतांचा नसून तो शैलींचा तर असतोच, पण कलेमागल्या वैचारिक कल्पनांचाही असतो याची गंधवार्ता इथे फार जणांना नसते. स्त्रीदेहाचे निव्वळ आकर्षक असणे नव्हे तर पावित्र्यही दाखवण्याचा हेतू कला जेव्हा धर्माच्या आश्रयाने वाढत होती तेव्हा होता. औद्याोगिक भांडवलशाहीच्या उदयानंतर धर्माश्रय रोडावला, पण त्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनांची जोड नग्नचित्रांनाही मिळाली. स्त्रीवादी चळवळीने नग्नचित्रांवर टीका जरूर केली, पण तिचा सूर निराळा होता. पुरुषांनी, पुरुषांसाठीच सौंदर्यशास्त्र निर्माण केले असल्याचं, नग्नचित्रे फक्त स्त्रियांची असतात- या देहाचाही ऱ्हास होत असतो हे अन्यत्र ऱ्हासातही सौंदर्य पाहणाऱ्या पुरुषांना कळत कसे नाही, म्हणून स्त्रीवाद्यांनी निराळी स्त्री- नग्नचित्रे केली! हा इतिहास बदलताना पाहात त्यास प्रतिसाद देऊ पाहणारे पदमसी; तर स्वत:त मश्गूल सूझा. या दोघा दिवंगत भारतीयांनी रेखाटलेली, रंगवलेली चित्रे हा जागतिक कलेतिहासाचाही दस्तऐवज. पण तो सीमाशुल्क गोदामात खितपत पडतो.
हेही वाचा : लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत
u
कलेचा हा इतिहास आपलाही असल्याचे आपण मान्यच करत नाही, हा आपला दुसरा मोठा दोष. १९५४ साली, म्हणजे बरोबर ७० वर्षांपूर्वी पदमसी यांचेच लव्हर्स हे चित्र अश्लील ठरवण्यात आले होते- प्रदर्शनातून ते हटवण्याचा आदेश पोलिसांकडून मिळाल्यानंतर त्याविरुद्ध पदमसींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नग्न स्त्री-पुरुष जोडप्यांचे ते चित्र अश्लील नाहीच ही भूमिका न्यायमूर्तींना पटवून दिली. ‘‘ते पती-पत्नीच आहेत, हे तो व ती शेजारी बसलेले आणि त्याचा हात तिच्या वक्षावर, याखेरीज कसे कळले असते?’’ हा पदमसींचा सवाल बिनतोड ठरला.
हेही वाचा : समोरच्या बाकावरून: आपली बडबड आणि चीनचा धोरणीपणा
नग्न म्हणजे अश्लीलच असे काही नसे – अश्लीलतेचा संबंध असभ्यतेशी असतो, हे ७० वर्षांपूर्वी संबंधित चित्रकार न्यायालयास सांगत होता. आज न्यायालयही सीमाशुल्क विभागाला तेच सांगते आहे. याप्रकरणी- बीके पॅलिमेक्स प्रा. लि. या स्वत: स्थापलेल्या कंपनीसाठी लंडनमधील लिलावांतून विकत घेऊन ही चित्रे मातृभूमीत परत आणणाऱ्या संग्राहकाचे नाव मुस्तफा कराचीवाला असे होते ; म्हणून तर ही अडवणूक झाली नसेल ना, या संशयालाही वाव राहतो. पण ते विषयांतर मानून त्याला थारा दिला नाही तरीही, अश्लीलता आणि असभ्यपणा याविषयी गेल्याच आठवड्यात दिसलेल्या आणखी एका नमुन्याचा उल्लेख वावगा ठरू नये. विधानसभेच्या संगमनेर मतदारसंघातील धांदरफळ येथील प्रचार सभेत जे अपमानकारक उद्गार डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काढले जाणे आणि त्याला शिट्ट्यांसह दाद मिळणे, हे राजकारणातील असभ्यतेचे अश्लील चित्र होते.