नोबेल पारितोषिक जिवंतपणीच मिळतं, देशाच्या नोटेवर चेहरा छापला जाण्याचा मान मात्र मरणोत्तर मिळतो. गॅब्रिएल गार्सिया मार्खेजला हे दोन्ही सर्वोच्च मानले जाणारे सन्मान ज्या त्या वेळी मिळाले. पण कोलंबिया या दक्षिण अमेरिकी देशाला आपल्या अस्मितेचा भाग वाटणाऱ्या या लेखकाची प्रचंड मेहनतही त्यामागे होती. एकेका कादंबरीचे दहादहा खर्डे लिहायचा म्हणे मार्खेज. मग त्यातून जोडकाम करून कादंबरीची मुद्रणप्रत तयार व्हायची. इथवर मार्खेज स्वत:च सारं करायचा. स्पॅनिश साहित्याच्या इतिहासात अढळ स्थान मिळवणारा हा लेखक १७ एप्रिल २०१४ रोजी निवर्तला. त्याआधी काही वर्षं त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडला होता. त्या आजारपणाच्या काळात बायको मर्सिडीज बार्का हिलाच फक्त तो ओळखत असे. अशा अवस्थेत मार्खेजनं स्वत:च्या अखेरच्या कादंबरीचं काम थांबवलं… आणि तीच ‘अपूर्ण’ कादंबरी आता त्याच्या मृत्यूनंतर दशकभरानं प्रकाशित होते आहे… खरंच मार्खेजला अशी मरणोत्तर प्रसिद्धी हवी होती का, हा वाद ॲटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंकडल्या देशांमध्ये यानिमित्तानं घातला जातो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा वाद काही फक्त मार्खेजबद्दलच नव्यानं होतोय, असं नाही. अशा प्रकारचे वाद आधीही झालेत. त्या वादांमधल्या दोन बाजूंपैकी एकीचं म्हणणं : हा प्रश्न तात्कालिक नसून तात्त्विक आहे- असे कित्येक दिवंगत लेखक आहेत, ज्यांनी आपलं उरलेलं लिखाण प्रकाशित होऊ नये अशी इच्छा मरणापूर्वी स्पष्टपणे व्यक्त केली होती… पण ते लिखाण प्रकाशित झालं, म्हणून तर आज आपण फ्रान्झ काफ्का किंवा एमिली डिकिन्सनच्या महत्त्वाच्या साहित्यकृती वाचू शकतो! काफ्कानं स्वत:ला क्षयरोग झाल्यावर, मृत्यू दिसू लागला असतानाच्या काळात, मॅक्स ब्रॉड या विश्वासू मित्राला त्यानं स्पष्ट सांगितलं होतं : हे सारं जाळून टाक. ब्रॉडनं काफ्काच्या मृत्यूनंतर ठाम नकार देऊन ते लिखाण प्रकाशित केलं, म्हणून तर ‘द ट्रायल’ आणि ‘द कॅसल’ सारखी पुस्तकं जगापुढे आली! काफ्काच्या या मरणोत्तर प्रकाशनयात्रेबद्दल नेमके प्रश्न उपस्थित करणारं ‘काफ्काज लास्ट ट्रायल’ हे साहित्यकृतीवजा पुस्तकच (लेखक : बेंजामिन बॅलिंट) उपलब्ध आहे.

हेही वाचा >>> अन्यथा : सत्ता-समानता!

दुसरी बाजू तपशील पाहणाऱ्यांची. त्या बाजूचे लोक नेमकेपणानं त्या त्या लेखकाबद्दल बोलतात. लिखाणच अर्धवट, मूळ लेखक जेवढी परिष्करणं- जेवढ्या सुधारणा त्यात ज्या प्रकारे करायचा तेवढ्या आणि त्या प्रकारे कुणालाही करताच येणार नाहीत, सबब ते लिखाण अप्रकाशित राहिलेलं बरं. किंवा ‘त्याच्या लिखाणाला त्या तोडीचा मुद्रक/ प्रकाशक जर मिळत नसेल, तर राहूदे’ असे युक्तिवाद या बाजूनं केले जातात. ते खरे असतातच पण योग्य असतात की नाही याबद्दलच तर वाद असतो!

मार्खेजची ही नवी मरणोत्तर कादंबरी स्पॅनिश भाषेत सात मार्च रोजी प्रकाशित झाली. ‘एक अगोस्टो नोस वेमोस’ हे तिचं स्पॅनिशमधलं नाव. या शीर्षकाचं भाषांतर जरी ‘एन ऑगस्ट वुई मीट’ असं होत असलं तरी, याच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘अनटिल ऑगस्ट’ या नावानं येतोय… तोही अगदी लगोलग. ॲनी मॅक्लीन यांनी केलेल्या या अनुवादाची जाहिरात जोरदार सुरू आहेच आणि ते इंग्रजी पुस्तक १२ मार्चला येतंय.

ॲना मॅग्डालेना बाखची गोष्ट

काय असेल या कादंबरीत? मार्खेजच्या या कादंबरीचा एक अंश न्यू यॉर्करमध्ये प्रकाशित झालाही होता… कधीतरी १९९९ मध्ये. पण आता तर कादंबरीही तयार आहे. तिच्या प्रसिद्धीसाठी म्हणून काही निवडक नियतकालिकांना तिचे अंश दिले जाताहेत आणि प्रसिद्धीपत्रक तर जगभर गेलंय. यातून कादंबरीचं जे कथानक कळतं ते असं की, ॲना मॅग्डालेना बाख या नावाची एक चाळिशीतली बाई, तिच्या दूरदेशातून एका कॅरिबियन बेटावर दरवर्षी अगदी नेमानं येत असते. तिच्या आईचा दफनविधी या बेटावर झालेला असतो, त्यामुळे आईच्या पुण्यतिथीला तिच्या थडग्यावर फुलं वाहून प्रार्थना करण्यासाठी तिचा या बेटाच्या सालाबाद सहलीचा शिरस्ता सुरू असतो. पण या शिरस्त्याचं खरंखुरं कारण निराळंच असतं. दरवर्षी या बेटावर येऊन ही चाळिशीतली बाई नव्यानव्या तरुणांना गटवत असते. नवरा, संसार सगळं आपल्याजागी छान चाललेलं असताना तिचं हे स्वत:पुरतं, स्वतसाठीचं प्रेमजीवन असतं. ते या बेटावर कसकसं उलगडतं आणि त्यातून पुढे काय होतं, याची ही कादंबरीमय गोष्ट.

यातलं ॲना मॅग्डालेना बाख हे नायिकेचं नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. महान संगीतकार योहान सॅबेस्टीन बाखच्या दुसऱ्या बायकोचं नाव आहे हे. त्याहीपेक्षा आपल्या अर्ध्यामुर्ध्या रचनांच्या दोन वह्या बाखनं या बायकोचं नाव लिहून तिला भेट दिल्या होत्या आणि ‘‘नोटबुक्स फॉर ॲना मॅग्डालेना बाख’’ याच नावानं आता हे संगीत-तुकडे वाजवले जातात.

आता जोडा बघू ठिपके- महान कुणीतरी कलावंत, तो आपल्यामागे आपल्या बायकोच्या नावानं अर्धीमुर्धी कलाकृती ठेवतो, तीच कलाकृती पुढल्या काळात लोकांना आवडूही लागते… या गोष्टीतलं नाव आणि मार्खेजच्या गोष्टीतलं नाव एकच कसं? याचा अर्थ, आपल्या कलाकृतीच्या अर्धेमुर्धेपणातलं सौंदर्यही लोकांना कालौघात उमगेल, भावेल असं वाटत होतं का मार्खेजला?

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : वसुंधरेचा फिरता रंगमंच

तेव्हा आम्ही ‘बुकबातमी’दार लोक तरी मार्खेजच्या अर्ध्यामुर्ध्या कादंबरीचं प्रकाशन होण्यात काही गैर नाही, या मताचे आहोत! आम्ही ‘लोकसत्ता’च्या कर्मचारीवर्गातलेच असलो तरी खुद्द ‘लोकसत्ता’नं मराठीत ‘अप्रकाशित पुलं’ असा एक पुस्तिकावजा विशेषांक काढला होता, हेही आम्हाला माहीत आहे आणि तमाम साहित्यप्रेमी मराठीजनांना अरुण कोलटकरांच्या ‘बळवंतबुवा’ची कशी प्रतीक्षा आहे याची कल्पना आम्हालाही आहेच. कोलटकर २००४ मध्ये गेले. मार्खेज २०१४ मध्ये. कोलटकरांचं मराठीतलं ‘जेजुरी’ मृत्यूनंतरच (२०१०) आलं. पण ‘चिरीमिरी’तल्या कवितांतून भेटलेल्या ‘बळवंतबुबां’बद्दल कोलटकरांनी बरंच लिहिलं आहे, ते आता प्रकाशित झालं पाहिजे, अशी नुसतीच चर्चा होत असते.

मार्खेजच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मुलांनी ‘अनटिल ऑगस्ट’ प्रकाशित केलं, त्याबद्दल (यांना फक्त पैसा/ प्रसिद्धी हवी अशा प्रकारच्या) टीकेचा झोतही झेलला. मराठीत- त्यातही कोलटकरांबद्दल- असं काहीच होणार नाही, लोक खरोखरच वाट पाहताहेत बळवंतबुवांची! पण बळवंतवुवा मात्र अद्याप बाहेर येत नाहीत थडग्यातून.

हे ही पाहा

सोमवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) दहा वाजण्याआधीच सिनेजगतात सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारातील सर्व गटांची यादी जाहीर झालेली असेल. पुस्तकप्रेमींना कुतूहल राहील, ते यंदा ‘ओपनहायमर’च्या पुस्तक लेखकाला ऑस्कर मिळते की अमेरिकन फिक्शन, पुअर थिंग्ज कादंबऱ्यांचा सन्मान होतो, याचा. ज्या मूळ कथन आणि अकथनात्मक ग्रंथांवरून सर्वोत्कृष्ट चित्रपट गटातील सिनेेमे बनलेत त्यांच्याविषयी एकत्रित येथे वाचता येईल.

https://shorturl.at/cklqv

पर्सिव्हल एव्हरेट यांची ‘ट्रीज’ ही कादंबरी २०२२ साली बुकरसाठी लघुयादीत होती. पण वीस वर्षांपूर्वीच्या त्यांच्या ‘एराशर’ या कादंबरीवर त्याच दरम्यान सिनेमा बनत होता. ‘अमेरिकन फिक्शन’ नावाने यंदा तो ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आहे. हा सिनेमा पाहण्यापूर्वी कादंबरी का वाचावी हे सांगणारा लेख. पण सिनेमा पाहून आवडल्यानंतरही ती वाचल्यास हरकत नाही.

https://shorturl.at/gxyAJ

यंदाचा सर्वात देखणा चित्रपट ‘पुअर थिंग्ज’ स्कॉटलंडमधील कादंबरीवर आधारलेला आहे. कादंबरी १९९२ सालातील. चित्रपटामुळे अभिनेत्री एमा स्टोनचे मुखपृष्ठ असलेल्या नव्या आवृत्त्या बाजारात आल्यात आणि त्या जोरदार खपतायत. अतिविचित्र कथा असलेल्या कादंबरीविषयी आणि तिच्या लेखकाविषयी येथे वाचता येईल.

https://shorturl.at/euCPS